कोरोना : 'कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आणि मला वाटलं आता सगळं संपलं'

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, दिपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"30 एप्रिलला माझ्या नवऱ्याला ताप आला. दोन दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर मी, माझ्या दोन मुली आणि माझ्या 82 वर्षांच्या सासूबाईंची कोरोना टेस्ट केली. आमच्या सगळ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. एका क्षणात माझा संसार उद्ध्वस्त झाला असं वाटलं," नवी मुंबईत राहणाऱ्या मानसी (बदललेलं नाव) यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

मानसी आणि त्यांचे पती वाशी बाजारपेठेत व्यवसाय करतात. फळांच्या गिफ्ट पॅकेजिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. लॉकडाऊन सुरू असलं तरी बाजारपेठेत फळांची विक्री सुरू असल्याने दररोज हे दाम्पत्य कामावर जात होते.

बाजारपेठेत सकाळी ग्राहकांची गर्दी व्हायची. कारण वाशी बाजारपेठेत कल्याण,डोंबिवली,ठाणे अशा सगळ्या ठिकाणाहून छोटे व्यापारी फळांच्या खरेदीसाठी येत होते. बाजारपेठेत सुरक्षा व्यवस्था होती. सोशल डिस्टंसिंग पाळून काम करण्याच्या सूचना होत्या.

गुरुवारी, 30 एप्रिलला मानसी यांचे पती नरेश (बदललेलं नाव) यांना ताप आला. ते डॉक्टरकडे गेल्यावर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. "माझ्या पायाखालची जमीन सरकली. असं होईल कधी वाटलंच नव्हतं. काय करावं सूचत नाही तोपर्यंत रुग्णवाहिका आली आणि त्यांना एमजीएम ह़ॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं."

कोरोना
लाईन

मानसी आणि नरेश यांना दोन मुली आहेत. एक बारा आणि दुसरी अठरा वर्षांची मुलगी. हे सगळे वाशी येथे राहतात. दुसऱ्याच दिवशी घरातल्या सगळ्यांची टेस्ट करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून टीम पाठवण्यात आली. कोरोना टेस्टमध्ये संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

'अपराधी वाटू लागलं'

मानसी आणि नरेश वगळता इतर सगळे दोन महिन्यांपासून घराबाहेर पडले नव्हते. त्यामुळे दोन्ही मुलींची त्यांना फार काळजी वाटत होती. यात मुलींचा काय दोष ? असं त्यांना वाटत होतं.

"मला विश्वास बसत नव्हता. आम्ही सगळे रडायला लागलो. मला वाटलं आता माझं सगळं कुटुंब उद्धवस्त होईल. मी रात्रभर रडत होते. जेवण जात नव्हतं. माझी मोठी मुलगी घाबरली होती. ती आरडा ओरडा करायला लागली. आम्हाला इमारत सोडावी लागेल असं सांगण्यात आलं," गहिवरून आलेल्या मानसी बोलत होत्या.

लाईन

लाईन

ते राहत असलेल्या इमारतीत मानसी यांचे कुटुंब हे कोरोनाचे पहिले रुग्ण होते. त्यामुळे या कुटुंबाला लागण झाल्याचं समजताच ती इमारत सील करण्यात आली. दोन्ही मुलींपैकी एका मुलीला वडिलांसोबत एमजीएम हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं, तर 82 वर्षांच्या आजी,मोठी मुलगी आणि मानसी यांना पनवेल येथील क्वारंटाईन कक्षात पाठवण्यात आलं.

"एनएमएमटीच्या बसने आम्हाला पनवेलला घेऊन जात असताना माझी मोठी मुलगी मला बिलगून रडत होती, तर सासूबाईंच्या चेहऱ्यावरही भीती दिसत होती. त्या क्षणी माझ्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. आमच्यामुळे मुलींना आणि सासूबाईंना कोरोना झाला असं वाटू लागलं," मानसी यांना हे सांगताना रडू अनावर झालं.

कोरोना

एनएमएमटीचा बस ड्रायव्हर दररोज हेच काम करतो. तोंडावर मास्क आणि हातात ग्लोव्ह्ज घातलेले ड्रायव्हर फक्त प्रवाशांना सोडायचे काम करत नाहीत, तर त्यांना धीरही देत आहेत. ताई, तुम्ही घाबरू नका. तुम्ही एकट्या नाहीत. तिथे असे शेकडो रुग्ण आहेत. काही दिवसातंच तुम्ही घरी परत जाल. मी जवळपास सगळ्यांना घरी जाताना पाहीलंय असं सांगून ड्रायव्हर सगळ्यांना धीर देत होता.

'आता रडायचं नाही, लढायचं'

आपल्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराची लागण झालीय. गेल्या 32 वर्षांपासून अतिशय प्रेमाने, मेहनतीने, संयमाने जो संसार उभा केला तो खचत असताना मानसी पाहत होत्या.

19 मजल्याच्या क्वारंटाईन इमारतीत मानसी आणि त्यांचे कुटुंब पोहचले. आता इथून पुढचा प्रवास प्रत्येकीला वेगळा करायचा होता. मग त्यांनी ठरवलं आता रडायचं नाही, लढायचं.

"मी पाहिलं सगळे वेगळे राहत आहेत. अगदी लहान मुलं आईसोबत दिवस काढत आहेत. मी मुलीला आणि सासूबाईंना सांगितलं की, हेही दिवस जातील. आपण पिकनिकला आलोय असा विचार करा. काही दिवस इथे राहून घरी परतायचं आहे असं मनाशी पक्क करा," मानसी मोठ्या विश्वासानं बोलत होत्या.

मानसी यांना वास येणं बंद झालं. कुठल्याही गोष्टीचा वास येत नव्हता. जेवणलाही चव लागत नव्हती. पण पर्याय नव्हता हे त्यांना कळलं होतं.

खरं तर मानसी यांचा स्वभाव लहानपणापासून विनोदी आणि हसत खेळत राहणारा. दोन दिवसांतच त्यांच्या या स्वभावामुळे त्या मजल्यावर सगळ्यांचेच मनोरंजन होऊ लागले.

मानसी यांनी सांगितलं, "मी खोलीत योगा करू लागले. मुलीलाही प्राणायम करायला सांगितले. फोनवरुन मुलीशी आणि नवऱ्याशी बोलले. लहान मुलीला सर्दी झाली होती. तिलाही वास येत नव्हता. ती माझ्याशिवाय एकही रात्र बाहेर राहीली नव्हती. पण त्यांना सांगितलं आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. त्यांना विश्वास दिला की मी त्यांना काहीही होऊ देणार नाही."

मानसी यांनी क्वारंटाईन कक्षाच्या त्या मजल्यावरचं वातावरणच पूर्ण बदलून टाकलं. त्या खिडकी आणि दरवाजातून सगळ्यांशी बोलायच्या. सगळ्यांना योगा शिकवायला सुरुवात केली. "मी गाणं गायचे. अनेक जण मला वन्स मोअर म्हणून दाद द्यायचे. माझ्या बाजूच्या खोलीत तरुण मुलगी होती. ती म्हणाली तुम्ही येईपर्यंत मी दरवाजाही कधी उघडला नाही. तीनेही गायला सुरुवात केली. चहा, जेवण, सफाईसाठी कर्मचारी येत होते. त्यांच्याशीही चांगली ओळख झाली."

'मला कोबीची भाजी आजिबात आवडत नाही'

बारा वर्षांची मानसी यांची मुलगी सातवी इयत्तेत शिकते. वडील दाखल झाले तिथे समोरच्या खोलीत तिला क्वारंटाईन करण्यात आलं. एकतर आईसोबत मोठी बहीण आणि आजी गेली होती. वडिलांना ताप येत होता आणि अशा परिस्थितीमध्ये ती एकटीच राहत होती.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

"मी यापूर्वी आईला सोडून कधीही राहिले नव्हते. मी दोन महिन्यांपासून घरी बसलीय. थंड काहीही खाल्ल नाही. साधं माठातलं थंड पाणी प्यायले नाही. तरीही मला कोरोनाची लागण कशी झाली?" असा प्रश्न तिला वारंवार पडत होता. बारा वर्षांच्या मुलीने नाव न सांगण्याच्या अटीवरुन बीबीसी मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

ती शाळेत असल्याने तिचा मित्र परिवारही मोठा आहे. क्वारंटाईनमध्ये ती फोनवरुन त्यांच्याशी बोलत होती. पण नंतर तिला सर्दी झाली मग कुठलाही वास येणं बंद झालं. "त्या खोलीत काय करायचे कळत नव्हतं. त्यात जेवणात रबरासारख्या पोळ्या, कोबीची भाजी देत होते. मला कोबी आजिबात आवडत नाही. मी नाही खाऊ शकले. मी फक्त भात आणि डाळ खायचे" ती सांगत होती.

"तुला मोठं होऊन कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ? असा प्रश्न विचारल्यावर तिने पटकन सांगितलं, मला शेफ व्हायचं आहे. मी अतिशय चविष्ट खाद्यपदार्थ बनवते. रेसिपी पाहून मी कुठलाही पदार्थ सहज बनवू शकते," असं ती म्हणाली.

ती बोलत होती, "आता मी आईशिवाय झोपू शकते. मला तिच्याशिवाय झोपायची कधी वेळच आली नाही. असा प्रसंग मी कधीही अनुभवला नव्हता."

'अशी वेळ शत्रूवरही कधी येऊ नये'

अखेर 15 दिवसांची 'काळरात्र' संपली. मानसीसह तिचे कुटुंब कोरोनामुक्त झाले.अगदी 82 वर्षांच्या आजींनीही कोरोनावर मात केली. आजींनी क्वारंटाईन केंद्रातही धीर सोडला नव्हता.

"कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याचा रिपोर्ट पाहिला आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता. एकदाचे सुटलो यातून अशी भावना होती," मानसीने आपला आनंद व्यक्त केला.

कोरोना

फोटो स्रोत, Ani

क्वारंटाईन केंद्रातून घरी परत जाताना मानसीला त्या एनएमएमटीच्या बस ड्रायव्हरची आठवण झाली. तो म्हणत होता ते खरं होतं. आपण एकटेच या लढाईत नाही हजारो,लाखो लोकं आपल्यासोबत आहेत हे मानसीला पटलं.

मानसी आणि नरेश यांनी कुटुंबासह इमारतीमध्ये प्रवेश केला. पण इकडे आल्यावर जरा अवघडल्यासारखं वाटलं. "आमच्यामुळे इमारत सील झाली याची आम्हाला कल्पना होती." मानसी सांगत होत्या.

घरी आल्यावरसुद्धा ते आधीप्रमाणे राहत नाहीयेत. मानसी आणि नरेश घरातही सोशल डिस्टंसिंग पाळत आहेत. सगळ्यांच्या प्लेट्स वेगळ्या काढल्या आहेत. प्रत्येकजण आपआपली कपडे वेगळे धूत आहे.

संपूर्ण कुटुंबाला अजून 14 दिवस घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. मानसी सांगत होत्या, "या प्रसंगाने आम्हाला कुटुंब म्हणून आणखी जवळ केले. अशा काळातच तुम्हाला तुमची खरी लोकं कळतात. आमचा सुरक्षा रक्षकही आम्हाला खूप मदत करतोय. जे जे बाजारातून हवे आहे, ते आम्हाला तो गेटवर आणून दतो. तो ही आमच्या कुटुंबाचा भाग बनला आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)