You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निसर्ग चक्रीवादळ: दिशा बदलून पुण्यालाही तडाखा; कोकणातल्या नुकसानीचा आढावा सुरू
अरबी समुद्रात रौद्र रूप धारण करत निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. कोकणातला जोर ओसरल्यानंतर या वादळाने पुण्याच्या दिशेने कूच केली. रात्रभरात वादळाची तीव्रता कमी होणार आहेय
बुधवारी दुपारी 1 वाजता अलिबागजवळ हे चक्रीवादळ धडकलं. वादळी वारे, मुसळधार पाऊस यामुळे कोकणात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. आणखी तीन तास वादळाचा जोर कायम राहील असं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय.
सध्या कोकणात सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. तर मुंबईत अनेत ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत.
सर्वात ताजा अपडेट
महत्त्वाचे आणि मोठे प्रश्न -
या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी काय करावे? काय करू नये? वाचा इथे
वेळ-रात्री 10 वाजता
NDRFच्या पाच तुकड्या श्रीवर्धनच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेली झाडं बाजूला करण्याचं काम पूर्ण झालं आहे. घरांचं, मालमत्तेचं, पीकांचं किती नुकसान झालं आहे याचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. काही तासांमध्ये विद्युतपुरवठा सुरू करण्यात येईल असं पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
वेळ-रात्री 9.00
चक्रीवादळाचा परिणाम लक्षात घेऊन पुणे विमानतळावर येणारी सहा विमानं अन्य मार्गाने वळवण्यात आली तर एका विमानाची फेरी रद्द करण्यात आली असं पुणे विमानतळ संचालकांनी सांगितलं.
वेळ-रात्री 8.00
चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे वीजेचा खांब अंगावर पडून रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितलं.
वेळ-संध्याकाळी 7.50
नाशिकमध्ये पावसाची संततधार असून, ताशी 30 किमी वेगाने वारे वाहत आहेत. येवला, सिन्नर भागातील पोल्ट्री फार्म आणि कच्च्या घरांचं नुकसान झालं आहे. दरम्यान सप्तश्रृंगी गड इथे दरड कोसळली आहे. ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे.
वेळ-संध्याकाळी 7.24
निसर्ग चक्रीवादळाचा जोर पुढच्या तीन तासात कमी होण्याची शक्यता आहे. त्यापुढच्या सहा तासात हे चक्रीवादळाचा प्रभाव ओसरेल. तूर्तास या वादळाचा केंद्रबिंदू पुणे परिसरात आहे असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.
वेळ-संध्याकाळी 7.10
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना रुग्णांसाठी बीकेसीत उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलची अवस्था पाहा. हा पहिला पाऊस आहे. या हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी किती रुपये खर्च झाले? कोणाला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं? कुणी सल्ला दिला होता?', असा सवाल खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
निसर्ग चक्रीवादळानंतर बीकेसीतील दुसऱ्या कोव्हिड-१९ सेंटरच्या कामाला सुरूवात झाली आहे. कोव्हिड-१९ सेंटरला डॅमेज झालं नाहीये." खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांना शिफ्ट करण्यात आलं होतं असं MMRDAचे आयुक्त आर.ए.राजीव यांनी सांगितलं.
वेळ-संध्याकाळी 6.10
निसर्ग चक्रीवादळ रायगडमधून कर्जतकडे सरकले आहे. आतापर्यंत सर्वाधिक फटका मुरुड आणि श्रीवर्धनाला बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तातडीने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, 'या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून पडली आहेत, परिणामी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी तारा तुटल्या, विजेचे खांब पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. प्रशासन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे'.
'मुंबईला असलेला चक्रीवादळाचा धोका कमी झालेला असला तरी पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हे चक्रीवादळ केंद्रबिंदू पासून सरासरी दोनशे किलोमीटर पर्यंत परिणाम करते. निसर्ग चक्रीवादळाची दिशा बघता पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे', असं त्यांनी पुढे सांगितलं.
वेळ-संध्याकाळी 5.45
निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला पार केलं आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने मुंबई आणि ठाणे परिसरात वारा वाहत असल्याचं आपण अनुभवत आहोत. या भागांमध्ये पाऊसही पडत आहे असं भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितलं.
संध्याकाळी 5.00
चक्रीवादळामुळे अनेक मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. NDRFचे जवान घटनास्थळी काम करताना
दुपारी 4 वाजता
सांताक्रुझमध्ये एका इमारतीचं काम सुरू होतं. जोरदार वाऱ्यामुळे सिमेंटच्या विट्या पडल्यामुळे बाजूच्या झोपडीत राहणारे तीनजण जखमी झाले आहेत.
अग्निशम दल, होमगार्ड तसंच सर्व यंत्रणा तयार आहेत. लोकांना चक्रीवादळाचा फटका बसू नये यासाठी समुद्रकिनाऱ्यानजीकच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
दुपारी 3.57
निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धनच्या दिवे आगर परिसरात धडकलं तेव्हा...
दुपारी 3.33 वाजता
वादळाच्या तडाख्यामुळे रायगडमध्ये बिल्डिंगचं छप्पर उडून गेलं तो क्षण
दुपारी 3.30 वाजता
चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्याच्या काही भागात मोबाईल नेटवर्क ठप्प झालं आहे अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
दुपारी 3.13 वाजता
चक्रीवादळ मुंबई, ठाण्यातुन उत्तर महाराष्ट्राकडे जाताना निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने बचाव कार्य करावे व सावधानता बाळगावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले आहेत. निसर्ग चक्रीवादळ मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागातून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने कूच करत आहे.
दुपारी 3.00 वाजता
निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संध्याकाळी सातपर्यंत विमानांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, कमी दृश्यमानता यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दुपारी 2.46 वाजता
श्रीवर्धनला चक्रीवादळाचा तडाखा बसला. सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी घरांची छप्परं उडून गेली.
राज्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 21 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांनी एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलं आहे अशी माहिती NDRFचे व्यवस्थापकीय संचालक एस.एन. प्रधान यांनी दिली.
दुपारी 1.10 वाजता -
निसर्ग चक्रीवादळ दुपारी 1 वाजता अलिबागजवळ धडकलं. पुढच्या तीन तासात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय.
रायगड जिल्हयातीलच दिवे आगार-श्रीवर्धनला हे चक्रीवादळ आदळलं, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
दुपारी 1 वाजता -
वादळी परिस्थिती बघता मुंबईच्या वांद्रे-वरळी सीलिंकवर वाहतूक थांबवण्यात आली आहे.
तर मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल आणि अग्निशमन दलाचे प्रमुख यांनी दादर आणि गिरगाव चौपाटीची पहाणी केली.
उत्तर महाराष्ट्रातही या वादळाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. "आज दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो घराबाहेर पढू नये," असं आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केलं आहे.
12 वाजता - निसर्ग चक्रीवादळाचे मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असे परिणाम जाणवू लागले
अलिबागला राहाणाऱ्या वासंती मिठागरे यांनी बीबीसीच्या जान्हवी मुळे यांना फोनवरून सांगितलं, "अलिबागला पाऊस ठीक आहे, पण वाऱ्याचा जोर वाढतोय. लाईट्स सकाळीच घालवले आहेत. बाकी कर्फ्यू आहे त्यामुळे सगळं शांत शांत. अनेकांचे फोन लागत नाहीयेत. आणि अंधारून आलं आहे."
काशीदजवळ मुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती आहे -
सकाळी 11 वाजता
सकाळी 10 वाजता
रायगड पोलिसांनी समुद्र किनारपट्टीजवळ वास्तव्यास असलेल्या सुमारे 1,400 नागरिकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय. यादरम्यान कुणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
रायगडमध्ये काल रात्रीपासून आज दिवसभरासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तर, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबा. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
सकाळी 8 वाजता
सध्या मुंबईसह किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.
हवामान खात्याने सकाळी साडेपाचला दिलेल्या अपडेटनुसार, या चक्रीवादळाचं केंद्र किंवा डोळा हा ईशान्येकडे सरकतोय, आणि दुपारून अलिबागजवळ धडकणार (लँडफॉल). याला लँडफॉल म्हणतात.
सकाळी 7 वाजता
मंगळवारी संध्याकाळी हे वादळ ताशी 13 किलोमीटर वेगाने पुढे सरकलंय आणि ते पुढील 12 तासांत (म्हणजे आज सकाळपर्यंत) अधिक तीव्र होऊन 'सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म'चं रूप धारण करू शकतं, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नेमकं काय होणार?
महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये 3 आणि 4 जूनला बहुतांश ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. हे मोसमी वारे प्रतिताशी 45 ते 55 किमी वेगानं वाहत असून अरबी समुद्राच्या आग्नेय आणि मध्य-पूर्व भागात पोहोचेपर्यंत ते प्रतिताशी 65 किमी वेगानं वाहायला लागतील.
यावेळी अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या भागात समुद्राची पातळी उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. 2 जूनपासून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात मोसमी वारे पोहोचल्यानंतर ती आणखी उग्र होण्याची शक्यता आहे.
तर 3 जूननंतर मोसमी वारे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर ती रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ कुठे आदळणार?
हे वादळ अलिबाग भागात धडकणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितलं. आज दुपारून हे वादळ अलिबागजवळ जमिनीवर धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहेच.
निसर्ग चक्रीवादळ हरिहरेश्वर आणि दमणच्या मधून जाईल, असा अंदाज पहिल्यापासूनच वर्तवला जात होता.
चक्रीवादळाचा मार्ग काय?
3 जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर हे वादळ दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल.
पालघरचे उपजिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सांगितलं, "आम्हाला सांगण्यात आलंय की पालघरमध्ये लँडफॉल होईल. आम्ही तयारी केली आहे. NDRFच्या तुकड्याही इथे आल्या आहेत."
यामुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तर या वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस येण्याची शक्यता असून यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.
समुद्राला उधाण आल्यामुळे मुंबई, ठाणे तसंच रायगड जिल्ह्यातल्या सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं तसंच रत्नागिरी जिल्ह्यातली अशीच परिस्थिती उद्भवू शकते असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
प्रशासनाने काय तयारी केली आहे?
'निसर्ग चक्रीवादळा'ला तोंड देण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे.
अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनारपट्टीवर 2 जूनपर्यंत, कर्नाटमध्ये 3 जून, तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 4 जूनपर्यंत मच्छिमारी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या 16 तुकड्यांपैकी 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, SDRFच्या सहा तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मंत्रालयातदेखील 24 तास नियंत्रण कक्ष सुरू असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मच्छीमाराना समुद्रातून बोलवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी तटरक्षक दलाला देखील सूचना देण्यात आली आहे.
कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना हलवण्यात येणार असून त्यांच्यासाठी निवारा केंद्र तयार ठेवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात सोमवारी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाली. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्याही तयार ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
मुंबईतील सखल भागातील झोपडपट्टीवासीयांना स्थलांतरीत करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणु उर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- घराबाहेर असलेल्या मोकळ्या वस्तू अन्यत्र ठिकाणी हलवा.
- महत्त्वाचे दस्ताऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा.
- बॅटरीवर चालणारी उपकरणं चार्ज करून ठेवा, तसंच राखीव इलेक्ट्रिक यंत्र जसं की बॅटरी टॉर्च आणि पावर बँक हेसुद्धा चार्ज आणि सज्ज करून ठेवा.
- विद्युत उपकरणं तपासा. जोरदार पाऊस होत असेल तर शक्यतो बंद करून ठेवा.
- दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या बातम्यांकडे, सूचनांकडे लक्ष ठेवा. इतर कोणत्याही खात्री नसलेल्या बातम्या पसरवू नका.
- आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा. त्यात पुरेसं पाणी, अन्नसाठा आणि औषधी, इत्यादी गरजेच्या वस्तू ठेवा.
- मोठं तात्पुरतं छप्पर असलेल्या जागा टाळा. डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा.
- पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.
कोरोना आणि चक्रीवादळ
कोरोनाचे गंभीर संकट असताना त्यात आता निसर्ग चक्रीवादळाचं आव्हान राज्य प्रशासनासमोर आहे. मदत आणि बचाव कार्य करताना कोरोनाचा फैलाव होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
नॉन-कोव्हिड हॉस्पिटल्स मदतीसाठी उपलब्ध करणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तसंच कोरोनासाठी तात्पुरते उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलमधिल रुग्णांना देखील सुरक्षित स्थळी हलवण्याचा विचार आपत्ती व्यवस्थापनाकडून केला जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)