देवेंद्र फडणवीस: सत्ता गेल्यावरही महाराष्ट्र भाजपवर पकड कशी ठेवली?

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

भाजपची विधानपरिषदेची यादी जाहीर झाली आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांना डावलून रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, डॉ. अजित गोपछडे या नेत्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली.

या यादीमुळं आधीच विविध कारणाने नाराज असलेल्या राज्य भाजपमधील नेत्यांच्या नाराजीत आणखीच भर पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातल्या राजकारणातील महत्त्व वाढलंय हे आजच्या तिकीटवाटपातून दिसून येतं. मात्र ते त्यांची वेगळी टीम आणू पाहत आहेत का? देवेंद्र फडणवीस जातीची समीकरणं कशी साधत आहेत अशा अनेक प्रश्नांबाबत आम्ही विविध राजकीय विश्लेषकांशी संवाद साधला.

'देवेंद्रच चेहरा आणि मोहरा'

देवेंद्र फडणवीस हाच आता भाजपचा चेहरा आणि नवा मोहरा निर्माण करायचा आहे असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संजय मिस्कीन यांना वाटतं ते म्हणतात, "जनसामान्यांमध्ये प्रतिमा असलेल्या नेत्यांची फळी मोडून काढायची आहे त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या अत्यंत उतावीळ नेत्याला त्यांनी उमेदवारी दिली आहे. पडळकर यांच्यासारख्या लोकाधार नसलेल्या चेहऱ्यांना पुढे करायचं आहे हे या निवडणुकीत दिसून येतंय."

"मुळात विधानसभेच्या निवडणुकीत बावनकुळेंच्या रुपात त्यांनी तेली समाजाच्या उमेदवारांना डावललं. त्याचा फटका त्यांना बसला. त्यांची सत्ता यामुळे गेली तरी त्यांनी हे तमाम राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मोठ्या नेत्यांना तिकीट न देता फक्त वाक्चातुर्य असलेल्या लोकांना शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करण्यासाठी राजकारणाचा पाया रचणं हा उद्देश आहे."

नाकारलेल्यांवर पक्षश्रेष्ठींचा राग

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी या चौघांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात खळबळ माजली होती. त्यानंतर वेळोवेळी खडसे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. पंकजा मुंडे यांनीही त्यांची नाराजी दाखवण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले खरे. पण त्यांचा तो प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही.

मात्र या ज्येष्ठ नेत्यांना तिकीट नाकारण्यात देवेंद्र फडणवीसांचा फारसा हात नाही असं लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक यदू जोशी यांना वाटतं.

एकनाथ खडसे

फोटो स्रोत, FACEBOOK/BBC

"देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्रं आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात विधान परिषदेसंदर्भात त्यांचं मत लक्षात घेणं अतिशय स्वाभाविक आहे. त्यांनी आणि चंद्रकांत पाटलांनी खडसे, मुंडे आणि बावनकुळेंचं नाव दिल्लीला पाठवलं होतं हे खुद्द खडसेंनीच सांगितलं आहे. त्यांचं नाव राज्यसभेच्या वेळीही पाठवलं होतं. पण पक्षश्रेष्ठींनी ते मान्य केलं नाही. त्यामुळे खडसे, मुंडे किंवा बावनकुळे यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींची नाराजी आहे. असं त्यातून लक्षात येतं," असं जोशी म्हणाले.

ज्यांना संधी मिळाली आहे ते फडणवीसांचे निकटवर्तीय आहेत. दटके हे पक्षाचे अतिशय निष्ठावान कार्यकर्ते आहेत. पडळकर, मोहिते पाटील फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपात आले. डॉ. अजित गोपछडे हेही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत.

उमेदवारांना आपल्याला संधी मिळावी हे वाटणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येकाकडे पाहण्याच्या पक्षाच्या फुटपट्ट्या वेगळ्या असतात. नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी हे पक्षाला वाटलं असावं, असं मला वाटतं. जोशी पुढे सांगतात.

आज झालेल्या तिकीट वाटपात गोपीचंद पडळकर आणि रणजीतसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. दोघंही विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपात आले होते. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावानांना सोडून इतरांना तिकीट का दिलं असावं याबद्दल ज्येष्ठ पत्रकार राही भिडे त्यांचं मत नोंदवतात.

"आजचं तिकीटवाटप पाहिलं तर असं लक्षात आलं की बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे कुठेतरी हे लोक टिकून रहावेत हा त्यामागचा उद्देश असावा. कारण पक्षप्रवेशाच्या वेळी काहीतरी आश्वासनं दिली असणारच. ती पूर्ण करणंही भाग आहे या लोकांमागे मोठा मतदारसंघ आहे. तो टिकवणं हाही त्यामागचा उद्देश असावा आणि त्यामुळे हे निर्णय फक्त देवेंद्र फडणवीस घेत नाही. त्याच त्यांच्याही समर्थकांचाही तितकाच हात आहे." त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे एकटे भाजपचा चेहरा होऊ शकत नाही, असं त्यांना वाटतं.

ही तर 'बॉस' ची इच्छा

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सत्तासमीकरणं बदलली. 80 तासांचे मुख्यमंत्री होण्याचाही विक्रम त्यांनी या काळात नोंदवला. त्यामुळे ते सत्तेसाठी आगतिक आहेत असं चित्र निर्माण झालं. नुकतंच उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवरूनही जे राजकारण झालं तेव्हाही देवेंद्र फडणवीसांवर टीका झाली. मात्र सध्या देवेंद्र फडणवीस वेगळ्या प्रकारे आगतिक आहे असं महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित यांना वाटतं.

देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

"सत्तास्थापनेत शिवसेनेने दिलेला धक्का पचवल्यानंतर पक्षातील असंतुष्टांना मोठा हादरा देण्याची ही भाजपची खेळी दिसते. उद्धव ठाकरे यांचे संयमी नेतृत्व दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत असताना राज्यातील भाजपला नवा चेहरा देण्याचाही हा पद्धतशीर प्रयत्न असावा. फडणवीस, गडकरींना या निर्णयाची कल्पना नव्हती, असे समजणे मात्र चुकीचे ठरेल. विधानसभेत त्यांना प्रयत्नांना अपयश आले होते. विधानपरिषदेच्याही परीक्षेत जुने 'सहकारी' अनुत्तीर्ण ठरतील याची काळजी 'बॉस'ने घेतलेली दिसतेय. भाजपने हेतुपुरस्सर बहुजनांची नवी फळी समोर आणली असेही म्हणता येईल. नाराजांच्या पुनर्वसनासंदर्भात राज्यातील नेते आधी अगतिक होते. आताही ते असहाय्य ठरले. नव्यांना संधी दिल्याने जुनी दुखणी सांभाळण्याची कसरत फडणवीसांना 'सध्यातरी' करावी लागेल."

जुन्या जाणत्या नेत्यांनी भाजपचं बहुजनीकरण केलं होतं. आता मात्र भाजपचं एकतर्फीकरण झालं आहे असं अपराजित पुढे म्हणाले.

एकूणच महाराष्ट्र भाजपच्या राजकारणावर देवेंद्र फडणवीसांचा किती प्रभाव पडतो हे पुढच्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)