कोरोना गणेशोत्सव: उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत सांगितल्या या गोष्टी

गणेशोत्सव

फोटो स्रोत, Getty Images

गणेशोत्सव काही महिन्यांवरच आला आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आज पत्रकारांसोबत घेतलेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, "लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळ संकटं येत आहेत... मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय.""गणेश मूर्तींची उंची हा प्रश्न आहेच. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोना
लाईन

वारी आपण सुरक्षित पार पाडतोय तसंच आपण गणेशोत्सवही सुरक्षित पार पडला पाहिजे. गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच बनवावी. जेणे करून सुरक्षेचे इतर प्रश्नंही सुटतील. उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेनमेंट झोन झाला तर मग अनेक अडचणी उभ्या रहातील. त्यामुळे सुरक्षित उत्सव केला पाहिजे. गणेशमूर्ती एव्हढ्या उंचीची असावी जेणे करून ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जित करता येईल. 'गणेशमूर्तींची उंची किती असावी या संदर्भात मी आपल्या सर्वांशी बोललोय तसेच आता मी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलिस आयुक्त यांच्याशी बोलून पुढील दोन दिवसांत गणेश मूर्तींची उंची किती असावी हा निर्णय जाहीर करतो, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

गणेशोत्सव साधेपणाने कसा साजरा करायचा?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्तरांत अनिश्चितिततेचं सावट आलं आहे. विशेषत: सणवार कसे साजरे करणार याची चिंता सगळ्यांना लागून राहिली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव असतो. हजारो लाखो भाविक गणरायाच्या दर्शनासाठी एकत्र जमतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा सण कसा साजरा होणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

त्याचबरोबरीने महाराष्ट्रातल्या इतर भागात हा सण कसा साजरा केला जाईल याबद्दल आम्ही माहिती घेतली.

राजधानी मुंबईत अनेक मोठी मोठी गणेशोत्सव मंडळं आहेत. लालबागचा राजा हे भाविकांचं मुख्य आकर्षण. यावर्षीच्या गणेशोत्सवाबद्दल लालबागच्या राजा गणेश मंडळाचे सदस्य बाळासाहेब कांबळे म्हणतात, "गणेशोत्सवाला अजून वेळ आहे. सध्या कोरोनाचं संकट मोठं आहे. त्यामुळे सध्या मंडळाच्या वतीने आम्ही मेडिकल कॅम्प घेतो आहोत, तसंच वैद्यकीय मदतही करत आहोत. पण गणेशोत्सव कसा साजरा होणार याबाबत आम्ही अजून तरी काही निर्णय घेतलेला नाही. पण ऑगस्टमध्ये परिस्थिती कशी असेल याविषयी सर्व सदस्यांची चर्चा करून निर्णय घेऊ पण सध्या सगळे मेडिकल कॅम्पमध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही काही ठरवलेलं नाही."

तिकडे गणेशगल्ली मुंबईचा राजा मंडळाचे सचिव स्वप्नील परब म्हणतात, "सध्या आम्ही गणेश मंडळाच्या वतीने प्रशासनाला कोरोना संकटात मदत करतोय.. देशावर या संकटामुळे जो भार आला आहे त्यामुळे सामान्य माणूस आर्थिक अडचणीत सापडलाय. त्यामुळे आम्ही यंदाच्या वर्षी गणेश भक्तांकडून वर्गणी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यापलीकडे उत्सव कसा साजरा करायचा यासाठी आम्ही सरकारच्या नियमावलीची वाट बघत असल्याचं ते म्हणाले. तेव्हाची परिस्थिती कशी असेल आणि त्यानुसार प्रशासनाकडून जे सांगेल त्याप्रमाणे यंदाच्या उत्सवाची रूपरेषा आखण्याचा मानस असल्याचं बीबीसी मराठीला सांगितलं. पण हा उत्सव आम्ही निश्चितपणे गणेशभक्तांच्या आरोग्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा विचार करूनच साजरा करू असंही ते पुढे म्हणाले.

गणेश मंडळांसाठी सूचनावली

मुंबईत गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी गणेश मंडळांसाठी काही सूचनावली तयार केली आहे. ते सांगतात, "गणेश मंडळांची तयारी खूप आधीपासूनच सुरू होते. तेव्हाची परिस्थिती कशी असेल याचा अंदाज नाही पण सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून सुरवातीपासून काळजी घेण्यासाठी ही सूचनावली तयार केली आहे. गणेश मंडळांवरती ही पाळण्याचं बंधन नाही. पण मंडळांनी या सूचनावलीचा विचार करावा असं आम्हाला वाटतं. महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने याबाबत योग्य ते नियम तयार करावेत. त्यांनी दिलेल्या नियमांचे पालन मुंबईतील गणेशोत्सव मंडळ करतील असा आम्हाला विश्वास आहे.

सूचनावली खालीलप्रमाणे

1. वर्गणी - मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम) विभागीय वर्गणी घेऊ नये. मात्र केवळ वर्गणीवर अवलंबून असलेल्या मंडळांची परंपरा खंडित होऊ नये याकरिता या मंडळांनी आपापल्या विभागात स्वेच्छेने वर्गणी देण्याबाबत आव्हान करावं.

2. श्रीमुर्ती - कोरोनामुळे उद्भवलेली कठीण परिस्थिती पाहता सर्व मंडळांनी शक्यतो मर्यादित उंचीचा आग्रह धरावा . शक्य असल्यास शाडू मूर्तीस प्राधान्य द्यावे.

3. मंडप/रोषणाई- मंडळांनी मंडप, रोषणाई तसेच डेकोरेशनवर होणार अतिरिक्त खर्च टाळावा . या खर्चातून आपल्या विभागातील निर्जंतुकीकरण, सुरक्षित वावर नियमावलीसह शक्य तितकी कोरोना प्रतिबंधित व्यवस्था करावी.

4. आगमन- श्रींच्या आगमनासाठी मूर्तिकाराकडे किमान कार्यकर्त्यांसह जाणे. (मास्क व सॅनिटायझर जवळ बाळगणे) तसेच अतिशय साधेपणाने मूर्ती मंडपात आणणे .

5. श्रीदर्शन- मंडपाच्या आसपास वावर असणाऱ्या व्यक्तीस (भटजी, कार्यकर्ते इत्यादी) हात - पाय स्वच्छ करण्यासाठी वॉश बेसिनची तसेच सुरक्षित वावर राखता येईल अशी व्यवस्था करणे .

6. कार्यक्रम - गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याऐवजी यंदाच्या वर्षी स्थानिक यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर , रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे .

7. विसर्जन- आपली सार्वजनिक मूर्ती मर्यादित उंचीची असावी जेणेकरून मंडप परिसरात यंत्रणेच्या सहकार्याने कृत्रिम तलावाची निर्मिती करून तिथेच श्रींचे विसर्जन करण्याची व्यवस्था करावी.

गणपती

फोटो स्रोत, Getty Images

पुण्यात काय परिस्थिती?

पुणे गणेशोत्सवाचं मुख्य केंद्र आहे. इथूनच गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती. कोरोनाच्या पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी दगडूशेठ गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या उत्सव मंडपाला देखावा असणार नाही.

दरवर्षी या उत्सवमंडपाचं रूप हा भाविकांच्या आकर्षणाचा विषय असतो. यावर्षी कोणत्याही मंदिर किंवा प्रसिद्ध वास्तूच्या देखाव्याचं रुप या उत्सवमंडपाला देण्यात येणार नाही. उत्सव मंडपात फक्त मखर असेल आणि त्यामध्ये बाप्पांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. कोरोनाच्या पार्शक्षभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात सर्व गणपती मंडळांच्या अध्यक्षांची व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मोदक

फोटो स्रोत, BBC/SiddhanathGanu

गणेशोत्सवाचे नियोजन तसेच मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे

आगामी गणेशोत्सव गणपतीला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल. असं आवाहनही मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केलं आहे.

इतर महाराष्ट्रात काय?

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपुरातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही जनतेची सुरक्षा लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात हा उत्सव साजरा करण्याचं ठरवल आहे.

गणेश विसर्जन

फोटो स्रोत, Getty Images

नागपूरचं सर्वांत मोठं गणेश मंडळ नागपूरचा राजाच्या आयोजन समितीने सरकारच्या आदेशाचे पालन करणार असल्याचं सांगितलं आहे. नागपूरच्या राजाचं या वर्षी पंचवीसावं वर्ष आहे तरी रौप्य महोत्सव वर्षाचे आयोजन पुढच्या वर्षीही करण्यात येऊ शकतं असे आयोजन समितीचे अध्यक्ष दीपक जैस्वाल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

गणेशभक्तांची सुरक्षा हीच प्राथमिकता असल्याचं जैस्वाल यांनी सांगितलं. जरी लोकांच्या येण्यावर मर्यादा येणार असल्या तरी गणेशमूर्तीचे काम जून पासून सुरु करणार असल्याचे जैस्वाल म्हणाले. सरकारच्या आदेशांची वाट पाहत असल्याचे आणि त्याचे पालन करणार असल्याचे जैस्वाल म्हणाले.

याचबरोबर कोल्हापुरातही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे नियोजन आहे. गेल्या वर्षी कोल्हापूरला महापुराने वेढले होते. यावर्षी कोरोनाचा कहर आहे. त्यामुळे यावर्षीही हा उत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याचं महिला व बाल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बादल कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

नाशिक शहरात अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. पुढच्या महिन्यात बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे यावर्षी गणेशोत्सव कोरोनाग्रस्त असणार हे नक्की.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)