'चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, ANI
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली -सामना
हिंदुस्थानच्या सर्वच सीमा अशांत आहेत, आता चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली, असं मत सामना वर्तमानपत्रातील 'रोखठोक' या स्तंभात संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे.
रोखठोक सदरात राऊत म्हणतात, "हिंदुस्थानच्या सर्वच सीमा अशांत आहेत. आपल्या सीमेवरची बहुतेक राष्ट्रे चीनची मांडलिक आहेत. त्या चीननेही आता आमच्यावर आक्रमण केले. परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित आहे. अमेरिकेचे ट्रम्पही उद्या निवडणूक हरतील, मोदींच्या बाजूने आता कोण उभा राहील? चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली आहे'.
चीननं आपल्या 20 जवानांना ठार केलं आहे. आता याचा बदला मोदी कसा घेणार, असाही सवाल त्यांनी केला आहे.
"चीननं आपले 20 जवान मारले, आता याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. की बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करून विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे? 20 जवानांच्या मृत्यूचा बदला मोदी सरकारनं घेतला नाही, तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल."
2. प्राणायामाला दैनंदिन आयुष्याचा भाग करा- पंतप्रधान मोदी
करोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसनं श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे प्रत्येकानं प्राणायमाचा दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावं अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने देशवासीयांना संबोधित केलं. 'जागरण'ने ही बातमी दिली आहे.
पंतप्रधान पुढे म्हणाले, 'करोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेत आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाला हरवण्यात मदत मिळते. योगाची अनेक आसनं आहेत. जी आपल्या शरीराची शक्ती वाढवतात. करोना झालेल्या लोकांनाही यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम व सहनशक्तीही मिळते'.
3. काँग्रेस नेते लाचार, मी पक्ष सोडला म्हणून थोरातांना पद मिळालं - विखे पाटील
"स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले असून, मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्ष पद मिळाले. त्यांची स्वतःची कर्तबगारी काय?", अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "मी पक्ष सोडला म्हणून बाळासाहेब थोरात यांना अध्यक्षपद मिळालं. थोरातांची स्वतःची कर्तबगारी काय? थोरात म्हणजे दिशा हरवलेला माणूस आहे. गेल्या सहा महिन्यात त्यांनी अशी कोणती कर्तबगारी दाखवली. राज्यातील जनतेच्या प्रश्नासाठी बैठक होत नाही, तर आपापसातील वाद मिटवण्यासाठी बैठका होत आहे. काँग्रेसला इतकी लाचारी का करावी लागत आहे? स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसचे नेते लाचार झाले आहेत. राज्यात काँग्रेसची वाताहत झाली आहे."
4. दिल्ली दंगलीच्या आरोपपत्रात योगेंद्र यादव यांचंही नाव
दिल्ली दंगलीदरम्यान झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र तयार केलंय. यात स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
विद्यार्थी नेता कंवलप्रीत कौर आणि वकील डीएस बिंद्रा यांचीही नावं या आरोपपत्रात आहेत.
या तिघांची नावं 17 आरोपींमध्ये नाहीत, मात्र आरोपपत्रात म्हटलंय की, "चांद बाग इथं आंदोलनाच्या आयोजनात डीएस बिंद्रा, कंवलप्रीत कौर, देवांगना कालिता, सफूरा आणि योगेंद्र यादव यांसारखे लोक होते."

फोटो स्रोत, SAMIR JANA/HINDUSTAN TIMES VIA GETTY IMAGES
जानेवारीच्या मध्यात चांद बाग इथं निदर्शनं सुरू होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
24 फेब्रुवारीला ईशान्य दिल्लीत धार्मिक दंगली उसळल्या होत्या. या दंगलीप्रकरणी आतापर्यंत 700 गुन्हे दाखल झाले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते आणि माजी IAS अधिकारी हर्ष मंदर यांचं नावही दिल्ली दंगलीच्या आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलंय.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रक्षोभक भाषण केलं आणि न्यायव्यवस्थेप्रती अनादर व्यक्त केला, असा आरोप हर्ष मंदर यांच्यावर लावण्यात आला आहे.
5. चंद्रपूरमध्ये 5 वर्षात 100 कोटींपेक्षा अधिक किंमतीची दारू जप्त
मद्यमुक्त चंद्रपूर जिल्ह्यात मद्य तस्करांनी धुमाकूळ घातला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एप्रिल 2015 ते मे 2020 या पाच वर्षात 100 कोटी 85 लाखाची अवैध देशी-विदेशी दारू जप्त केली. तसेच 39 हजार गुन्हे दाखल करून 43 हजार 593 आरोपींना अटक केल्याची माहिती जाहिर केली आहे.
सर्व मुद्देमाल व इतर सामग्री पकडली तर हा मद्य तस्करीच्या कारवाईत चंद्रपूर पोलिसांनी पाच वर्षात ५०० कोटींच्यावर एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे. विशेष म्हणजे मद्याचा आकडा दरवर्षी हा वाढत गेला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








