पंकजा मुंडे यांनी विधान परिषद उमेदवारीबाबत काय प्रतिक्रिया दिली?

फोटो स्रोत, Hindustan Times
महाराष्ट्र भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले आणि राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली.
गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे.
या यादीत पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या नेत्यांची नावं नसल्यानं चर्चांना उधाण आलं.
यापैकी एकनाथ खडसेंनी आपली नाराजी तातडीनं माध्यमांकडे व्यक्त केली. मात्र, पंकजा मुंडे यांनी मौन बाळगलं होतं. अखेर रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

फोटो स्रोत, Getty Images
या निर्णयाचा मला धक्का बसला नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या उमेदवारांना 'आशीर्वाद' दिले खरे, पण त्यांच्या संपूर्ण ट्वीटमधून नाराजी प्रकर्षानं डोकावते.
त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय, "आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय, ठीक आहे. पण वाघांनो, असं रडताय काय? मी आहे ना! 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशीर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही, कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपच्या त्या चार ही उमेदवारांना आशीर्वाद!"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
पंकजा मुंडे यांनी केवळ आपल्याला उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली नाहीय, तर जाहीर झालेल्या उमेदवारांबाबतही नाराजी दर्शवलीय. 'त्या चार उमेदवारांना' असं म्हणत त्यांनी या नाराजीचे संकेत दिलेत.
पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येत विस्तृत मत मांडलं नसलं, तरी त्यांच्या ट्वीटमधून त्यांची नाराजी प्रकर्षानं दिसून आलीय.

फोटो स्रोत, Getty Images
याआधीही म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी स्वपक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यांच्या निशाण्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, हे आता लपून राहिलेलं नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये झालेल्या मेळाव्यात जाहीर नाराजी व्यक्त करत, पक्षासाठी काम करणार असल्याचं म्हटलं. मात्र, त्यानंतर त्या काहीशा अज्ञातवासातच गेल्या. पक्षाच्या बैठकींनाही त्या हजर नव्हत्या.
पंकजा मुंडे यांच्याबाबतचा प्रश्न आम्ही लोकमत औरंगाबादचे संपादक सुधीर महाजन यांना विचारला. ते म्हणाले, "भाजपनं दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. त्यामुळे एखाद्या समाजाच्या व्होट बँकेचा विचार करायचा असल्यास भाजपला त्या समाजाला पुन्हा एक सीट देण्यास स्वारस्य नसेल.
"दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. पराभूत उमेदवारांचा पक्ष विधान परिषदेसाठी विचार करेलच असं नाही. पंकजा मुंडेंनीही विधान परिषदेची निवडणूक लढवण्याविषयी कधीच वक्तव्य केलं नव्हतं. एखाद्या नेत्याचा निवडणुकीत पराभव होतो, याचा अर्थ त्याची राजकीय कारकीर्द संपली असा होत नाही. सत्तेच्या परिघाबाहेर असतानाही पंकजा मुंडे यांचं राजकीय काम सुरूच आहे."
पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही उमेदवारी मिळाली नाहीय. खडसेंनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केलीय.
पक्षातल्या नेत्यांऐवजी बाहेरच्यांना संधी दिली गेलीय - एकनाथ खडसे
त्यामुळे एकनाथ खडसेंनी नाराजी व्यक्त केली आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "दुःख वाटतं की विधानपरिषद हे ज्येष्ठांचं सभागृह आहे. पण ज्यांना संधी दिली आहे ते पक्षाच्या बाहेरून आलेले लोक आहेत. भाजपमध्ये वर्षानुवर्षे काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत. माधव भंडारी आहेत, गणेश हाके असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांना पक्षाकडून काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते. अशा लोकांना संधी न देता बाहेरच्या लोकांना संधी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"मोहिते पाटील हे वर्षानुवर्षे राष्ट्रवादीत राहीले त्यांना इथे आल्यावर लगेच संधी दिली. गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोहिम उघडली होती. भाजपवर त्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यांनी मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या होत्या. जेव्हा अशा लोकांना संधी मिळते तेव्हा निष्ठावंत जे वर्षानुवर्षे काम करतायेत ते दुखावले जातात."
चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत भूमिका उद्या स्पष्ट करणार असल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
भाजपमध्ये निष्ठांवत असणं हा गुन्हा आहे का? - राम शिंदे
भाजपकडून विधानपरिषदेवर माजी मंत्री आणि भाजप नेते राम शिंदे यांना उमेदवारी मिळेल, अशीही चर्चा सुरू होती.
बीबीसी मराठीला त्यांनी सांगितलं, "विधानपरिषद हे वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचं सभागृह आहे. असेच नेते तिथं गेले पाहिजेत. त्यामुळे मग या लोकांपैकी कुणी निवडणूक हरलं असेल किंवा ज्याची गरज आहे, अशा लोकांना संधी दिली जाते, असा विधानपरिषदेचा इतिहास आहे.
"मी राज्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं आहे. पक्ष नेतृत्व मला संधी देईल अशी अपेक्षा होती. माझं पुनवर्सन करण्याची आवश्यकता होती, परंतु तसं गेलं नाही. यामागे पक्षाचा काय विचार आहे, ते मला माहिती नाही. त्यामुळे मग आता निष्ठावंत असणं, चांगलं काम करणं हा गुन्हा आहे काय, अशी भावना माझ्या मनात यायला लागली आहे."

फोटो स्रोत, facebook
दरम्यान, भाजपच्या या निर्णयाची बातमी घोषणेआधी 'सरकारनामा'मध्ये मृणालिनी नानिवडेकर यांनी दिली होती. या निर्णयाबद्दल त्या म्हणतात, "भाजपनं एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना यापूर्वी लढायला संधी दिली होती. शिवाय या दोन्ही नेत्यांच्या घरात खासदार आहेत. त्यामुळे कुटुंबशाहीच्या विरोधात आरडाओरड करणाऱ्या भाजपला या नेत्यांना संधी देणं परवडणारं नव्हतं.
"याशिवाय पडद्यामागून हे नेते पक्षविरोधी कारवाया करत होते. रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली, कारण भाजपला पश्चिम महाराष्ट्रात भाजपला जागा हवी आहे. धनगर आरक्षण न दिल्यामुळे धनगर समाज भाजपपासून दूर गेला आहे. त्यामुळे या समाजाला जवळ करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आलीय."
हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय
"भाजपमध्ये राज्यानं इच्छुकांची नावं पक्षश्रेष्ठींकडे पाठवणं आणि त्यांनी दिलेला निर्णय मान्य करणं अशी पद्धती आहे. महाराष्ट्रानं यादी पाठवल्यानंतर पक्षश्रेष्ठी निर्णय़ करतं. त्यामुळे हा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आहे. पक्षश्रेष्ठींनी आगामी काळातला काही विचार केलेला असेल," अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
"एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं चर्चेत होती. पण, केंद्र सरकारनं भविष्याचा विचार करून निर्णय केला असेल. आमच्यासारख्यांना केंद्रानं तो विचार सांगितलाच पाहिजे असा नाही."चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, "भूतकाळात खडसेंनी कधी काही नावं पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असेल आणि पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्याच नावांना पसंती दिली असेल, तर त्यावेळी त्यांनी इतरांना याविषयी समजावून सांगितलं असेल. याहीवेळेला ते स्वत:ला समजावून सांगतील. ते अनुभवी आहेत."
गोपीचंद पडळकर कोण आहेत?
धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. धनगर समाजाच्या अरक्षणासाठीच्या अनेक आंदोलनांचे पडळकरांनी नेतृत्व केलंय.
भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून पक्षात महत्त्वाच्या पदावर असतानाच, 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी पक्षाला राम राम ठोकला. सांगलीतून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते.

फोटो स्रोत, Hindustan Times
अखेर त्यांनी भाजपला राम राम ठोकला आणि वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर ते सांगली लोकसभा लढले. मात्र, भाजपचे संजयकाका पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. भाजपने पडळकरांना थेट बारामतीतून उतरवलं.
अजित पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीच गोपीचंद यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.
मात्र बारामतीत अजित पवारांच्या समोर गोपीचंद पडळकर तग धरू शकले नाहीत. अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले आणि पडळकर त्या निवडणुकीतही पडले.
आता भाजपनं पडळकरांना थेट वरच्या सभागृहात म्हणजे विधानपरिषदेत जाण्यासाठी उमेदवारी दिलीय.

- वाचा - महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 3.0मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

रणजित सिंह मोहिते-पाटील
लोकसभेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये दाखल झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातील माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, भाजपना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला तो रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने.

फोटो स्रोत, Hindustan Times
रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजितसिंह हे पहिले अध्यक्ष होते.
2009 ते 2012 या कालावधीत रणजितसिंह मोहिते पाटील राज्यसभेत खासदार होते.
प्रवीण दटके कोण आहेत?

फोटो स्रोत, प्रवीण दटके
प्रवीण दटके हे भाजपचे नागपूर शहराध्यक्ष आहेत. दटके हे नागपूरचे माजी महापौर आहेत. सध्या ते नागपूरचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असून, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव सु्द्धा आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रवीण दटकेंची नाराजी समोर आली होती. प्रवीण दटके यांना मध्य नागपूरमधून भाजपची उमेदवारी हवी होती. पण तिथून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले होते.
डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?
नांदेडमधील डॉ. अजित गोपछडे हे प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे डॉ. गोपछडे हे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपचे निष्ठावंत म्हणून डॉ. अजित गोपछडे यांची पक्षांतर्गत ओळख आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








