You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#BoisLockerRoom: मुलांना चुकीचं वळण लागू नये म्हणून काय काळजी घ्याल?
- Author, कमलेश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून #BoisLockerRoom आणि #GirlsLockerRoom हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
इन्स्टाग्रामवरच्या एका ग्रुप चॅटमधले काही स्क्रीनशॉट्स 4 आणि 5 मे रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आले आणि या सगळ्या प्रकरणावरून वाद सुरू झाला.
बॉईज लॉकर रूम या ग्रुपमध्ये मुलं काही अल्पवयीन मुलींचे फोटो टाकून त्यावर अश्लील टीका-टिप्पणी करत होती. इतकंच नव्हे तर मुलींवर बलात्कार करण्याविषयीही चर्चा झाली होती.
पहिल्या दिवशी हे प्रकरण चांगलंच गाजलयानंतर दुसऱ्या दिवशी #GirlsLockerRoom हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. मुलींच्या काही तथाकथित ग्रुपवर काही मुलांचे फोटो शेअर करून त्यावर अश्लील कमेंट्स करण्यात आल्या होत्या.
हे स्क्रीनशॉट्स आदल्या दिवशीच्या घटनेमुळे चिडलेल्या मुलांकडूनच शेअर झाल्याचं सांगितलं जात आहे, त्यामुळे ते किती खरे याबाबत सांगणं कठीण आहे.
'बॉईज लॉकर रूम' ग्रुपचे स्क्रीनशॉट व्हायरल होताच सगळीकडे हीच चर्चा सुरू झाली. मुलींच्या सुरक्षेचा विषय असल्याने दिल्ली महिला आयोगानेही या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली.
दिल्ली पोलिसांनीही तातडीने हालचाल करत ग्रुपमधल्या एका मुलाला अटक केली, तर ग्रुप अॅडमिन आणि इतर काही मुलांचीही चौकशी झाली.
या ग्रुप्समधली बहुतांश मुलं-मुली 16-17 वर्षांची आहेत. त्यामुळे पालकवर्गामध्ये विशेष काळजी व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावर अनेक क्लोज ग्रुप्समध्ये अश्लील गप्पा होत असतात. त्यामुळे आपल्या पाल्यांना या दिशेने जाण्यापासून कसं रोखावं, हा पालकांसमोर मोठा प्रश्न असतो. मात्र, पौगंडावस्थेतली मुलं-मुली अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांकडे कशी वळतात, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.
एक नव्हे तर अनेक कारणं
दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमधले मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज कुमार सांगतात की, पौगंडावस्थेतली मुलं-मुली अशा अश्लील ग्रुपमध्ये सहभागी होण्यामागे आणि इथून पुढे चुकीच्या मार्गावर जाण्यामागे अनेक कारणं असू शकतात.
ते म्हणाले, "मुलं ज्या वातावरणात वाढतं, त्यातूनच शिकतात. मुलांसाठी तीन ठिकाणं अत्यंत महत्त्वाची आहेत. - घर, शाळा आणि मित्र (पिअर ग्रुप). यापैकी घर सर्वात महत्त्वाचं आहे. घरातच भांडण-तंटे, अपमान, शिवीगाळ होत असेल तर लहान मुलांसाठी ही सामान्य बाब होऊन जाते."
"उदाहरणार्थ, घरात बरेचदा नकळत स्त्रियांचा अपमान होईल, अशा प्रकारे बोललं जातं. यामुळे मुलांच्या मनात स्त्रियांची तशीच प्रतिमा तयार होते. अशी मुलं स्त्रियांकडे आदाराने बघत नाहीत."
पीअर प्रेशर
शाळेत गेल्यावर मुलांचे नवे मित्र तयार होतात आणि इथूनच त्यांच्यावर आसपासच्या मित्रांकडून दबाव येऊ लागतो. पीअर प्रेशर म्हणजे आपण ग्रुपमधल्या इतर मुलांच्या बरोबरीचे आहोत, हे अनेकांना सिद्ध करायचं असतं. इतर मुलं जे करतात ते आपणही करू शकतो, हे दाखवून द्यायचं असतं.
डॉ. पंकज म्हणतात, "समजा एखाद्या ग्रुपमधली काही मुलं स्मोकिंग करतात, शिवराळ भाषा वापरतात आणि त्यांचं हे वागणं कूल मानलं जातं. अशा ग्रुपमध्ये फिट होता यावं, यासाठी मुलं कूल दिसण्याच्या नादात हेच सगळं करू लागतात. आपल्याला कुणी नेभळट समजू नये, अशी घालमेल त्याच्या मनात सुरू असते."
डॉ. पंकज हेदेखील सांगतात की बॉईज लॉकर रूम ग्रुपमधली सगळी मुलं पुढे जाऊन बलात्कारीच होतील, असं नाही. अनेकांना केवळ आपलं वजन दाखवायचं असतं.
मोकळेपणा आणि संकुचितपणा यातली घुसमट
आपल्या समाजात सेक्स एज्युकेशन योग्य पद्धतीने दिलं जात नाही, असा डॉ. पंकज यांचा आक्षेप आहे. ज्या शाळांच्या अभ्यासक्रमात हा विषय असतो, तिथेही शिक्षक घाईघाईने विषय पूर्ण करताना दिसतात. स्वतः शिक्षकांनाच हा विषय समजवून सांगताना संकोच वाटतो. मात्र, वाढत्या वयाबोरबर मुला-मुलींमध्ये हार्मोनल बदल होत असतात. या बदलांचा सामना करणारा मुलगा मग त्याचे मित्र किंवा इंटरनेटवर त्याच्या उत्सुकतेचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.
मुलं एका सांस्कृतिक विरोधाभासात जगत आहेत. आजची मुलं अशा काळात आहेत जिथे सेक्च्युअल कंटेंट इंटरनेटवर उघडपणे उपलब्ध आहे. देश-परदेशातले सिनेमे ही मुलं बघू शकतात. सिनेमांमध्ये सेक्स सीन, आयटम सॉन्ग आणि दुहेरी अर्थाचे डायलॉग्ज यांचा भडीमार असतो.
तर दुसरीकडे समाजात सेक्सवर उघडपणे बोलणं वर्ज्य आहे. मुलांनी या विषयावर काही प्रश्न विचारले की, ते टाळण्याकडेच अधिक कल असतो. प्रेमसंबंध तर लोकांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. त्यामुळे अशा वातावरणात मुलांना आपल्या प्रश्नांची उत्तरं आपले आई-वडील देऊ शकत नाहीत, असं वाटू लागतं.
चित्रपटांमध्ये दुबळी नायिका आणि तिच्यावर वर्चस्व गाजवणारा पुरुष, असं सर्रास चित्रण असतं. मात्र, यामुळे महिलांप्रती हीन भावना निर्माण होत असते.
डॉ. पंकज सांगतात, "व्हर्च्युअल जगात मोकळेपणा, प्रत्यक्ष आयुष्यात संकुचितपणा आणि त्यात शरीरात होणारे बदल, या सर्वांचा सामना करणाऱ्या तरुणांना त्यांचे प्रश्न आणि भावना व्यक्त करण्यासाठी अशी स्पेसच मिळत नाही जिथून त्यांना योग्य दिशा मिळेल. आपल्या समाजात पालक मुलांशी सेक्स एज्युकेशनवर चर्चा करण्यास सक्षम नाही, हेदेखील वास्तव आहे. त्यामुळे शाळांचा जबाबदारी वाढते."
काय असेल भविष्य?
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. संजिता प्रसाद सांगतात की, इंटरनेट किंवा सोशल मीडिया ग्रुपवर प्रमाणापेक्षा जास्त वेळ घालवल्याने याचं व्यसन लागू शकतं. सोशल मीडिया आणि इंटरनेट मुलांचं व्यसन बनलं तर हे व्यसन त्यांचं मानासिक आरोग्य आणि करियर यावर मोठा परिणाम करू शकतात. यातून बाहेर येणंही सोपं नसतं.
अशी मुलं सायबर गुन्हेगारीकडे वळू शकतात. अशी मुलं त्या लोकांच्या संपर्कातही येऊ शकतात, जी किशोरवयीन मुलांचा गैरफायदा घेण्यासाठी टपलेली असतात.
'बॉईज लॉकर रूम' ग्रुपमधली मुलं बलात्कार करण्याविषयी चॅट करत होते. बलात्कारासारख्या गुन्ह्याचं गांभीर्य त्यांना माहिती नाही. पुढे त्यांच्यात स्त्रियांवर होणाऱ्या इतर अत्याचारांविषयची संवेदनशीलता कमी होऊ शकते.
पालकांनी काय करावं?
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. संजिता प्रसाद यांच्या मते मुलांच्या वागणुकीतील बदलाचा मार्ग कुटुंबातूनच जातो. पालक काही विशिष्ट गोष्टींवर लक्ष देऊन मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतात.
मुलांशी चर्चा करा - आपण मुलांसोबत किती वेळ घालवतो, त्यांच्याशी किती बोलतो, हे तपासलं पाहिजे. ते लहान असल्यापासनच आपण त्यांच्याशी बोलत नसू तर किशोरावस्थेत आल्यानंतर त्यांना आपल्याशी बोलायची इच्छा होणार नाही.
तुमचं वर्तन : कुटुंबाचे आदर्श किती मजबूत आहेत यावर मुलांचं वागणं बऱ्याचअंशी अवलंबून असतं. मुलं इतरांचं बघून शिकतात. आईवडील घराच्या बाहेरच नाही तर घरातही किती सभ्यपणे वागतात, याचा मुलांवर परिणाम होत असतो.
मर्यादा सांगा - मूल लहान असल्यापासूनच त्याला मर्यादा घालून द्या. असं केल्याने पौगंडावस्थेत आल्यावर त्याला अचानक आपल्यावर बंधनं लादली जात आहेत, असं वाटणार नाही.
मूल 6-7 वर्षांचं असल्यापासूनच त्याला एखाद्या गोष्टीला किती मर्यादा आहे, हे समजवून सांगावं. उदारणार्थ, खेळणं, टिव्ही किंवा मोबाईल बघणं, यांच्या वेळा ठरवून द्याव्या. चूक झाल्यावर आईवडील बोलतील, याची जाण त्याला असायला हवी.
विश्वासाची मर्यादा - मुलं आणि पालक यांच्यात विश्वास असायला हवा. मात्र, या विश्वासाचीही मर्यादा असायला हवी. आपलं मूल चूक करणारच नाही, या गैरसमजात राहू नका. त्याचवेळी मुलांनाही हे कळायला हवं की त्याने आई-वडिलांचा त्याच्यावर असलेल्या विश्वासाचा आदर करायला हवा.
अडचणीत साथ द्या - मुलावर एखादी अडचण ओढावली तर त्याला एकटं सोडू नका. उलट योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्या. असं केल्याने ते योग्य मार्गावर येतील.
मुलांवर पाळत ठेवावी का?
सोशल मीडियावर मुलं काय करत आहेत, हे जाणून घेण्यासाठी बरेचदा हेरगिरी करणारे अॅप मुलांच्या फोनमध्ये डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याने किती फायदा होतो?
सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल म्हणतात, "मुलांच्या मोबाईलवर तुम्ही हेरगिरी करणारे अॅप डाऊनलोड करू शकता. मात्र, आपल्याला वाटतो तेवढा त्याचा फायदा होत नाही. आजकाल मुलंही इतकी स्मार्ट आहेत की त्यांना हे माहिती असतं की अमुक एक अॅप आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी टाकलेला आहे. तेही यातून मार्ग काढतात."
"दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांना कळलं की तुम्ही त्यांच्यावर पाळत ठेवत आहात की मग त्यांचा तुमच्यावरचा विश्वास डळमळीत होतो."
पवन दुग्गल म्हणतात की यापेक्षा मुलांशी सायबर क्राईम आणि यासंबंधीच्या कायद्याविषयी बोला.
ते म्हणतात, "आज प्रत्येकाच्या घरात एक डिजीटल दरी निर्माण झाली आहे, ही खरी समस्या आहे. मुलांना नव्या तंत्रज्ञानाची उत्तम माहिती आणि जाण असते. पण पालकांना विशेष माहिती नसते. त्यामुळे पालकांनीही स्वतः जागरुक असणं गरजेचं आहे."
पवन दुग्गल पुढे म्हणतात, "मुलं, विशेषतः तरुण मुलांना बरेचदा आपण करतोय तो गुन्हा आहे की नाही, हेच माहिती नसतं. अशात उत्तेजना आणि रोमांच यामुळे मुलांच्या हातून चुका घडतात."
आणि म्हणूनच पवन दुग्गल यांचा सल्ला आहे की मुलांना सायबर स्पेस, त्याच्या मर्यादा, फायदे आणि तोटे याविषयी घरी आणि शाळांमध्ये सांगितलं जावं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)