निसर्ग चक्रीवादळ: वादळाने घाबरून जाऊ नका; प्रशासन सज्ज-मुख्यमंत्री

निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या दोन्ही मुद्यांच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आहे. अलिबाग इथं वादळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ मोठं असू शकतं. 100 ते 125 वेगाचे वारे वाहतील. चक्रीवादळ नासधूस करत पुढे जाईल. वादळाचा जोर ओसरावा अशी प्रार्थना आहे. अंदाजानुसार, हे वादळ दुपारपर्यंत आपल्या किनाऱ्यावर धडकेल. किनारपट्यांवर तसंच परिघामध्ये या वादळाचा फटका बसू शकतो. आपण सज्ज आहोतच. आर्मी, नेव्ही यांच्या तुकड्या सज्ज . NDRFच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत.

-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला होता. तुही तयारी केली आहे, केंद्र सरकार तुमच्या सोबत आहे. काळजी करू नका असं त्यांनी सांगितलं आहे.

-वादळाचा प्रभाव बघता, उद्या आणि परवा महत्त्वाचे आहेत. किनारपट्टी भागात घरात राहणंच आवश्यक आहे. कोणीही घराबाहेर पडू नका. मनुष्यहानी कमीत कमी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न. मच्छिमारांना संपर्क झाला आहे. वेळेत सुखरुप आणण्याचा प्रयत्न आहे. पुढचे दोन दिवस कोणीही समद्रात जाऊ नये.

-किनारपट्टी भागात, मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत सर्वांनी काळजी घ्यायची आहे. सावध राहण्याची गरज आहे. ग्रामीण तसंच शहरी भागात, आपल्या वस्तूंची काळजी घ्या. सुट्या वस्तूंना बांधून ठेवा. वाऱ्याच्या प्रभावाने कोणाला इजा होणार नाही.

वादळ म्हटलं की पाऊस आला. पाऊस पडला की पूरसदृश परिस्थिती होऊ नये यासाठी काळजी. काहीठिकाणी वीजपुरवठा खंडित करावा लागू शकतो. अनावश्यक वीजेची उपकरणं वापरू नका. बॅटरीवर चालणाऱ्या गोष्टी चार्ज करून ठेवा.

-दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सूचनांकडे लक्ष द्या. अफवांवर लक्ष देऊ नका. स्थानिक प्रशासन सज्ज आहे. प्रशासन तुमच्यासोबत आहे. आवश्यक वाटल्यास नागरिकांचं स्थलांतर करण्यात येईल.

-मोठं छप्पर असेल, तात्पुरती वास्तू असेल तिथे जाऊ नका. बीकेसीमधील फिल्ड हॉस्पिटलमधील रुग्णांना अन्य हॉस्पिटल्समध्ये हलवण्यात आलं आहे. हे हॉस्पिटल वॉटरप्रुफ आहे मात्र जोराचं वादळ असेल तर नुकसान व्हायला नको.

-पिण्याच्या पाण्याचा साठा करून ठेवा.

-आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा. प्रथमोपचार तयार ठेवा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)