कोरोना : 80 लाख लोकांनी पीएफमधून काढले पैसे, तुमच्या गुंतवणुकीवर काय होईल परिणाम?

    • Author, आलोक जोशी
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

गेल्या तीन महिन्यात देशभरातल्या 80 लाख लोकांनी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफमधून पैसे काढले आहेत.

पीएफमधून पैसे काढणं सोपं नाही. निवृत्तीनंतर व्यक्तीच्या कमाईचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर या फंडातून पैसे मिळून त्याचा उदरनिर्वाह होऊ शकेल, हाच पीएफचा उद्देश आहे.

भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याचे नियम कठोर आहेत. नोकरीत असताना पैसे काढणं तर खूप अवघड आहे.

मात्र, कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने सर्वात आधी ज्या उपाययोजना केल्या होत्या त्यापैकी एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची सोय.

जे लोक नोकरी सोडतात त्यांना तर एका विशिष्ट कालावधीनंतर हा पैसा मिळतोच. मात्र, जे नोकरीवर आहेत आणि आर्थिक संकटात अडकले आहेत, अशांना सरकारच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला.

मात्र, माझं पूर्वीही हेच मत होतं आणि आताही हेच मत आहे की, शक्य तोवर आपल्या पीएफच्या रकमेला हात लावू नका.

मात्र, सध्या जी आकडेवारी समोर येत आहे त्यावरून तरी असंच दिसतं की, जवळपास 30 लाख लोकांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली की पीएफचा पैसा काढण्याखेरीज त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.

30 हजार कोटी रुपये काढले

हे तेच लोक आहेत ज्यांनी कोव्हिड संकटाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या सवलतीचा फायदा उचलत पीएफमधली रक्कम काढली. मात्र, वृत्तपत्रांमध्ये ईपीएफओच्या हवाल्याने ज्या बातम्या छापून आल्या आहेत, त्यानुसार एप्रिल ते जून या दरम्यान जवळपास 80 लाख लोकांनी 30 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पीएफ खात्यांमधून काढली आहे.

दरमहा 15 हजार रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्यांसाठी तर हा मोठा दिलासा होता. पुढे काही महिने तरी या पैशांवर गुजराण होईल. त्यापुढे जगलो वाचलो आणि नोकरी टिकली तर भविष्याची काळजी करू.

माजी कोळसा सचिव आणि लेखक आयएएस अधिकारी अनिल स्वरूप केंद्रीय प्रॉव्हिडंट फंड आयुक्त होते. त्यांनीच पीएफचा सगळा हिशेब ऑनलाईन करण्याचं काम सुरू केलं होतं. त्यांच्या या कामामुळेच आज पीएफमधून पैसे काढणं फारसं अवघड राहिलेलं नाही.

आपल्याच कष्टाची कमाई पीएफ ऑफिसमधून काढण्यासाठी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कितीतरी खेटे घालावे लागायचे.

अनिल स्वरुप यांचं म्हणणं आहे की, कोरोना संकट सुरू होताच गरजूंना पीएफमधून पैसे काढण्याची सूट देणं अत्यंत चांगला निर्णय होता. त्यांनी तर यापुढचाही प्रस्ताव दिला आहे.

त्यांचा सल्ला होता की, सरकारने बँक कर्ज आणि क्रेडिट कार्डवर जे मोरॅटोरियम दिलं तशाच पद्धतीची सवलत पीएफच्या रकमेवरही द्यायला हवी होती.

खर्च केल्याने अर्थव्यवस्था सुधारेल

कर्मचाऱ्याच्या पगारातून 12% पीएफ कपात होते. कंपनीही कर्मचाऱ्याच्या खात्यात 12% पीएफ जमा करते. अनिल स्वरुप यांचं म्हणणं आहे की, ही दोन्ही रक्कम पुढचे काही महिने थेट कर्मचाऱ्यांच्या पगारातच द्यायला हवी.

यामुळे लोक खर्च करतील आणि अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सर्वाधिक गरजेचं असतं लोकांनी खर्च करणं. महागाई न वाढवता तात्काळ व्यापार वृद्धीचा हा सर्वोत्तम पर्याय आहे.

अनेक जाणकारांना वाटतं की, आजही कोव्हिड सुविधेअंतर्गत ज्या लोकांनी पीएफमधून पैसा काढला त्यांच्यासाठी हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्यातले बहुतांश लोक ही रक्कम खर्च करत आहेत. यात विशेषतः 15 हजार रुपये महिना पगार असणाऱ्यांचा समावेश आहे.

ईपीएफओने जून महिन्यात दिलेल्या आकडेवारीनुसार ज्या लोकांनी पैसा काढला त्यापैकी 74% लोक याच वर्गातले आहेत. 50 हजार रुपयांपेक्षा जास्त पगार असणाऱ्यांची संख्या केवळ 2% होती.

तुमच्या खिशावरही होणार परिणाम

मात्र, कोव्हिड सवलती अंतर्गत नाही तर सामान्य मार्गाने पीएफचा पैसा काढणाऱ्यांची संख्या हा चिंतेचा मुख्य विषय आहे. एप्रिल ते जून दरम्यान पीएफमधून पैसा काढणाऱ्यांची संख्या वाढून एक कोटींपर्यंत जाईल, असा पीएफ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. यातल्या अनेकांना आपलं नाव उघड करायचं नाही.

गेल्या आर्थिक वर्षात एकूण दीड कोटी लोकांनी पीएफमधून 72 हजार कोटी रुपये काढले होते. त्यामुळे या वर्षी पहिल्या तीन महिन्यातच 1 कोटी लोकांचे अर्ज येणं, काळजीचं टाकणारं आहे.

यातल्या बऱ्याचशा अर्जदारांनी पैसा काढण्याचं कारण प्रकृती अस्वास्थ दिलं आहे. उपचार, लग्न, कुटुंबातील कुणाचं निधन किंवा घर बांधणं, या कारणांसाठीच पीएफमधून पैसे काढता येतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे अर्जामध्ये उपचार हे कारण दिलं असलं तरी खरं आहे, असं मानण्याचं कारण नाही.

त्यामुळे प्रश्न असा आहे की उपचार करायचे नाही तर लोक पैसे का काढत आहेत? उत्तरासाठी तुम्हाला कॅलेंडरवर नजर टाकावी लागेल. जूनमध्ये लॉकडाऊन उघडायला सुरुवात झाली. लोकांना कामावर परत यायचं होतं.

जूनच्याच शेवटच्या तीन आठवड्यात दररोज जवळपास 1 लाख लोक पीएफमधून पैसे काढत होते.

कुणी निम्मे पैसे काढले तर कुणी पूर्ण. म्हणजेच 15 ते 20 लाख लोकांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळल्याचं हे द्योतक आहे. कुणाची नोकरी गेली, कुणाची पगार कपात झाली. तर कुणी कोरोना संकट बघता स्वतःच नोकरी सोडली.

भविष्य सुरक्षित करणं गरजेचं

ही अडचण आहे नोकरदार मध्यमवर्गीयांची. येत्या काही दिवसातच तब्बल 1 कोटी लोक पीएफमधून पैसे काढतील, असा अंदाज आहे. याचा परिणाम त्या लोकांवरही होईल ज्यांचे पैसे पीएफ फंडात जमा आहेत.

ईपीएफओ जवळपास 6 कोटी लोकांच्या पगारातून येणाऱ्या 10 लाख कोटी रुपयांच्या निधीचं व्यवस्थापन करतं. यातून पैसे काढण्याचा वेग असाच वाढत राहिला तर उर्वरित रकमेवर उत्तम रिटर्न मिळणं अवघड होईल.

याचाच अर्थ लवकरच प्रॉव्हिडंट फंडावर व्याज कपातीची घोषणा ऐकण्याचीही तयारी ठेवायला हवी. मात्र, देश आणि संपूर्ण जगावरच जे अभूतपूर्व संकट ओढावलं आहे ते बघता एवढा त्याग तर प्रत्येकजण करेल.

अशा परिस्थिती काय करावं? संधी मिळाली आहे तर पीएफमधून पैसे काढून चांगला रिटर्न देणाऱ्या एखाद्या योजनेत पैसा गुंतवावा का? सध्या तरी हा मार्ग खुला नाही. दुसरं मी स्वतः हा सल्ला देणार नाही.

याक्षणी भांडवली बाजार वगळता तुम्ही कुठेही पैसे गुंतवले तरी पीएफ एवढं व्याज मिळणार नाही.

दुसरीकडे भांडवली बाजारात कितीही चांगला रिटर्न मिळाला तरी तो कुठल्याही क्षणी तोट्यात जाऊ शकतो. ते नुकसान सोसायची तुमची तयारी असली तरीसुद्धा पीएफसारख्या सुरक्षित ठिकाणी तुमच्या कमाईचा एक वाटा तोवर असायला हवा जोवर तुमच्यासाठी तो पैसा काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल.

उदाहरणार्थ-निवृत्ती किंवा नोकरी जाण्याच्या परिस्थितीत.

नोकरी गेली आणि काही दिवसांनंतर नवीन नोकरी मिळण्याची शक्यता असेल तर त्या परिस्थितीतही तुम्ही पीएफच्या पैशाला हात लावू नये. कारण तसं केल्यास लवकरच तुमचं भविष्य इतकं सुरक्षित झालेलं असेल की नोकरी गमावण्याची काळजी तुम्हाला राहणार नाही.

त्यानंतरही नोकरी करायची असेल तर एखाद्या राजाप्रमाणे करा.

(लेखातील विचार हे लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)