You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणेंनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केलेल्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी भाजप खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे सरकारमधल्या एका मंत्र्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. "दिनो मोर्या कोण आहे? सुशांतच्या घराजवळ त्याचा बंगला आहे. तिथे या सरकारमधला एक मंत्री का येतो? 13 तारखेला बंगल्यावर जमून सुशांतकडे पार्टी करायला कोण गेलं? त्यांची चौकशी का होत नाही? सरकारवर दबाव का आहे? याचा खुलासा झाला पाहीजे," असे सवाल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहेत.
राणे यांनी यावेळी कुठल्याही मंत्र्याचं नाव घेतलं नाही. पण राणे यांच्या या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंनी मात्र ट्विटरवरून त्यांची भूमिका जाहीर करत एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच हे गलिच्छ राजकारण आहे असं त्यांनी म्हटलंय.
तसंच महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असं कृत्य माझ्या हातून घडणार नाही, असंहा आदित्य यांनी स्पष्ट केलंय.
काय आहेत भाजपचे आरोप?
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सुशांत सिंग राजपूतवर प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत.
नारायण राणे म्हणाले, "सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला 50 दिवस उलटून गेले तरीही या प्रकरणात अद्याप कोणाला अटक का गेली नाही? 8 जूनला कोणाच्या घरी पार्टी झाली. 13 तारखेला सुशांतबरोबर झालेल्या पार्टीत कोण होतं? दिनो मोर्या कोण आहे? सुशांतच्या घराजवळ त्याचा बंगला आहे. तिथे या सरकारमधला एक मंत्री का येतो? १३ तारखेला बंगल्यावर जमून सुशांतकडे पार्टी करायला कोण गेलं? त्यांची चौकशी का होत नाही? सरकारवर दबाव का आहे," असे अनेक प्रश्न राणे यांनी उपस्थित केलेत.
या प्रश्नांचा खुलासा झाला पाहीजे असंही राणे म्हणाले. पण हे आरोप करताना राणे यांनी कोणत्याही मंत्र्याचं नाव घेतलं नाही.
माझा संबंध नाही....!
नारायण राणे यांनी आरोप केल्यानंतर लगेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलय.
आदित्य ठाकरे म्हणाले, "कोरोनाच्या पराभवात महाराष्ट्र सरकारचं यश विरोधकांना खुपत आहे म्हणून सुशांत सिंग राजपूतवरून गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. या आत्महत्या प्रकरणात ठाकरे कुटुंबीयांवर आणि व्यक्तीश: माझ्यावर चिखलफेक केली जात आहे. ही राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणूसकीला कलंकीत करणारा आहे.
माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही. बॉलिवूडमध्ये माझे अनेकांशी मैत्रीचे संबंध आहेत. पण हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू हा धक्कादायक आहे. मुंबई पोलीस याचा तपास करतायेत. जर या प्रकरणाची माहिती कोणाकडे असेल तर ती पोलीसांना द्यावी. पोलीस त्या दिशेने तपास करतील. फालतू आरोप करणार्यांनी असा धुरळा उडवून तपास भरकटवायचा प्रयत्न करू नये. मी या प्रश्नी मी संयम बाळगून आहे म्हणून अशाप्रकारचे चिखलफेक करून ठाकरे परिवाराची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये," असं आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकात म्हटलंय.
शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी देखील या मुद्द्यावरून स्पष्टीकरण दिलं आहे.
अनिल परब यांनी याबाबत बोलताना म्हटलं, "ज्यांच्याकडे पुरावे असतील जे ठामपणे सांगतायेत त्यांनी पुरावे द्यावेत. युवा नेते आणि मुख्यमंत्र्यांचे नाव खराब करण्यासाठी हे केलं जातय."
आदित्य ठाकरेंचं नाव आलं कसं?
अभिनेत्री कंगना रणावत यांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या कथित ट्विटर हँडलवरून एक ट्वीट करून 'राज्य सरकारमधला एक मंत्री पार्टीसाठी उपस्थित होता मग त्याची चौकशी का नाही होत,' असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
त्यानंतर सोशल मिडीयावर आदित्य ठाकरेंच्या नावाची अप्रत्यक्ष टीका सुरू झाली. त्यानंतर नारायण राणे यांनी आदित्य यांचं नाव न घेता आरोप केले. मग आदित्य ठाकरे यांनी स्वतः पत्रक काढून आरोपांचं खंडन केलं.
त्यानंतर पुन्हा टीम कंगना रणावत यांच्या टीमने ट्वीट करून 'घाणेरड्या राजकारणाबद्दल कोण बोलतय? तुझ्या वडिलांना मुख्यमंत्रिपद कसं मिळालं? असा सवाल उपस्थित केलाय.
याबाबत लोकमतचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात, "नाव न घेता एखाद्याचं पूर्ण वर्णन करून आरोप केले तर लोकांच्या मनात वाईट प्रतिमा तयार होते. पण नाव न घेता आरोप केले असले तरी त्याचं खंडन करणं म्हणजे टोपी स्वतःलाच घालून घेतल्यासारखं आहे. पण लोकांच्या मनात प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून आदित्य ठाकरे यांनी खुलासा केला असावा."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)