You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन तणाव: अजित डोभाल आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यामध्ये चर्चा, शांततेसाठी प्रयत्न सुरू
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात फोनवर संभाषण झालं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, भारत आणि चीनमध्ये वेस्टर्न सेक्टरच्या सीमेवर काही दिवसांपूर्वी जी घटना घडली, त्या घटनेविषयी डोभाल आणि वांग यी यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे.
द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांना सीमेवर शांतता प्रस्थापित करावी लागेल आणि मतभेदांचं रुपांतर वादात होण्यापासून रोखावं लागेल, या बाबीवर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे.
यासाठी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देश काम करत आहेत. दोन्ही देशांचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं जी स्थिती निर्माण झाली होती, तशी आता नाहीये. याप्रकरणी एकेक पाऊल टाकायचं दोन्ही देशांनी ठरवलं आहे.
दोन्ही देशाचे जवान आणि राजकीय अधिकारी यांच्या दरम्यान चर्चा सुरू राहिल, या बाबीवरही या दोघांच्या चर्चेत एकमत झाल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
याशिवाय डोभाल आणि वांग यी यांच्यात नियमितपणे संवाद साधण्याविषयी एकमत झालं आहे.
वृत्त संस्था AFPनुसार, चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितलं, "सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे. "
'गलवानमधून चिनी आणि भारतीय सैन्याची मागे सरकण्यास सुरुवात'
गलवान, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्ज या ठिकाणहून दोन्ही देशांचं सैन्य माघारी परतत आहे. भारतीय लष्करातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित यांना याबाबत माहिती दिली. दोन्ही देशांकडून तंबू, तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या छावण्या तोडून टाकण्यात येत आहेत आणि सैन्य माघारी परतत आहे.
नजरेस दृष्टीस पडेल एवढ्या अंतराबाबतच हे करण्यात येत आहे. या कृतीचा अर्थ माघार किंवा संघर्ष संपला असं नाही.
चीन किंवा भारताचं सैन्य किती किलोमीटर मागे सरकणार आहे याविषयी अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. सातत्याने परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. 30 जून रोजी कॉर्प्स कमांडर बैठकीत ठरल्याप्रमाणेच सैन्य माघारी परतत आहे. पँगाँग त्सो आणि डेसपांग याविषयी अद्यापही माहिती देण्यात आलेली नाही.
बैठकीनंतर 1 जुलैला भारत सरकारमधील सूत्रांनी सांगितलं की, ही एक प्रदीर्घ बैठक होती आणि कोव्हिडची नियमावली पाळून आयोजित करण्यात आली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकचा तणाव निवळावा यादृष्टीने दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. त्यासंदर्भातच बोलणी झाली. सैन्य मागे हटवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असते. यासंदर्भात आडाखे बांधणारे, तथ्यहीन वृत्तांकन टाळायला हवं. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजनीक शांतता प्रस्थापित व्हावी, दोन्ही देशांदरम्यानचे करार आणि राजशिष्टाचार लक्षात घेऊन लष्करी तसंच प्रशासकीय पातळीवर आणखी काही बैठका आयोजित केल्या जाऊ शकतात.
त्याचदिवशी चीनमधील ग्लोबल टाईम्स वृत्तानेही अशाच आशयाची बातमी दिली होती. चीन आणि भारताच्या लष्कराने टप्याटप्याने सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून परिस्थितीतला तणाव निवळू शकेल. मिलिटरी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांनी सीमेनजीक तणाव कमी करून शांतता प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं.
मोदींची लेहला भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी(3 जुलै) सकाळी अचानक लेहमध्ये पोहोचले. 15 जूनला भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीच्या पार्श्वभूमीवर मोदींची ही भेट महत्त्वाची मानली गेली. 15 जूनच्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता.
या भेटीनंतर मोदींनी जवानांना संबोधित केलं. ते म्हणाले, "गलवान खोऱ्यात भारताच्या जवानांनी जे धैर्य दाखवलं, त्यामुळे देशाला तुमचा अभिमान वाटतो."
यावेळी त्यांनी चीनचं नाव न घेता म्हटलं, "विस्तारवादाचा काळ संपुष्टात आला आहे आणि आता विकासवादाचा काळ आहे. वेगानं बदलणाऱ्या जगात विकासवादच गरजेचा आहे. गेल्या शतकात विस्तारवादानंच मनुष्यजातीचा विनाश केला आहे. विस्तारवादाचं भूत कुणाच्या डोक्यात शिरलं असेल, तर ही बाब जागतिक शांततेसाठी धोकादायक आहे."
"भारत सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पदाची निर्मिती, वन रँक वन पेन्शन असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. आपण सगळे एकत्र येऊन अडचणींचा सामना करत आलो आहोत, करत राहू," असंही त्यांनी म्हटलं.
यावेळी मोदींनी ITBP जवानांशी संवाद देखील साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि सीडीएस बिपीन रावत हेही यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं गेले होते, ती जागा समुद्रसपाटीपासून 11 हजार उंचीवर आहे. हा परिसर झंस्कार खोऱ्यात आहे. लष्करातील अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची सर्व माहिती दिली.
याआधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सीमेवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार होते. मात्र, राजनाथ सिंह यांचा गुरुवारचा दौरा अचानक रद्द झाला होता.
आपण भारतासोबत असल्याचं अमेरिकेकडून स्पष्ट संकेत
दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही भारत-चीन सीमेवरील तणावास चीनच्या आक्रमकतेला जबाबदार ठरवलंय.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकेनी यांनी बुधवारी ट्रंप यांच्यातर्फे भारत-चीन तणावाबाबत भाष्य केलं. चीनची आक्रमकता केवळ भारतासोबतच नव्हे, तर अनेक भागांबाबत असून, चिनी कम्युनिस्ट पार्टीचा तोच खरा चेहरा असल्याची टीका अमेरिकेनं केली.
याआधी अमेरिकेनं भारत-चीन तणावाबाबत बऱ्यापैकी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, आता चिनी आक्रमकतेचा स्पष्ट उल्लेख करून आपण भारतासोबत असल्याचेच दाखवले आहे.
गलवानमध्ये 15/16 जूनच्या रात्री नेमकं काय झालं?
15 आणि 16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी जवानांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका कर्नलसह 20 जवान मृत्युमुखी पडसे.
या चकमकीत चीनी जवानांनी खिळे लावलेल्या लोखंडी रॉडचा हत्यार म्हणून वापर केल्याचं सांगितलं जात आहे.
भारत-चीन सीमेवर तैनात असणाऱ्या एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्यानेही हा फोटो बीबीसीला पाठवला आहे आणि यानेच चीनी जवानांनी भारतीय जवानांवर हल्ला केल्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.
2020 च्या मे महिन्यात काही वृत्तांनुसार भारत आपला भूभाग समजत असलेल्या गलवान खोऱ्यातील काही ठिकाणी चिनी सैनिकांनी तंबू उभारले. तसंच अवजड साहित्यासहीत शिरकाव केला.
भारताचे आघाडीचे संरक्षण विश्लेषक अजय शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार, गेल्या महिन्याभरात चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्त असलेल्या भूभागावर 60 चौरस किमीपर्यंत ताबा घेतला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)