पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार?

एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे

फोटो स्रोत, BBC / Facebook

फोटो कॅप्शन, एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे
    • Author, नीलेश धोत्रे आणि प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी

उद्धव ठाकरे सरकारवर आलेली टांगती तलवार अखेर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानं बाजूला झाली आहे. पण या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकारणात चुरस निर्माण होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या आमदाराकीमुळे ही निवडणूक चर्चेत आली असली तरी या निमित्तानं भाजप आणि महाविकास आघाडीत सर्वकाही अलबेल आहे का, हे पुढे येणार आहे.

21 मे रोजी राज्यात विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 मे आहे. 24 एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक कोरोना संकटामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागा

"विधानसभेत निवडून आलेले 288 आमदार या 9 जागांसाठी मतदान करतील. एकूण पक्षीय बलाबल पाहता भाजपला त्यांची चौथी आणि महाविकास आघाडीला त्यांची सहावी जागा निवडून आणण्यासाठी कसरत करावी लागेल," असं राजकीय विश्लेषक दीपक भातुसे सांगतात.

कोरोना
लाईन

त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी 6 जागा लढवेल, असं म्हटलंय.

"आम्ही 4 जागा लढवू आणि त्यासाठीचे आकडे आमच्याकडे आहेत. एवढंच काय आमच्या 4 जागा निवडून येऊन आमच्याकडे 2 मतं जास्तीची आहेत," असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केला आहे.

भाजपचं गणित कसं असेल?

विधान सभेतल्या एकूण पक्षीय बलाबलानुसार भाजपचे 105 आमदार आहेत, तसंच त्यांच्याकडे छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष म्हणून 10 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांची संख्या होते 115.

"विधानपरिषदेच्या या निवडणुकीसाठी राज्यातले 288 आमदार मतदान करणार आहेत. त्यामुळे 32 आमदारांच्या मागे एक आमदार असं गणित आहे. त्यानुसार मग भाजपचं संख्याबळ पाहता त्यांचे 3 आमदार सहज निवडून येऊ शकता. चौथ्या जागेसाठी भाजपला आणखी 13 आमदारांची गरज आहे," असं दीपक भातुसे सांगतात.

भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून काही मोठ्या नेत्यांची तिकिटं कापण्यात आली होती, तर काही नेते निवडणुकीत पराभूत झाले. परिणामी भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे.

त्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील यांची नावं तर आहेतच. शिवाय स्मिता वाघ, पृथ्वीराज देशमुख आणि अरुण अडसर या विद्यमान आमदारांच्या आमदारकीची मुदत या निवडणुकीत संपत आहे.

तसंच प्रकाश मेहता आणि माधव भंडारी यांच्या नावांचीसुद्धा चर्चा आहे.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

"भाजपमधली इच्छुकांची गर्दी पाहाता भाजपमध्ये पुन्हा एकदा संघर्ष निर्माण होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत ज्या 5 जणांची तिकीटं कापली होती, त्यामागे निश्चितच देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती.

"आताही राज्य भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचंच वर्चस्व आहे. प्रदेशाध्यक्ष जरी चंद्रकांत पाटील असले तरी देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम आहे. त्यांचं दिल्लीतही जास्त वजन आहे. त्यामुळे ते जी नावं दिल्लीत पाठवतील त्यावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे," असं दीपक भातुसे सांगतात.

"वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता म्हणून इच्छा व्यक्त करणं स्वाभाविक आहे," अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे.

फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर त्यांना भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीचं तिकीटही नाकारण्यात आलं होतं. त्यातच नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही त्यांच्या नावाची चर्चा होती.

आता विधान परिषद निवडणुकीतही ते आशा बाळगून आहेत की, त्यांच्या पदरात उमेदवारी पडेल.

एकनाथ खडसे-देवेंद्र

फोटो स्रोत, Getty Images

"विधानपरिषद निवडणूक लढवण्याची इच्छा मी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. याबाबतचा निर्णय काय घ्यायचा ते ठरवतील," असं खडसेंनी म्हटलं आहे.

"याआधीही राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा करण्यात आली होती, आणि पक्षानं देखील माझ्या नावाची शिफारस त्यावेळी केली होती. पण, तेव्हा ते होऊ शकलं नाही. मात्र मला सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात रस होता आणि आजही तो आहे. त्यामुळे आपण विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक आहोत," असं ते म्हणालेत.

दरम्यान, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बीबीसीनं संपर्क केला तेव्हा त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

रिपब्लिकन पक्षाकडून एका जागेची मागणी

महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. भाजपला जिंकता येणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

या मागणीचे पत्र त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहे. आठवले त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चाही करतील.

महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल?

महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांच्या आकड्यांची बेरीज केली तर ती 158वर जाते. शिवाय, महाविकास आघाडीला काही अपक्षांसुद्धा पाठिंबा आहे. त्यांची बेरीज करता हा आकडा 170 च्या आसपास जातो. विश्वासमत ठरावाच्यावेळी सुद्धा त्यांच्या पारड्यात 169 मतं पडली होती. त्यामुळे त्यांचे 5 आमदार सहज निवडून येऊ शकतात.

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, FACEBOOK/NCP

काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस आणि 1 काँग्रेस असा फॉम्युला बीबीसी मराठीला सांगितला.

जर याच फॉर्म्युल्यानुसार आघाडी निवडणूक लढणार असेल तर ती बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत.

पण महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी त्यांना 22 आमदारांची संख्या कमी पडते. आघाडीनं सहावा उमेदवार दिला तर मात्र चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

अपक्षांना बरेचदा सत्ताधारी पक्षांबरोबर राहायला आवडतं, असं दीपक भातुसे सांगतात. त्यामुळे अपक्षांच्या भूमिकेवर आघाडीच्या सहाव्या जागेची मदार असणार आहे.

ज्या 9 आमदारांची मुदत आत्ता संपत आहे त्यापैकी शिवसेनेच्या आमदार आणि विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हेदेखील आहेत.

त्यामुळे शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि उद्धव ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)