पतंजली कोरोनिल : रामदेव बाबा यांच्या कोरोना व्हायरस वरच्या 'औषधा'मागचं सत्य

बाबा रामदेव

फोटो स्रोत, THE INDIA TODAY GROUP

    • Author, नितीन श्रीवास्तव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जगभरात थैमान घालणाऱ्या कोव्हिड-19 आजारावरची लस किंवा औषध कधी येतं, याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे.

भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 आजारावरील लस किंवा औषधावर संशोधन आणि चाचण्या सुरू आहेत. त्यातच रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने 'कोरोना बरा करणारी औषधं' शोधल्याचा दावा केला.

मात्र केंद्र सरकारने हे औषध लगेचच थंड बस्त्यात टाकलं. आणि नंतर स्वतः पतंजलीने आपण असा दावा केला नसल्याचं सांगत हे फक्त प्रतिकारशक्ती वाढवणारं आहे, असं म्हटलं आणि तशी विक्री करण्याची परवानगी मिळवली.

मात्र तोवर पतंजली कंपनीविरोधात 'औषधाच्या नावाखाली फ्रॉड' केल्याचा आरोप करणारी FIRसुद्धा दाखल करण्यात आली.

समजून घेऊ या नेमका हा गोंधळ काय आहे.

औषध किंवा लस आणण्यासाठी काय करावं लागतं?

सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारतात कुठल्याही औषधाच्या क्लिनिकल ट्रायलची प्रक्रिया काय असते. सर्वात आधी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (म्हणजेच DGCI)ची परवानगी घ्यावी लागते.

त्यानंतर ज्या संस्थांमध्ये क्लिनिकल ट्रायल होतील त्या सर्व संस्थांच्या एथिक्स कमिटींची परवानगी आवश्यक असते.

कोरोना
लाईन

यानंतर क्लिनिकल ट्रायल करणाऱ्या कंपनीला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या देखरेखीखाली चालवण्यात येणाऱ्या 'क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री - इंडिया' (CTRI) नावाच्या वेबसाईटवर ट्रायलसंबंधी संपूर्ण प्रक्रिया, साधनसामुग्री, नाव, पत्ता आणि निधी असे सगळे तपशील द्यावे लागतात.

बीबीसी हिंदीकडे CTRI वेबसाईटवर नोंदणी केलेल्या फॉर्मची (CTRI/2020/05/025273) कॉपी आहे. यात पतंजली रिसर्च इन्स्टिट्युट, हरिद्वारने 'कोरोना विषाणूच्या आजारावरील उपचारात आयुर्वेदिक औषधांच्या परिणामासंबंधी' करण्यात येणाऱ्या क्लिनिकल ट्रायलची हमी दिलेली आहे.

कोरोनील

फोटो स्रोत, Pti

या कागदपत्रांनुसार पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने 20 मे 2020 रोजी CTRI वेबसाईटवर नोंदणी केली होती. यात लिहिलं आहे की या क्लिनिकल ट्रायलसाठी कोव्हिड-19 च्या पहिल्या रुग्णाचं एनरोलमेंट 29 मे 2020 रोजी करण्यात आलं.

क्लिनिकल ट्रायल सुरू झाल्याच्या अवघ्या 25 दिवसानंतरच म्हणजेच 23 जून 2020 रोजी योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने एक पत्रकार परिषद घेत 'कोरोनील टॅबलेट' आणि 'श्वासारी वटी' अशी दोन औषधं जगासमोर सादर केली.

पतंजलीच्या ट्रायल फॉर्मची प्रत
फोटो कॅप्शन, पतंजलीच्या ट्रायल फॉर्मची प्रत

या पत्रकार परिषदेत पतंजलीने दावा केला होता की 'या औषधांनी कोव्हिड-19 वर उपचार करता येतील.' पतंजलीने असंही म्हटलं होतं की त्यांनी या औषधांची क्लिनिकल ट्रायल घेतली आहे आणि कोरोनाग्रस्त रुग्णांवर या औषधांचे 100% सकारात्मक परिणाम दिसले.

पतंजलीचं घूमजाव

पजंतलीने घोषणा केल्याच्या काही तासातच केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने आपल्याला या विषयाची कसलीच माहिती नसल्याचं म्हटलं. पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड कंपनीला औषधांची नावं आणि त्यातले घटक सांगण्याचे आदेश देण्यात आले.

पतंजलीकडून सॅम्पल साईज, जिथे ट्रायल घेण्यात आले त्या लॅब किंवा हॉस्पिटल्सची नावं, आणि एथिक्स कमिटीच्या परवानगी पत्रासह इतर महत्त्वाची माहिती देण्यासही सांगण्यात आलं.

त्यानंतर लगेच आयुष मंत्रालयाने या औषधाच्या प्रसार-प्रचारावर बंदी घातली.

पतंजलीच्या ट्रायल फॉर्मची दुसरी प्रत
फोटो कॅप्शन, पतंजलीच्या ट्रायल फॉर्मची दुसरी प्रत

मात्र, बुधवारी पतंजलीने एक प्रेस नोट काढत नवा दावा केला. या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे, "आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार दिव्य कोरोनिल टॅबलेट, दिव्य श्वासारी वटी आणि दिव्य अणू तेल ज्यांना स्टेट लायसंस अथॉरिटी, आयुर्वेद-युनानी सर्विसेस, उत्तराखंड सरकारकडून उत्पादन आणि वितरण करण्याची पतंजलीला जी परवानगी देण्यात आली आहे, त्यानुसार आता आम्ही ही औषधं संपूर्ण भारतात सुनियोजितपणे कार्यान्वित करू शकू."

कोव्हिड-19 संसर्गातून 'रुग्णांना बरं करण्याच्या' आपल्या जुन्या दाव्याचा पुनरुच्चार पतंजलीने केला नाही. आता पतंजलीचं म्हणणं आहे 95 कोरोनाग्रस्तांवर त्यांच्या स्वेच्छेने ट्रायल घेण्यात आली. यातल्या 45 जणांना पतंजलीची औषधं देण्यात आली, तर 50 रुग्णांना प्लेसिबो देण्यात आलं.

"ही आयुर्वेदिक औषधांची कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर करण्यात आलेली पहिली क्लिनिकल कंट्रोल ट्रायल होती आणि आता आम्ही या औषधांच्या मल्टिसेंट्रिक क्लिनिकल ट्रायलच्या दिशेने अग्रेसर आहोत."

पतंजलीच्या ट्रायल फॉर्मची तिसरी प्रत
फोटो कॅप्शन, पतंजलीच्या ट्रायल फॉर्मची तिसरी प्रत

हे स्पष्टीकरण जारी करण्याच्या आदल्या दिवशी पतंजलीने घूमजाव करत म्हटलं होतं, "आम्ही कोरोना किट बनवण्याचा दावा कधीही केला नव्हता."

अनेक प्रश्न अनुत्तरित

मात्र, अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

पहिला प्रश्न असा उद्भवतो की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पतंजलीची आयुर्वेदिक औषधं देण्यात आली त्या सर्व औषधांचा डोस सर्वांगाने योग्य होता का?

तज्ज्ञ सांगतात की कुठल्याही औषधाचं ट्रायल घेताना त्या औषधाचं प्रमाण बदलता येत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या रुग्णावर ताप कमी करण्यासाठी पॅरासिटॅमॉल टॅबलेटची ट्रायल सुरू असेल तर औषधाचे सर्व डोस सारखे असायला हवे.

मग औषधात त्याचं प्रमाण 10 एमजी, 12 एमजी, 15 एमजी कितीही असो. त्यानंतरच हे कळू शकतं की ताप नेमका कोणता डोस नियमित घेतल्याने कमी झाला. आमची औषधं आयुर्वेदिक असल्याचं पतंजलीचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या औषधांचं प्रमाणही सारखंच असायला हवं.

यालाच जोडून दुसरा प्रश्न आहे की कोव्हिड-19 च्या 95 रुग्णांवर करण्यात आलेल्या ट्रायलच्या आधारावर 'ही कोरोनावरील औषधं आहेत', असा दावा करणं योग्य आहे का? शिवाय घाई गडबडीत 130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशात औषध लॉन्चही करण्यात आलं.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) माजी प्रमुख एन. आर. के. गांगुली यांच्या मते, "क्लिनिकल ट्रायल एक दीर्घ प्रक्रिया असते, आणि यावर केवळ औषधाचंच भविष्य नाही तर त्या रुग्णांचंही भविष्य अवलंबून असतं, ज्यांच्यावर ह्युमन ट्रायल होतात."

पतंजली रिसर्च सेंटरकडून अजूनतरी या प्रश्नाचं उत्तर मिळू शकलेलं नाही की फक्त 25 दिवसांमध्ये आणि केवळ 95 कोरोनाग्रस्तांवर करण्यात आलेल्या ट्रायलच्या आधारावर 'कोरोनील टॅबलेट' आणि 'श्वासारी वटी' नावाच्या दोन औषधांना कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजारावरील 'आयुर्वेदिक उपचार' असल्याचं सांगून लॉन्च का करण्यात आलं?

पतंजली वेबसाईटने CTRI वेबसाईटवर नोंदणी केलेल्या आपल्या फॉर्ममध्ये लिहून दिलं होतं की क्लिनिकल ट्रायलचा कालावधी दोन महिन्यांचा असेल.

बाबा रामदेव

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

तिसरा प्रश्न, त्या परिस्थितीवर आहे ज्यात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले. पतंजलीचं म्हणणं आहे की सर्वच्या सर्व 95 ट्रायल जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंस अँड रिसर्चच्या देखरेखीखाली झाल्या.

ICMRच्या CTRI वेबसाईटवर नोंदणी करताना पतंजली आयुर्वेदने म्हटलं होतं की ते आपल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये कोरोनाच्या 'मॉडरेटली सिम्प्टोमॅटिक' रुग्णांचा समावेश करतील. मात्र, तसं झालं नाही.

'कोरोनील' औषधाच्या ट्रायलशी संबंधित एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला सांगितलं, "ट्रायलमध्ये समावेश करण्यात आलेल्या रुग्णांचं वय 35-45 होतं आणि यापैकी बरेचसे रुग्ण असिम्प्टोमॅटिक म्हणजेच लक्षणं नसणारे होते किंवा त्यांना अत्यंत सौम्य स्वरुपाची लक्षणं होती."

पतंजलीने ट्रायलविषयी माहिती का दिली नाही?

एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की ट्रायलमध्ये त्या रुग्णांचा समावेश नव्हता ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखा त्रास होता.

हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातल्या दिग्गज वैद्यकीयतज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे दोन्ही किंवा यापैकी एक त्रास असेल तरी तो कोरोनाग्रस्तासाठी घातक ठरू शकतो.

या प्रश्नाचंही उत्तर मिळू शकलं नाही की ज्या रुग्णांवर पतंजलीने क्लिनिकल ट्रायल केल्या ते रुग्ण आधी कुठली औषधं घेत होते का? हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण आयसीएमआरने (ICMR) कोरोनाग्रस्तांसाठीच्या औषधांची यादी दिली आहे.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आयुर्वेदिक औषधांच्या आधी हे रुग्ण इतर कुठली अॅलोपिथिक औषधं घेत असतील तर कोणत्या औषधांचा परिणाम झाला, हे कसं कळणार.

सुप्रसिद्ध सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ दिनेश ठाकूर यांनीही पतंजलीच्या क्लिनिकल ट्रायलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते विचारतात, "इतक्या कमी रुग्णांवर केलेल्या क्लिनिकल ट्रायलच्या आधारावर तुम्ही कोरोनावरील उपचाराचा दावा कसा काय करू शकता?"

बाबा रामदेव

फोटो स्रोत, MONEY SHARMA

सरतेशेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की पतंजली रिसर्च इन्स्टिट्युटने CTRI वेबसाईटवर मे महिन्यात नोंदणी केली होती आणि कोरोनाग्रस्तांवर क्लिनिकल ट्रायल सुरू होत्या तर मग DGCI आणि ICMR यांना कोणत्या रुग्णांवर उपचार झाले, याची माहिती का मिळाली नाही?

भारतातल्या सर्व कोरोनाग्रस्तांची यादी केवळ ICMR नाही तर राज्यांचे कोव्हिड-19 नोडल अधिकारी, जिल्हा प्रशासन आणि मुख्य आरोग्य अधिकारी यांच्याकडेही असते.

पतंजलीची कोरोना किट बाजारात येताच आयुष मंत्रालयाने कारवाई केली, हे खरं असलं तरीसुद्धा हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे की या ट्रायलचे निष्कर्ष जनतेसमोर मांडण्यापूर्वी त्यांनी आयुष मंत्रालयाची परवानगी का घेतली नाही?

राहता राहिला प्रश्न अशा औषधांच्या ट्रायलचा ज्या थेट बाजारात येऊ शकतात तर असे निर्णय घेणाऱ्या संस्थांशी संबंधित लोकांचं म्हणणं आहे, "नियम-कायदे आपल्याजागी योग्य आहेत आणि पुढेही असतील."

ICMRचे माजी महासंचालक व्ही. एम. कटोच म्हणाले, "CTRIमध्ये औषध ट्रायलसाठी नोंदणी करण्याचा उद्देश एकच आहे - सर्व प्रोटोकॉल फॉलो करा. भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हे अनिवार्य केलं आहे. त्यामुळे कुणीही याचं उल्लंघन करू शकत नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)