कोरोना व्हायरस: 'कोरोनायोद्धे' डॉक्टर आणि पोलिसांवर हल्ल्यांत वाढ

डॉ. दिनेश शर्मा
फोटो कॅप्शन, डॉ. दिनेश शर्मा
    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

देशभरातील पोलीस, डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. आपल्या कुटुंबापासून महिनोंमहिने दूर राहून सामान्यांसाठी दिवस-रात्र झटत आहेत.

एकीकडे कोव्हिड योद्ध्यांसाठी टाळ्या वाजतात.. त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून फुलांचा वर्षाव करतो. मात्र, दुसरीकडे आपल्या समाजातच एक विदारक चित्र पहायला मिळतंय. कर्तव्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या या कोव्हिड योद्ध्यांवर हल्ले होतायत. डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात असल्याचं चित्र आहे.

लाईन
लाईन

महाराष्ट्रात पोलीस आणि डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या लेखाजोखा या लेखात मांडण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोव्हिड योद्ध्यांवर झालेले हल्ले -

  • मार्च 2020 पासून आत्तापर्यंत राज्यात 69 आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले
  • पोलिसांवर हल्ल्याच्या 336 घटना
  • 89 पोलीस जखमी

याबाबत बीबीसीशी बोलताना पोलीस उपमहानिरीक्षक (कायदा-सुव्यवस्था) विनायक देशमुख म्हणाले, "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या 65 घटना राज्यात घडल्या आहेत. डॉक्टर रुग्णांकडे लक्ष देत नाहीत. रुग्णांवर योग्य उपचार केले नाहीत. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नव्हते. रुग्णाचा मृत्यू अचानक कसा झाला. अशा अनेक कारणांवरून नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे."

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

"लॉकडाऊन योग्य पद्धतीने पाळताना पोलीस आणि सामान्यांमध्ये अनेकदा खटके उडतात. पोलिसांवर हल्ला केला जातो. त्यांना मारहाण होते. गेल्या चार महिन्यात पोलिसांवर हल्ला करण्याच्या 336 घटना घडल्या. यात 891 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली आहे," असं पोलीस उपमहानिरीक्षक विनायक देशमुख पुढे म्हणाले.

अमरावतीत डॉक्टरला धक्काबुक्की

अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात 25 ऑगस्टला (मंगळवारी) संध्याकाळी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि वॉर्डबॉयशी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. कोव्हिड-19 मुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यावरून हा प्रकार घडला. या प्रकरणी तक्रारीनंतर गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना
लाईन

याबाबत बीबीसीशी बोलताना अमरावतीचे पोलीस आयुक्त यशवंत सोळंके म्हणाले, "मंगळवारी संध्याकाळी सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये मृतदेह ताब्यात देण्यावरून बाचाबाची झाली. नातेवाईकांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी 6-7 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईकांना अटक केली जाईल."

नाशिकमध्ये डॉक्टरला मारहाण

नाशिकच्या ग्लोबल रुग्णालयातील डॉ. दिनेश पाटील यांच्यावर 3 ऑगस्टला रुग्णाच्या नातेवाईकांकडून हल्ला करण्यात आला. कोव्हिड-19 संशयित म्हणून उपचारांसाठी दाखल रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी केबिनमध्ये घुसून डॉ. पाटील यांना मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

कोरोना

याबाबत बीबीसीशी बोलताना नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, "डॉक्टरांवर हल्ला केल्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींवर साथरोग अधिनियम कायदा, IPC आणि महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे."

"रुग्णाच्या मृत्यूनंतर इंन्शुरन्सच्या मुद्यावरून नातेवाईक संतापले. रागाच्या भरात नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली. डॉक्टरांची शिष्ठमंडळासोबत चर्चा करण्यात आली आहे. डॉक्टरांना योग्य पोलीस सुरक्षा दिली जाईल. पोलिसांच्या कारवाईत कोणताही राजकिय दबाव नाही," असं पोलीस आयुक्त नांगरे-पाटील पुढे म्हणाले.

लातूरमध्ये मारहाणीत डॉक्टर जबर जखमी

लातूरच्या अल्फा रुग्णालयात 29 जुलैला डॉ. दिनेश शर्मा यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. शर्मा जखमी झाले होते. कोव्हिडग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी डॉ. शर्मा यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला केला. ज्यात त्यांच्या गळ्यावर आणि छातीवर जखम झाली.

लातूरचे पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डॉ. शर्मा यांच्यावर हल्ला करणाऱ्या नातेवाईकाला अटक केली. आरोपीवर खूनाचा प्रयत्न, आणि महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरांची मागणी

नाशिकच्या घटनेबाबत बीबीसीशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक ब्रांचचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे म्हणाले, "कोरोनाविरोधात राज्यातील संपूर्ण यंत्रणा लढतेय. मात्र, डॉक्टरांना टार्गेट केलं जातंय. कोव्हिड योद्धे कोरोनासोबत लढत असताना. लोकांनी त्यांच्यावर हल्ला करू नये. याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. कोरोनाची परिस्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. अशा परिस्थितीत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर जीवाची पर्वा न करत काम करतात लोक मात्र डॉक्टरांवर हल्ला करतायत."

डॉक्टर

फोटो स्रोत, Getty Images

"डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना वाढतायत. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी करणार आहोत. कोव्हिड रुग्णालयांना पोलिसांनी सुरक्षा दिली पाहिजे. डॉ. पाटील यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत कारवाई केली. ही स्वागतार्ह बाब आहे." असं डॉ. चंद्रात्रे पुढे म्हणाले.

इंडियन मेडिकल असोसिएशनची भूमिका

कोव्हिड-19 च्या काळात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं होतं.

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा म्हणाले, "डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्या प्रकरणी सरकारने कायदा केला. मात्र या कायद्याबाबत जिल्हास्त्ररावर अधिकाऱ्यांना अजूनही योग्य माहिती नाही. त्यामुळे या गुन्हांबाबत लक्ष दिलं जात नाही. लातूरच्या प्रकरणी पोलिसांना साथरोग कायद्यांतर्गत कारवाई केली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अशा प्रकरणांकडे तातडीने लक्ष द्यावं."

डॉक्टर मारहाण

इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "लातूरची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण करण्यात आली आहे. आरोपीला एपिडेमिक अॅक्टअंतर्गत अटक करण्यात आली आहे. हीच आमची मागणी होती. महाराष्ट्रात डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची रजिस्ट्री इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे बनवण्यात येत आहे. डॉक्टरांवर हल्ला झाला तर, डॉक्टर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पुढे उपचार नाकारू शकतात."

IMA चं सर्वेक्षण

साल 2015 मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत अभ्यास केला. या अभ्यासातील निष्कर्ष...

  • 75 टक्के डॉक्टरांना प्रॅक्टिस दरम्यान एकदा तरी मारहाणीला सामारं जावं लागलं
  • नातेवाईकांकडून मारहाणीच्या घटना 68 टक्के
  • 50 टक्के मारहाणीच्या घटना आयसीयू बाहेर
  • नातेवाईकांना भेटण्याच्या वेळी सर्वात जास्त घटना

डॉक्टरांवर हल्ला आणि शिक्षेची तरतूद

देशभरात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर एप्रिल 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने डॉक्टरांवरील हल्ल्या संदर्भातील कायदा अधिक कडक केला. जुन्या कायद्यातील तरतूदी बदलून डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्याला 50 हजार ते 2 लाख रूपये दंड, गंभीर गुन्ह्यात 2 ते 5 लाखांपर्यंत दंड आणि 6 महिन्यांपासून ते 5 वर्षापर्यंत शिक्षा आणि गंभीर प्रकरणात 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली होती.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

दिवसेंदिवस वाढणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत डॉक्टरांच्या संघटनांनी एक दिवसीय संप पुकारला होता. तर, अनेकवेळा आंदोलन करण्यात आलं होतं.

कोरोनाग्रस्त डॉक्टरांची संख्या (स्त्रोत - IMA)

  • निवासी डॉक्टर- 566
  • प्रॅक्टिस करणारे डॉक्टर- 586
  • हाऊस सर्जन- 150
  • एकूण- 1302

कोरोनाग्रस्त डॉक्टरांचे मृत्यू (स्त्रोत - IMA)

  • 99 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू
  • स्पेशलिस्ट डॉक्टर- 40
  • जनरल प्रॅक्टिशनर- 55
  • रेसिडेंट डॉक्टर- 4

कोरोनाग्रस्त पोलिसांची आकडेवारी (स्त्रोत - महाराष्ट्र पोलीस)

  • एकूण 9934 अधिकारी, कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह
  • सद्य स्थितीत 1877 अॅक्टिव्ह केसेस
  • 107 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)