You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रवासी रोजगार: सोनू सूद नोकरी शोधण्यासाठी मदत करणार, नवी वेबसाईट लाँच
महाराष्ट्रातील स्थलांतरितांसाठी त्यांच्या गावापर्यंतच्या प्रवासाची सोय केल्यामुळे चर्चेत आलेला अभिनेता सोनू सूद यांने स्थलांतरित मजुरांसाठी आणखी एक मदतीचं पाऊल टाकलं आहे. प्रवासी रोजगार या नावाने ही वेबसाईट त्याने सुरू केली आहे.
या वेबसाईटमध्ये अब इंडिया बनेगा कामयाब, नौकरी मिलना अब हुआ आसान असे घोषवाक्य लिहिण्यात आले आहे. लक्षावधी स्थलांतरित मजुरांना नोकरी मिळण्यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आल्याचे त्यात लिहिले आहे.
रोजगार शोधण्यासाठी स्थलांतरित मजुरांना काही पर्यायही दिले आहेत. व्यक्तीला त्याला ज्या प्रकारची नोकरी करायची आहे ती निवडण्याची संधी देण्यात आली आहे. डीटीपी ऑपरेटर, प्लंबर, मशिन ऑपरेटर, वाहनचालक, इलेक्ट्रिशियन अशा प्रकारच्या कामांची निवड करुन उपलब्ध असणारी संधी घेता येणार आहे. तेथे टोल फ्री नंबर आणि आपल्या नावाची नोंदणी करण्यात येणार आहे.
अमेझॉन, सिल्व्हर स्पार्क, सोडेक्सो, अर्बन कंपनी, मॅक्स हेल्थकेअर, जेबीएम ग्रुप अशा कंपन्यांमध्ये या कामगारांना काम मिळू शकणार आहे.
याआधी स्थलांतरित मजुरांना मदत केल्यामुळे सोनू सूदला रोषही पत्करावा लागला होता.
लॉकडाऊन काळात सोनू सूद हा महात्मा अचानक निर्माण झाला. इतक्या झपाट्याने आणि शिताफीने कोणाला महात्मा बनवलं जाऊ शकते, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
सामनामधील 'रोखठोक' या सदरातून संजय राऊत यांनी सोनू सूद याने लॉकडाऊनच्या काळात मजुरांना केलेल्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं
सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे, ज्यामुळे तो हजारो मजुरांना घरी पोहचवू शकतो असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सोनू सूद हा चांगला अभिनेता आहे. तो जे काम करतोय, ते चांगलंच आहे. पण त्यामागे कोणी 'राजकीय दिग्दर्शक' असण्याचीही शक्यता असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. सामनातून झालेल्या या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद याने 7 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
रुपेरी पडद्यावर व्हिलनच्या भूमिका साकारणारा सोनू सूद सध्या खऱ्याखऱ्या आयुष्यातला हिरो म्हणून गाजतोय.
मुंबईत अडकलेल्या हजारो मजुरांसाठी सोनू सूद हा तारणहार बनल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईत अडकलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजुरांसाठी सोनू सूदने बसेसची व्यवस्था केली. त्यानंतर त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या प्रयत्नांबद्दल बीबीसीनेही सोनू सूदशी संवाद साधला होता.
"मार्चमध्ये आम्ही लोकांना जेवण आणि अन्नधान्य पुरवत होतो. सुरुवातीला आम्ही 500 पाकिटं वाटली आता आम्ही 45,000 हून अधिक लोकांना जेवण आणि किराणा सामान पुरवत आहोत. यामध्ये बरेच जण झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत किंवा कुणी रस्त्याने पायी चालणारे आहेत," असं सोनूने फोनवर सांगितलं.
त्यानंतर त्याने मजुरांसाठी बसची सोय केली.
11 मे रोजी 200 जणांची पहिली बॅच जेव्हा निघाली तेव्हा सोनू आणि त्याची मैत्रीण निती यांनी तेव्हा नारळ फोडून सर्वांचा प्रवास सुखरुप होवो अशी प्रार्थना केली.
जेव्हा ते निघाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी होतं, असं सोनूने म्हटलं. तेव्हापासून सोनूने कित्येकांना आपल्या घरी जाण्यास मदत केली आहे.
सोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई प्राध्यापिका होती. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर सोनूने मॉडेलिंग आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबई गाठली.
मुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळी नोकरी करून सोनू सिनेमात संधी मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण पहिली संधी सोनूला एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ सिनेमात एक भूमिका केली.
त्यानंतर त्याने तामिळ, तेलगू, कन्नड या सिनेमांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. त्यासाठी या भाषा त्याला शिकाव्या लागल्या. 2002 साली 'शहिद-ए-आझम' या हिंदी सिनेमातून सोनूने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर युवा,आशिक बनाया आपने, शूट आऊट अॅट वडाला, जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू ईयर, पलटन, आर राजकुमार अशा काही हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)