You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुनीता यादव : 'अशा अनेक महिला पोलीस आहेत ज्यांना सिंघमसारखे काम करायचे आहे'
सुरतमधील महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनीता यादव या सध्या चर्चेत आहेत. ड्युटीवर असताना गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कनानी याच्या मुलाला अडवल्यानंतर झालेल्या वादाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आपलं कर्तव्य बजावताना मंत्र्याच्या मुलाला रोखणाऱ्या सुनीता यांचं सोशल मीडियावर कौतुकही झालं.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार आता सुरत पोलीस या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. सुनीता यादव यांनी सांगितलं आहे की त्या राजीनामा देणार आहेत.
सुनीता यादव यांनी आता फेसबुरवर नवीन व्हिडिओ अपलोड केलाय. आपण पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा देत असल्याचं या व्हिडिओमध्ये त्यांनी जाहीर केलंय. पोलीसांना दबावाखाली काम करावं लागतं याबाबतही त्या व्हिडिओमध्ये बोलल्या आहेत.
'जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे ते केवळ 10 टक्के वास्तव आहे. तसंच तो केवळ एक 'ट्रेलर' असून पूर्ण सिनेमा आणि सविस्तर माहिती राजीनामा दिल्यानंतर समोर आणणार.' असंही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.
माध्यमांशी बोलण्यास नकार दिल्याने मी रागीट स्वभावाची असल्याची चुकीची माहिती माध्यमांकडून दिली जात असल्याचा आरोपही सुनीता यादव यांनी केलाय. "व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा मी माझ्या वरिष्ठांसोबत बैठकीमध्ये होते. माध्यमांनी बाहेर गर्दी केली होती. मी त्यावेळी माध्यमांशी बोलू शकले नाही कारण मला सरकारी प्रक्रियेनुसार काम करावं लागतं. हे जेव्हा मी एका रिपोर्टरला सांगितलं तेव्हा त्यांनी माझ्या स्वभावाविषयी बोलायला सुरुवात केली."
कामाच्या दबावाचा परिणाम पोलीसांच्या वैयक्तिक आयुष्यावर होत असून आमच्या विभागात अशा अनेक महिला आहेत ज्यांना 'सिंघम'सारखे काम करायचे आहे. पण वरिष्ठांच्या दबावामुळे त्या हे करू शकत नाहीत. असंही सुनीता यादव सांगत आहेत.
हा सगळा प्रकार गेल्या आठवड्यात बुधवारी (8 जुलै) घडला. कुमार कनानींचा मुलगा प्रकाश कनानींचा मित्र बुधवारी रात्री सुरतमधल्या वरछा भागातील मार्केटमध्ये गेला होता. त्यानं मास्क घातला नव्हता. कॉन्स्टेबल सुनीता यादव यांनी त्याला अडवलं.
त्यानं फोन करून प्रकाश कनानींना घटनास्थळी बोलवून घेतल्याचं वृत्त आहे. प्रकाश यांनी सुनीता यादव यांना 365 दिवस तिथेच उभं करून ठेवेन, अशी धमकी दिल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर सुनीता यादव यांनीही प्रकाश आणि त्यांच्या मित्राची कठोर शब्दात कानउघडणी केली.
प्रकाश कनानींसोबतच्या या वादाची ऑडिओ आणि व्हीडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. "आम्ही तुमचे गुलाम नाहीये," असं सुनीता प्रकाश कनानींना सुनावताना दिसत आहेत.
हे सगळं प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलं आणि त्यानंतर सुनीता यादव यांनी राजीनामा दिला. अर्थात, PTI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार सुनीता यांची बदली ही पोलीस हेडक्वार्टर्समध्ये करण्यात आलीये.
प्रकाश कनानी आणि त्याच्या दोन मित्रांना रविवारी (12 जुलै) अटक करण्यात आली. नंतर त्यांना जामीनही मिळाला.
'अहमदाबाद मिरर'नं सुनीता यादव या आजारपणाच्या रजेवर गेल्या असल्याचं म्हटलंय. सुनीता यादव यांनी आपल्या मुलाला शिवीगाळ केल्याचं कुमार कनानींनी म्हटल्याचं अहमदाबाद मिररच्या बातमीत आहे.
"त्या रात्री सुनीता यादव यांच्याशी फोनवर बोलताना मी म्हटलं की, कायदेशीर कारवाई करा, पण शिवीगाळ करण्याची गरज नाहीये," असं अहमदाबाद मिररशी बोलताना कुमार कनानींनी सांगितलं.
सोशल मीडियावर सुनीता यांना पाठिंबा
रविवारी (12 जुलै) सुनीता यांची क्लिप व्हायरल झाली आणि लोक त्यांना सोशल मीडियावर पाठिंबा द्यायला लागले. या क्लिपमध्ये सुनीता प्रकाश कनानींना कारवरची MLA ची पाटी काढायला सांगत आहेत. पोलीस म्हणून ड्युटीवर असताना आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अडवू शकतो, असंही त्या म्हणत आहेत.
यानंतर ट्विटरवर #SunitaYadav #ISupportSunitaYadav हे हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागले. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी कुमार कनानींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली.
सोशल मीडियावर सुनीता यांना 'लेडी सिंघम' म्हणूनही संबोधलं जाऊ लागलं.
कोण आहेत सुनीता यादव?
सुनीता यादव या सुरत लोकरक्षक दलामध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत.
सुरतमधील धारुकवाला कॉलेजमधून सुनीता यादव यांनी कला शाखेतली पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात MA केलं. सध्या त्या गुजरात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहेत.
त्या NCC कॅडेट होत्या आणि त्यांना 'बेस्ट कॅडेट' म्हणूनही सन्मानित करण्यात आलं आहे 25 ऑगस्ट 2017 मध्ये त्या पोलीस खात्यात रुजू झाल्या. त्या सुरत पोलीस हेडक्वार्टरला रिपोर्ट करतात.
बुद्धिबळ खेळणं हा त्यांचा छंद आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)