You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार - संजय राऊत सामना मुलाखत : 'लोकशाहीचं सरकार रिमोट कंट्रोलने चालू शकत नाही’
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग 'सामना'मध्ये शनिवारी प्रकाशित करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत दावा केला होता, की भाजप आणि राष्ट्रवादी काँगेस एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्तास्थापन करणार होते. त्यावर या मुलाखतीत खुलासा करत पवार म्हणाले की, "सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णयप्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहिती नाही."
या मुलाखतीत शरद पवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, अर्थव्यवस्था, चीनसोबतचा सीमावाद अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पाहू या या मुलाखतीच्या पहिल्या भागात पवार काय म्हणाले -
1. "एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आपण सर्वांनी कोरोनासोबत जगायची तयारी ठेवली पाहिजे. कोरोना आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होतोय. त्यामुळे आता आपण हे स्वीकारायलाच हवं. प्रश्न आहे तो लॉकडाऊनचा, कारण लॉकडाऊन चिंताजनक परिस्थिती निर्माण करतो.
"पण लॉकडाऊनसोबत कायमस्वरूपी जगावं लागेल, असं नाही. मी काही तज्ज्ञांशी बोललो तर त्यांचं म्हणणं होतं, की जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून लॉकडाऊनचा ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण खाली जाईल आणि पुन्हा नॉर्मलसी येईल."
2. लॉकडाऊनसंदर्भात माझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काहीएक मतभेद नाहीये, असं पवारांनी स्पष्ट केलं. "या सगळ्या काळात माझा मुख्यमंत्र्यांशी उत्तम संवाद होता आणि आजही आहे. प्रसिद्धी माध्यमांत काय आलंय ते येऊ द्या. दोन-तीन दिवसांत मी वाचतोय की, आमच्यात म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद वाढताहेत, अशा बातम्या आहेत. त्यात यत्किंचितही सत्य नाही. पण बातम्या येताहेत. येऊ द्या."
मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा निर्णय उशिरा घेतला, असं काहींना वाटत असेल, पण त्यांनी तो योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचा पण सावधगिरीने. निर्णय घेताना दुष्परिणाम होणार नाही, याची खातरजमा करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकलं की मागे घ्यायचं नाही, ही त्यांची कार्यपद्धती आहे.
3. "कोरोनाचं एवढं मोठं संकट असताना तीन विचारांचे पक्ष, पण सगळे जण एक विचारानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहेत आणि या परिस्थितीला तोंड देत आहेत. हे घडू शकलं याचा अर्थ मला खात्री आहे, की एकदिलानं काम सुरू आहे. या तिन्ही पक्षांत यत्किंचितही नाराजी नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय.
"हा प्रयोग आणखी यशस्वी होऊन, त्याची फळं राज्यातल्या जनतेला बघायला मिळाली असती. पण कोरोनाचं संकट आलं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. गेले काही महिने राज्यकर्ते, प्रशासन सगळी यंत्रणा कोरोनाविरोधात लढण्याच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे बाकीचे प्रश्न बाजूला राहिले आहेत."
4. "महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग हा अपघात वाटत नाही. दोन गोष्टी आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवेळेस महाराष्ट्रातल्या मराठी जनतेनं देशात जे चित्रं होतं त्याच्याशी सुसंगत महत्त्वाची भूमिका घेतली. पण राज्यातला प्रश्न आला त्यावेळी महाराष्ट्रातलं चित्रं वेगळं दिसायला लागलं. ते केवळ महाराष्ट्रातच नाही, तर इतर राज्यांतही दिसत होतं. कुठे काँग्रेस सत्तेवर आली, तर कुठे इतर आघाड्या सत्तेवर आल्या. मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड या सगळ्या राज्यांत चित्र बदललं.
"लोकसभेला भाजपच्या पाठीमागे केंद्रातलं सरकार होतं, पण विधानसभेत त्यांची पीछेहाट पाहायला मिळाली. महाराष्ट्रात चित्र बदलायचा लोकांचा मूड होता."
5. "शिवसेनेची काम करण्याची एक पद्धत आहे. एखादी गोष्ट हाती घेतल्यानंतर ठोसपणानं ती राबवायची. भाजपसोबतच्या कालखंडात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागली. शिवसेनेला गप्प कसं ठेवता येईल, थांबवता कसं येईल, ही भूमिका भाजपनं घेतली. त्यामुळे शिवसेनेस मानणारा वर्ग बाजूला झाला. शिवसेनेला मानणारा वर्ग अस्वस्थ होता.
"दुसरी गोष्ट, गेल्या 5 वर्षांत राज्यात भाजपचंच सरकार आहे, अशीच स्थिती राज्यातल्या जनतेनं पाहिली. याच्याधाची युतीचं सरकार होते. 1995ला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यात हे असं वातावरण कधी नव्हतं.
याचं कारण त्याचं नेतृत्व बाळासाहेबांकडे आणि शिवसेनेकडे होतं. गेल्या सरकारात मात्र भाजपनं शिवसेनेला बाजूला केलं आणि भाजप हेच खरे राज्यकर्ते आणि पुढच्या कालखंडात राज्य भाजपच्या नेतृत्वाच्या विचारानेच चालणार ही भूमिकी घेऊन त्यांनी पावलं टाकली. महाराष्ट्रातल्या जनतेला हे पटत नव्हतं."
6. "कुठल्याही राजकीय नेत्यानं 'मी पुन्हा येईन' किंवा मीच येणार, ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायचं नसतं. अशा गृहीत धरण्यात थोडासा दर्प आहे, अशी भावना लोकांच्यात निर्माण झाली आणि यांना धडा शिकवला पाहिजे, हा विचार लोकांमध्ये पसरला."
7. "विधानसभेला भाजपच्या आमदारांची जी 105 संख्या झाली, त्यात शिवसेनेचं योगदान मोठं आहे. त्यातून तुम्ही शिवसेना वजा केली तर हा आकडा तुम्हाला 40-45 च्या आसपास दिसला असता. भाजपचे लोक सांगतात की आम्हाला शिवसेनेनं दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं, पण ज्यांनी भाजपाला 105 पर्यंत पोहोचवलं, त्यांना भाजपनं गृहीत धरलं."
8. "महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग आम्ही केला. त्यावेळी मोरारजी देसाई पंतप्रधान होते. ते महाराष्ट्रातल्या पुलोदच्या सरकारला पूर्णपणे मदत करत होते. पण पुलोदच्या वेळेला जसा केंद्राचा पाठिंबा होता, तसा महाआघाडीच्या वेळेला असल्याचं मला दिसत नाही."
9. "मी या सरकारचा हेडमास्तरही नाही आणि रिमोट कंट्रोलही नाही. हेडमास्तर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासनं हे रिमोटनं कधीच चालत नाही. महाराष्ट्रातलं सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळच चालवत आहे," असं पवार या मुलाखतीत म्हणाले.
(या मुलाखतीचा दुसरा भाग रविवारी 12 जुलै आणि तिसरा भाग सोमवारी 13 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)