You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौरव गांगुलीचं टीशर्ट काढून सेलिब्रेशन आणि मोहम्मद कैफची जिगरबाज खेळी
अठरा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीम इंडियाने 325 धावांचा यशस्वी पाठलाग करत इतिहास घडवला होता.
मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांची पार्टनरशिप आणि त्यानंतरचं सौरव गांगुली अर्थात दादाने शर्ट काढून लॉर्ड्सच्या बाल्कनीत केलेलं सेलिब्रेशन चाहत्यांच्या मनात ताजं आहे.
ठिकाण- क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सचं मैदान. टीम इंडियाला जिंकण्यासाठी 326 धावांचं आव्हान. मुकाबला शेवटच्या ओव्हरपर्यंत आलेला. 6 बॉल आणि 2 रन्स असं समीकरण. दोनच विकेट शिल्लक.
शेवटच्या ओव्हरचा पहिल्या बॉलवर एकही रन होऊ शकला नाही. आता 5 बॉल 2 हवे होते. दुसऱ्या बॉलवरही काहीच झालं नाही. अंपायर स्टीव्ह बकनर यांनी वाईड न दिल्याने झहीरने नाराजी व्यक्त केली. आता भारतीय चाहत्यांची धाकधूक वाढू लागली. हातातोंडाशी आलेला विजय इंग्लंड हिरावून घेणार की काय?
अँड्यू फ्लिनटॉफ हा कसलेला कार्यकर्ता. 4 बॉल 2. तिसऱ्या बॉलवर झहीर खानने बॉलला कव्हरच्या दिशेने ढकललं आणि तो पळत सुटला. झहीर अर्ध्या पिचपर्यंत येईपर्यंत कैफ दुसऱ्या टोकाला पोहोचला देखील. थ्रो कलेक्ट करायला कीपर जागेवर नाही हे ध्यानात येताच कैफने जीवाच्या आकांताने दुसरी रन पूर्ण केली. हे होतंय तोवर कॅमेरा लॉर्ड्सच्या प्रसिद्ध बाल्कनीवर केंद्रित झाला.
शिष्टाचाराचं केंद्र असलेल्या लॉर्ड्सवर टीम इंडियाचा तत्कालीन कर्णधार सौरव गांगुलीने टीशर्ट काढून गरागरा फिरवला. विजयाचं ते दणकेबाज सेलिब्रेशन गांगुलीचे सहकारी आणि टीम इंडियाच्या चाहत्यांसाठीही नवीन होतं. आज या घटनेला 18 वर्षं होत आहेत. परंतु अनेकांसाठी कैफची अविस्मरणीय खेळी आणि गांगुलीचं सेलिब्रेशन मनात कोरून राहिलं आहे.
गांगुली-फ्लिनटॉफ शर्ट काढण्याची परतफेड
2002 मध्येच इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर होती. सहा मॅचची वनडे सीरिज होती. कोलकात्याची पहिली मॅच टीम इंडियाने जिंकली. कटक इथं झालेली दुसरी मॅच इंग्लंडने जिंकली आणि सीरिज 1-1 अशी झाली. चेन्नई आणि कानपूर इथं झालेल्या मॅचेस जिंकत टीम इंडियाने 3-1 अशी आघाडी मिळवली. दिल्लीत झालेल्या पाचव्या वनडेत इंग्लंडने बाजी मारली. 2-3 अशी स्थिती झाल्याने मुंबईतली मॅच निर्णायक ठरली.
मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 255 रन्स केल्या. मार्कस ट्रेस्कॉथिकने सर्वाधिक 95 रन्स केल्या तर टीम इंडियातर्फे हरभजन सिंगने 5 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाचा डाव 250 धावांतच आटोपला. गांगुलीने सर्वाधिक 80 धावा केल्या होत्या. जवागल श्रीनाथला त्रिफळाचीत केल्यानंतर फ्लिनटॉफने शर्ट काढून मैदानभर धावत आनंद साजरा केला होता. मालिकेत आघाडी घेतलेली असताना सीरिज गमावल्याने हा पराभव टीम इंडियाच्या जिव्हारी लागला.
काही महिन्यातच इंग्लंड आणि टीम इंडिया नॅटवेस्ट तिरंगी मालिकेच्या निमित्ताने समोरासमोर उभे ठाकले. श्रीलंका स्पर्धेतला तिसरा संघ होता. प्राथमिक फेरीत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात तीन मॅचेस झाल्या.
एक मॅच टीम इंडियाने तर एक इंग्लंडने जिंकली. एक मॅच पावसामुळे रद्द झाली. प्राथमिक फेरीचा अडथळा पार करून टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली. 13 जुलै 2002 रोजी झालेल्या फायनलमध्ये इंग्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 325 धावांचा डोंगर उभारला.
मार्कस ट्रेस्कॉथिक आणि कॅप्टन नासिर हुसेन यांनी शतकं झळकावली. 18 वर्षांपूर्वी तीनशेपेक्षा जास्त रन्सचा पाठलाग करणं अशक्य मानलं जायचं. पण टीम इंडियाचे इरादे वेगळे होते. गांगुली-सेहवाग जोडीने 106 धावांची खणखणीत सलामी दिली.
मात्र दहा रन्सच्या अंतरात दोघेही आऊट झाले. दिनेश मोंगिया फार काळ टिकला नाही. भरवशाच्या राहुल द्रविडला रॉनी इराणीने तंबूत परतावलं. आशेचा केंद्रबिंदू असणाऱ्या सचिन तेंडुलकरला अॅशेल जाईल्सने त्रिफळाचीत केलं आणि भारतीय चाहत्यांच्या आशा मावळल्या. सचिन आऊट झाला तेव्हा टीम इंडियाची स्थिती 146/5 अशी होती.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आतूर युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ ही जोडगोळी मैदानात होती. या जोडीने एकेरी-दुहेरी धावांची रतीब घालताना चौकार-षटकारांची लयलूट करत सहाव्या विकेटसाठी 121 धावा जोडल्या.
खेळपट्टीवर स्थिरावलेल्या युवराजला पॉल कॉलिंगवूडने फसवलं. युवराजने 63 बॉलमध्ये 9 चौकार आणि एका षटकारासह 69 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. युवराज आऊट झाल्यावर सगळी जबाबदारी कैफच्या खांद्यावर आली.
हरभजन सिंगने दडपणाच्या क्षणी 15 रन्स करत कैफला मोलाची साथ दिली. पण हरभजन आणि पाठोपाठ कुंबळे आऊट झाल्याने कैफचे प्रयत्न व्यर्थ जाणार असं वाटू लागलं. परंतु कैफने झहीरला हाताशी घेत अशक्यप्राय वाटणारा विजय प्रत्यक्षात साकारला.
टीम इंडियाने 2 विकेट्स आणि 3 बॉल शिल्लक ठेऊन 326 धावा केल्या. कैफने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 75 बॉलमध्ये 87 धावांची अफलातून खेळी साकारली. फ्लिनटॉफ मुंबईत वानखेडेवर शर्ट काढून विजयाचं सेलिब्रेश करू शकतो तर आपण लॉर्ड्सवर का करू शकत नाही असा विचार सौरव गांगुलीच्या मनात आला.
कैफने विजयी धाव पूर्ण करताच गांगुलीने शर्ट काढून गरागरा फिरवला. टीम इंडियाच्या त्या जिगरबाज कॅप्टनचं सेलिब्रेश अजूनही क्रिकेटरसिकांच्या मनात ताजं आहे.
दादाचं सैराट सेलिब्रेशन
2000-2001 मध्ये भारतीय क्रिकेटवर मॅचफिक्सिंगचं झाकोळ होतं. काही खेळाडूंवर आजीवन बंदीची कारवाई झाली होती, काहींना खेळण्यापासून परावृत्त करण्यात आलं होतं. टीम इंडियाबद्दल चाहत्यांच्या मनात शंकेचं वातावरण निर्माण झालं होतं. त्या कठीण कालखंडात सौरव गांगुलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली.
गांगुलीने चाहत्यांचा विश्वास परत मिळवला. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण,जवागल श्रीनाथ, अनिल कुंबळे या दिग्गजांच्या बरोबरीने युवराज सिंग, मोहम्मद कैफ, हरभजन सिंग, आशिष नेहरा अशा युवा गँगला बरोबर घेत टीम इंडियाची नवी मोट बांधली.
मैदानावर उतरायचं ते जिंकण्यासाठी हा बाणा गांगुलीने अंगी भिनवला. जिंकण्यासाठी शंभर टक्क्यांहून जास्त प्रयत्न करायला हवेत याकडे गांगुलीने लक्ष दिलं. तोपर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका अशा संघांच्या शेरेबाजीला गांगुलीने अरे ला का रे करायला शिकवलं. आलं अंगावर तर घ्या शिंगावर ही मानसिकता रुजवली.
केवळ वाचाळपणा करून नव्हे तर खणखणीत कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ करा हे गांगुलीने स्वत:च्या प्रदर्शनातून सिद्ध केलं. टीम इंडियाने पुढच्या 20 वर्षांत देदिप्यमान कामगिरी केली, यशोशिखरं गाठली. त्याचा पाया गांगुलीने रचला. नॅटवेस्ट सीरिजमधला विजय आणि गांगुलीचं सेलिब्रेशन हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातल्या सुवर्णमयी क्षणांपैकी एक आहे.
शर्ट काढून सेलिब्रेशन हे स्टेटमेंट
"कैफने विजयी धाव घेतली आणि सौरवने टीशर्ट काढायला सुरुवात केली. मी त्यावेळी ओशाळून गेलो. त्याचा टीशर्ट खाली ओढू लागलो. मी त्याच्या बाजूलाच उभा होतो. पण सौरवने ऐकलं नाही. त्याने टीशर्ट गरागरा फिरवून विजय साजरा केला. तेव्हा लक्षात आलं नाही, पण सौरवचं सेलिब्रेशन स्टेटमेंट होतं. टीम इंडिया कुणापेक्षाही कमी नाही, आणि आता आमचा दबदबा असेल हा सौरवच्या सेलिब्रेशनचा अर्थ होता. जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या आगमनाची ती नांदी होती. टीम इंडियाने त्यानंतर अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. त्याची मुहर्तमेढ त्या विजयात होती," असं व्हीव्हीएस लक्ष्मणने 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स ' या कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं.
सचिन आऊट झाला, घरचे पिक्चर पाहायला गेले आणि कैफ हिरो झाला
या मॅचमधल्या खेळीने मोहम्मद कैफला ओळख मिळवून दिली. तो घराघरात पोहोचला. परंतु त्यामागणी कहाणी तितकीच रंजक आहे. इंग्लंडने 325 रन्स केल्यानंतर टीम इंडियाला सीनियर खेळाडूंकडून अपेक्षा होत्या. सचिन आऊट झाला तेव्हा टीम इंडियाची अवस्था 146/5 अशी अवस्था झाली. त्यावेळी 'देवदास' चित्रपट प्रदर्शित झाला होता.
कैफच्या घरचे मॅच सोडून 'देवदास' चित्रपट पाहायला गेले. काही तासात कैफने इतिहास घडवला. चाहते अलाहाबादमधल्या कैफच्या घरी जमले. पण घरी कुणीच नव्हतं. चाहत्यांनी थिएटर गाठलं.
कैफच्या घरचे बाहेर आले तेव्हा त्यांना धक्का बसला. कैफ इंग्लंडहून परतला तेव्हा त्याचं प्रचंड जल्लोषात स्वागत झालं. शहरात दाखल झाल्यानंतर घरी जाण्यासाठी कैफला तीन ते चार तास लागले.
कैफने त्याचवर्षी वनडेत पदार्पण केलं होतं. मोठे खेळाडू आहेत पण स्वत:ला सिद्ध करायचं होतं. या खेळीने युवा पिढीच्या कर्तृत्वाला झळाली मिळाली असं कैफने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)