कोरोना व्हायरस: गोमूत्र प्यायल्यानं कोरोनापासून रक्षण होतं का?

फोटो स्रोत, RAJU SANADI/BBC
गाईच्या तुपाचा आणि मूत्राचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करावा, त्याचा खूप मोठा परिणाम होईल, असं मत शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.
'गोमूत्र आणि गाईचं तूप तीव्र जंतूनाशक आहे. त्यामुळे दर 3 ते 4 तासानं तूप नाकात फिरवलं, गोमूत्र दिलं तर कोरोनाचे रुग्ण फार लवकर बरे होईल,' असंही भिडे यांनी म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक अजब सल्ले दिले जात आहेत. त्यापैकी गोमूत्र पिणे हा एक आहे. पण गोमूत्र प्यायल्यानं कोरोना व्हायरसवर मात करता येते का?
बीबीसीनं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.
गोमूत्र आणि शेण
भारतात अनेक आजारांवर गोमूत्र किंवा शेणाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. अलीकडेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खासदार सुमन हरीप्रिया यांनी कोरोना व्हायरसचा इलाज करण्यासाठी गोमूत्राचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, "गाईच्या शेणाचे अनेक फायदे आहेत. कोरोना व्हायरसवरही यामुळं मात करता येईल, असं मला वाटतं. त्यासाठी गोमूत्राचाही वापर होऊ शकतो."
त्याचबरोबर, कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून गोमूत्राला प्रोत्साहन देण्यासाठी एका समूहाने दिल्लीत गोमूत्र पिण्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता.
दरम्यान, गोमूत्राच्या अँटी-बॅक्टेरियल गुणांविषयी याआधीही संशोधन करण्यात आलं आहे. पण, दिल्लीतल्या Indian Virological Society (IVS) चे डॉ. शैलेंद्र सक्सेना यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं, "आतापर्यंत असा एकही मेडिकल पुरावा सापडलेला नाही ज्यामध्ये गोमूत्रात अँटी-व्हायरलचे गुण आहेत. तसंच गाईच्या शेणाचंही आहे. त्याचा वापर केला तर ते अंगलटही येऊ शकतं. कारण, कुणास ठाऊक त्यामध्ये कोरोनाव्हायरस असूही शकतो"

- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा -कोरोना व्हायरस महाराष्ट्रात असा पसरला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

दुसरीकडं, मुंबईस्थित काऊपॅथी हे ऑनलाईन स्टोअर 2018पासून देशी गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा वापर करून साबण, सौंदर्यप्रसाधनं आणि इतर प्रोडक्ट्स विकत आहे. त्यापैकीच अल्कोहोलचा वापर न करता हँड सॅनिटायझर ऑनलाईन विकत आहे. यात देशी गाईचे गोमूत्र वापरले जात आहे असं म्हटलं आहे. सध्यातरी हे 'आउट ऑफ स्टॉक' म्हणजे उपलब्ध नाहीये, असं दिसत आहे. "मागणी वाढल्यानं आम्ही आता प्रत्येक ग्राहकाला ठराविक सॅनिटायझर देणार आहोत," असं त्यांच्या पेजवर लिहिलं आहे.

फोटो स्रोत, काऊपॅथी
तसंच रामदेव बाबा यांनी एका हिंदी न्यूज चॅनेलशी बोलताना लोकांनी घरातच आयुर्वेदिक (हर्बल) हँड सॅनिटायझर तयार करण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नाहीतर, कोरोनाव्हायरस दूर ठेवण्यासाठी आयुर्वेदिक काढा, गुळवेल, हळदी आणि तुळशीची पाने खाण्याचा सल्ला दिला आहे.
पण जागतिक आरोग्य संस्था (WHO) आणि अमेरिकेतल्या सेंटर फॉर कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांच्या मते अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरच वापरावं असं म्हटलं आहे. तर, लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेच्या मते घरात तयार केलेला हँड सॅनिटायझर वापरू नये, कारण, त्यामध्ये सगळ्यात जास्त अल्कोहोल असणाऱ्या व्होडकाचा जरी वापर केला तरी त्यात केवळ 40% अल्कोहोल असते.
शाकाहाराचा फायदा होतो का?
काही दिवसांपूर्वी हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी ट्विटरवरून लोकांना मांस न खाण्याचं आवाहन केलं होतं. "शाकाहारी व्हा. वेगवेगळ्या प्रकारच्या जनावरांचं मांस खाऊन जगाला धोका पोहोचवणारा व्हायरस निर्माण करू नका," असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
तर, आणखी एका समूहाने कोरोना व्हायरस हा मांस खाणाऱ्या लोकांना शिक्षा देण्यासाठी आला आहे, असा दावा केला आहे.

फोटो स्रोत, PIB
पण, जसं चिकन आणि अंड्यांची विक्री घटू लागली तसं भारत सरकारने अशा भ्रामक कल्पनांचं खंडन करत एक नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये कोरोना व्हायरस आणि चिकन/अंडी यांचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय. तसंच, भारतीय खाद्य नियामक मंडळाचा हवाला देत केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री गिरिराज सिंह यांनीही हा दावा फेटाळला आहे. चिकन, मासे आणि अंडी हे प्रोटिनचे महत्त्वाचे स्त्रोत आहेत. ते कोणतीही शंका न बाळगता खा," असं म्हटलं आहे.
कोरोनापासून वाचवणाऱ्या गाद्या?
अमुक सामान कोरोनापासून तुम्हाला वाचवेल असा दावा करत काहीजण व्यवसाय करत असल्याचंही दिसून आलं आहे. उदाहरणार्थ, 15 हजार रुपयात 'अँटी-कोरोना व्हायरस गाद्या' घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा अशी जाहिरातही मुंबईतल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात आली होती. त्यावर भिवंडीच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. Arihant Matress या कंपनी अशा गाद्या विकत होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
त्यावर बीबीसीने या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमर पारेख यांच्याही चर्चा केली. ते म्हणाले, "ही एक अँटी-फंगल, अँटी अॅलर्जी, डस्ट-प्रूफ आणि वॉटरप्रूफ गादी आहे. त्यामुळे यात काहीही घुसू शकत नाही."
पण आता ही जाहिरात हटवली आहे. "माझ्यामुळं कुणाचं नुकसान होऊ नये म्हणून मी ही जाहिरात मागे घेतली आहे"
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








