कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन नंतरच्या जगात आता प्रेम, रोमांस आणि सेक्स?

फोटो स्रोत, Puneet Barnala
- Author, चिंकी सिन्हा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
असं म्हणतात प्रेम हे व्हायरसपेक्षाही मोठं आहे. कदाचित हेच प्रेमाचं भविष्य असेल.कोव्हिडच्या जागतिक साथीनंतरही ते टिकून राहील. बाकीच्या गोष्टींचं भविष्य इतर विविध बाबींवर अवलंबून असताना प्रेमाचं भविष्यं मात्र भावना आणि तत्त्वांवर अवलंबून आहे.
"आता फक्त व्हर्च्युअली, इमोशनली किंवा आध्यात्मिकरीत्याच प्रेम करता येईल. प्रेम आणि सेक्स या आता वेगळ्या गोष्टी आहेत," दिल्लीस्थित पप्स रॉय सांगतात.
लोक परिस्थितीनुसार बदलतात. आपण असेच भविष्यासाठी तयार होतो. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी झालेल्या लॉकडाऊनमुळे 'डेटिंग' करण्याच्या पद्धतींत मोठा बदल झाला असल्याचं डेटिंग अॅप्सनी म्हटलंय.
गेल्या काही वर्षांमध्ये ही अॅप्स लोकप्रिय झाली आहेत. लॉकडाऊनच्या काळात व्हिडिओ डेटिंगचं प्रमाण वाढल्याचं eHarmony, OKCupid आणि Match सारख्या अॅप्सनी म्हटलंय.
आता जगभरातल्या देशांमध्ये जवळपास प्रत्येक आठवड्याला विविध निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. ग्राहकांना, विशेषतः प्रेमिकांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी रेस्टॉरंट्स आणि कॅफेजही नवनवीन कल्पना लढवत आहेत, म्हणूनच कदाचित 'डेट नाईट्स'ही पुन्हा होताना दिसतील फक्त यावेळी फिजीकल डिस्टन्सिंग पाळावं लागेल किंवा कदाचित ग्लास शील्ड्सचा वापर करावा लागेल.

फोटो स्रोत, Puneet Barnala
रॉय सध्या त्यांच्या घरीच अडकले आहेत. सोबतीला आहे फक्त त्यांचा फोन. ते ज्या प्रेमाच्या शोधात आहे, ते बाहेर कुठेतरी असल्याचं ते सांगतात. "तुम्हाला इतकंच करायचंय की आतापर्यंतची आपली प्रेम करण्याची पद्धत बदलायची आहे," ते सांगतात.
लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगदी थोड्या दिवसांपूर्वी रॉय यांनी विकेंडसाठी हिलस्टेशनला बुकिंग केलं होतं. आपलं प्रेम ज्या व्यक्तीवर आहे, तिच्यासोबत वेळ घालवण्याचा त्यांचा इरादा होता. पण लॉकडाऊन लागला आणि ते महिन्याभरापेक्षा जास्त काळ तिथेच अडकून पडले.
या काळात त्यांच्या या व्यक्तीविषयीच्या आणि प्रेमाविषयीच्या कल्पनांना सुरुंग लागला होता. एकमेकांच्या अतिसंपर्कात आल्याने दोघे एकमेकांपासून दूर गेले. आता दिल्लीत परतल्यानंतर त्यांचा फोन त्यांचा सहारा आहे. यावरून ते त्यांच्या प्रेमिकांच्या संपर्कात राहतात, बहुतेकदा त्यांच्याशी चॅट करतात. कधी कधी व्हिडिओद्वारेच शारीरिक भावनाही व्यक्त केल्या जातात. भविष्यातल्या प्रेमाच्या संकल्पनांमध्ये किमान कल्पनाशक्तीला तरी खीळ बसणार नाही.
धर्माचं भविष्य वा पर्यटनाचं भविष्य, याबद्दल बोलताना त्याचा संबंध अनेकदा भौतिक गोष्टींशी असतो. देवळं पुन्हा उघडली आहेत. शाळाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. अगदी काही नियमांचं पालन करून प्रवासालाही परवानगी मिळेल.

फोटो स्रोत, Puneet Barnala
पण प्रेमाचं काय? इथे सगळंच वेगळं असतं. युकेमध्ये लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच तिथल्या सरकारने प्रेमी जोडप्यांना एक सल्ला दिला होता. एकमेकांच्या घरी ये-जा करताना व्हायरसचा प्रसार होऊ नये, म्हणून जोडप्यांनी एकत्र रहावं, असा सल्ला सरकारने दिला होता.
तर एकटं राहणाऱ्या लोकांनी 'सेक्स बडी' शोधावा असं डच सरकारने म्हटलं होतं. पण असं करताना 'या दोन्ही व्यक्ती किती लोकांना भेटणार आहेत याविषयी योग्य तोडगा काढावा, कारण तुम्ही जितक्या जास्त लोकांना भेटाल, तितकी कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता जास्त', असंही डच सरकारने म्हटलं होतं.
डच सरकारच्या या सूचनांमध्ये 'स्वतःसोबतच सेक्स करणं किंवा अंतर राखून इतरांसोबत सेक्स', 'इरॉटिक कथा' आणि 'एकत्र हस्तमैथुन' यासारख्या पर्यायांचाही समावेश होता.
व्हिडिओ चॅट्स आणि फोन सेक्स आता 'न्यू नॉर्मल'चा भाग झाले आहेत.
रेस्टॉरंट्स बंद असल्याने सध्या डिनर डेट्स शक्य नाहीत. पण लग्नं, डेटवर जाणं आणि अगदी सेक्सही आता व्हर्च्युअली होत आहे. हे भविष्य काहीसं भयावह असलं तरी या गोष्टी नेहमीच बदलत असतात.

फोटो स्रोत, Puneet Barnala
20 एप्रिलचा दिवस... बंगळुरू शहरातल्या आपल्या घराच्या बाल्कनीतल्या टेबलपाशी 33 वर्षांचा एक तरुण बसला होता. टेबलवर छानशी मेणबत्ती लावली होती आणि समोर वाईनचा ग्लास होता. बंबल या डेटिंग अॅपच्या व्हिडिओ चॅटवरची ही एक 'डेट' होती.
कॅलबने (नाव बदलण्यात आलंय) यापूर्वीही डेटिंग ऍप्स वापरली होती. पण यापूर्वी या ऍप्सवर इतका वेळ कधी घालवला नव्हता. यापूर्वी ते त्यांच्या स्टार्ट-अप कंपनीच्या कामात कायम गुंतलेले असत. पण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी जोडीदार शोधण्यासाठी या ऍप्सवर जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. सुरुवातीला हाय-हॅलो आणि थोडंसं चॅटिंग, इथपासून सुरुवात झाली. आता मोठी संभाषणं, गप्पा होतात.
यासगळ्यानंतर हा 'डेट'चा दिवस आला. कॅलेब त्याच्या बाल्कनीत आणि ती तिच्या घराच्या बाल्कनीत. 40 मिनिटांची ही व्हिडिओ डेट होती. नंतर मग लॉकडाऊन थोडा शिथील करण्यात आल्यानंतर ते दोघे प्रत्यक्ष भेटले. यावेळी त्याच्या घराच्या गच्चीवर. ती मास्क लावून आली, त्यांनी एकमेकांना अलगद अलिंगन दिलं. 'ती एक अवघडलेली गळाभेट' असल्याचं कॅलेब सांगतात. कदाचित गोष्टी पुढे सरकतील, असं त्यांना वाटतंय.
"प्रत्येकजण कोणा ना कोणाच्या शोधात आहे. कदाचित लोक सध्या संवाद साधायला तयार आहेत. आम्ही व्हायरसबद्दल बोलणं शक्यतो टाळतो पण सध्याच्या काळातल्या मनःस्थितीबद्दल बोलतो. या साथीच्या काळात लोकांची मनःस्थिती कसी आहे हे मला माहिती आहे. काहीही चूक करून मला तडजोड करायची नाही," ते सांगतात.
दिल्लीत लाईफ कोच म्हणून काम करणाऱ्या आशिष सहगल यांना सध्या अनेक जोडप्यांचे फोन येतायत. असी जोडपी ज्यांच्यात ताण निर्माण झालाय. पहिले काही आठवडे शांत गेल्यानंतर त्यांना हे कॉल्स यायला सुरुवात झाली.
"प्रेमाची संकल्पना अधिक मजबूत होतेय. कारण भीतीदायक काळात प्रेम वाढतं."
या प्रेमाशी संबंधित काही गोष्टी होण्याचा अंदाज ते व्यक्त करतात. म्हणजे लग्नांची, घटस्फोटांची संख्या वाढेल आणि जन्माला येणाऱ्या मुलांचं प्रमाणही वाढणार असल्याचं ते सांगतात. या सगळ्याच गोष्टी विरोधाभासी आहेत. पण प्रेमाचा भविष्यकाळही असाच असणार आहे.
"एकटं वाटत असणाऱ्यांची संख्याही वाढतेय," ते सांगतात.
ही अशी बाब आहे जिच्या भविष्यासाठीची कोणतीही धोरणं ठरवली जाऊ शकत नाहीत. म्हणजे काही देशांनी दिलेल्या सूचना किंवा व्हायरॉल़ॉजिस्टनी दिलेल्या खबरदारीचा अपवाद वगळता. यामुळेच यात मोठे बदल होत आहेत.
"HIV किंवा AIDS मुळे लोक प्रेम करायचे थांबले नाहीत. उलट एरवीपेक्षा लोक आत्ता प्रेमाच्या जास्त शोधात आहेत."
साथीच्या या काळात शारीरिक जवळीक ही फक्त मनातच राहते, आपल्याकडे 'मोरॅलिटी ब्रिगेड' असल्याने सेक्स बडीसारखी कल्पना मांडणं आपल्याकडे कठीण असल्याचं ते सांगतात.
पण मास्क घालणं हे HIV / AIDS टाळण्यासाठी काँडोम वापरण्यासारखं नाही. मुंबईच्या कामाठीपुऱ्यातल्या एका सेक्स वर्करशी मी फोनवरून बोलले. अनेक सेक्स वर्कर्स या व्हिडिओ कॉल्सवरून 'क्लायंट्स' घेत असल्याचं आपण ऐकल्याचं या महिलेने सांगितलं. पण त्यांचा या पर्यायावर फारसा विश्वास नाही.
"HIV/AIDS ची गोष्ट वेगळी होती. एक काँडोम पुरेसं होतं. पण हा व्हायरस स्पर्शातून पसरतो. आणि स्क्रीन हा स्पर्शाला पर्याय ठरू शकत नाही," त्या सांगतात.
क्लायंटबद्दल अधिक जाणून घेणं वा अर्थपूर्ण संभाषण यात आपल्याला रस नसल्याचं नेहा (नाव बदलण्यात आलं आहे) सांगतात. सेक्स हे त्यांच्यासाठी काम आहे. आणि सध्या ते करता येत नाहीये.
28 वर्षांच्या नंदिता राजेंचा 'मेबल इंडिया' कपड्यांचा ब्रँड आहे. त्या सिंगल आहेत आणि आता लोकांना भेटण्याविषयी आपल्या मनात काहीशी शंका निर्माण झाल्याचं त्या सांगतात.
"माझ्यासाठी सध्या प्रेमाचं भविष्य अंधारं आणि निरस वाटतंय," त्या सांगतात.
सध्या कोणालाही इतर कुठे भेटणं शक्य नसल्याने अनेकजणांनी ऑनलाईन डेटिंगचा पर्याय स्वीकारलाय, आणि आता त्यातही बदल होतायत.
झॅक श्लीन यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये फ्लिटर ऑफ ही व्हिडिओ डेटिंग सेवा लाँच केली. मग फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा - रीलाँच केला. व्हर्च्युअल डेटिंग हेच भविष्य असल्याचं ते सांगतात.
फिल्टर ऑफवर 90 सेकंदाच्या व्हिडिओ डेटद्वारे तुम्ही समोरच्या व्यक्तीशी आपलं पटणार का, याचा अंदाज घेऊ शकता. जर तुम्हाला ही व्यक्ती आवडली आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडलात तर मग या ऍपवरून तुम्ही टेक्स्ट वा व्हिडिओ मेसेज पाठवू शकता.
"आणि मग लॉकडाऊन संपला की तुम्ही मग कदाचित या गोष्टी ऑफलाईन करू शकाल," ते सांगतात.
लॉकडाऊनच्या या काळात भारतातल्या आधीपासूनच्या आणि नवीन युजर्सकडून वापर वाढल्याचं 'बंबल' या डेटिंग ऍपने म्हटलंय.
13 मार्चला संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत 27 मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये नवीन पिढीद्वारे ऍपवर 11% जास्त नोंदणी करण्यात आल्याचं Bumble ने म्हटलंय.
"एकट्या भारतातच आमचा साधारण व्हिडिओ वा फोन कॉलचा वेळ आहे 18 मिनिटं. याचाच अर्थ युजर्सना या माध्यमातून चांगली नाती जोडता येत आहेत आणि सोशल डिस्टंसिंगच्या या काळात एकमेकांना जाणून घेता येतंय," बंबलने सांगितलं.

फोटो स्रोत, Puneet Barnala
या ऍपने सध्या 'स्टे फार अँड गेट क्लोज' ही मोहीम सुरू केलीय. एखाद्या नात्याची सुरुवात घरून करण्याला ते प्रोत्साहन देतायत. टिंडरसकट बहुतेक सगळ्या डेटिंग ऍप्सच्या वापरात गेल्या काही आठवड्यांत वाढ झालीय.
'सिर्फ कॉफी' हे डेटिंग ऍप जगभरातल्या भारतीयांना त्यांच्या आवडीचे जोडीदार शोधायला मदत करण्याचा दावा करतं.
"माणसाला एकमेकांसोबत नातं जोडण्याची एक आंतरिक ऊर्मी असते. जागतिक साथीच्या या काळात आपलं आजूबाजूच्या घडामोडींवर नियंत्रण नसताना जोडीदार असावा ही इच्छा अधिक प्रबळ होते," सिर्फ कॉफीच्या एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडंट नैना हिरानंदानी सांगतात.
त्यांच्याकडे चौकशी होण्याचं प्रमाण 40% नी वाढलंय तर मार्च 2020पासून त्यांच्या युजर्समध्ये 25% वाढ झालेली आहे.
पण भारतामध्ये अजूनही संभाव्य जोडीदार वा प्रेमिकाला व्हर्च्युअल कॉल करण्याबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका आहे. "पण असं असलं तरी कोव्हिडनंतरच्या जगात आपल्या जगण्यात, काम करण्याच्या पद्धतीत बदल होणार असल्याचं जवळपास 80% सदस्यांनी स्वीकारलं आहे," त्या सांगतात.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांच्या मुंबई, दुबई आणि लंडनमधल्या टीम्स आपापल्या घरून काम करत असून त्यांनी जगभरात आतापर्यंत 500 व्हर्च्युअल डेट्स घडवून आणल्या आहेत.
पण या गोष्टींबद्दल अनेकांना शंकाही आहेत. मुंबईत राहणारे 39 वर्षांचे करण अमीन ऍडव्हर्टायजिंग क्षेत्रात काम करतात. कंटाळा आल्याने आपण डेटिंग ऍपवर आल्याचं अनेक जणांच्या डेटिंग ऍपवरच्या प्रोफाईलमध्ये वाचल्याचं ते सांगतात.
"अनेकांनी टिंडरचा 'हुक-अप' साईट म्हणून वापर केला, आणि आता तुम्ही घराबाहेर पडू शकत नाही."
लॉकडाऊननंतरच्या भविष्याबद्दल त्यांनी ते चॅट करत असलेल्या एका मुलीला विचारलं. पुढचे 6 महिने आपण कोणाला स्पर्शही करणार नसल्याचं तिने सांगितलं.
"म्हणजे आता कोव्हिड 19 निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र घेऊन फिरायचं का? जर भेटणंच शक्य नसेल तर मग ऍपवर मॅच करण्यात काय अर्थ आहे? मी काही फक्त न संपणाऱ्या चॅटिंगसाठी डेटिंग ऍप इन्स्टॉल केलेलं नाही," ते सांगतात.
'ग्रिंडर' हे ऍप वापरणाऱ्यांमध्ये गे युजर्सची संख्या जास्त आहे. यामध्ये एक वेगळं गॅप फीचर आहे जे तुम्हाला एखादी व्यक्ती किती अंतरावर आहे ते दाखवतं. पण सध्या ही अंतरं वाढलेली आहेत. 2009 मध्ये या ऍपची सुरुवात झाली. गंमतीची गोष्ट म्हणजे या ऍपचा आयकन हा मास्कसारखा आहे.
आपलं भविष्यंही असं मास्कधारी असल्याचं नोयडातील एकजण सांगतात. ते गे आहेत आणि त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांचं नाव छापणार नाही.
"सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. आम्हाला HIV/AIDS ची भीती होतीच आणि आता हा व्हायरस आलाय," ते सांगतात.
आणि जरी लस आली तर मनात कोणतीही शंका न येता लोकांनी एकमेकांना मिठी मारायलाही मोठा काळ जाईल. पण काहीही असलं तरी सेक्स, प्रेम आणि रोमान्सच्या संकल्पनांमध्ये मात्र कायमचे काही बदल होणार आहेत.
जोडप्यांसाठीही हा काळ कठीण होता. हजर असणं आणि गैरहजर असणं हे दोन्ही महत्त्वाचं असल्याचं सहगल सांगतात.
"आता समोरची व्यक्ती नेहमीपेक्षा जास्त हजर आहे, आणि तुम्हाला त्याची सवय नाही," ते सांगतात.
काही वृत्तांनुसार घटस्फोटांचं आणि कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे.
नोव्हेंबर 2018 मध्ये अनुपम कॉम्प्लेक्समधल्या एका लहानशा दुकानात दिशी (नाव बदलण्यात आलं आहे) एका व्यक्तीला भेटली. त्यांची टिंडरवर ओळख झाली होती. मार्च 2019पासून ते एकत्र राहू लागले. दिशी बायसेक्शुअल आहे आणि लिव्ह-इन नात्याला सुरुवात करण्यापूर्वी दोघांमध्ये याविषयी बोलणं झालं होतं.
"आम्ही या नात्याची सुरुवात केली, तेव्हाच इतर पर्यायांबद्दल बोललो होतो. माझ्यादृष्टीने हे नातं मजबूत झालंय. आम्ही काही मर्यादा आखून घेतल्या. माझ्यामते नातं टिकण्यासाठी हे महत्त्वाचं असतं," त्या सांगतात.
***

फोटो स्रोत, Puneet Barnala
लोकांमध्ये वाढलेल्या या जवळिकीमुळे कडोम आणि गर्भनिरोध गोळ्यांचा खप वाढलेला आहे. डिसेंबर 2020 मध्ये 'कोरोना व्हायरस बूम'मधली बाळं जन्माला येतील आणि 2033 मध्ये एक आख्खी पिढी 'Quaranteen' असेल.
भारतामध्ये काही लग्न झूमवरून झाली. अहदी सोशल डिस्टंसिंग पाळत आणि मर्यादित पाहुणे बोलवत लग्न करणंही आता रुळलंय.

फोटो स्रोत, Puneet Barnala
म्हणजेच खरंतर ज्या गोष्टी भविष्यात होतील असं आपण म्हणत होतो, त्या होऊ लागलेल्या आहेत. आणि आपण त्यांच्याशी जुळवून घेतलंय. सगळंकाही 'नॉर्मल' होण्याची वाट काहीजण पाहत असतानाच इतर जण या 'व्हर्च्युअल' प्रेमाच्या जगाचा आनंद घेत आहेत.
साथीच्या या काळात अनेक जणांना काही नवीन नाती, अनोख्या पद्धती गवसतील. फक्त त्यासाठी आपण तयार असायला हवं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









