कोरोना व्हायरस: आषाढी वारी पालखी सोहळ्याचा अंतिम निर्णय 30 मेनंतर, अजित पवार यांची माहिती

वारी
    • Author, जाह्नवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथ आणि लॉकडाऊनमुळे वारीवर अनिश्चिततेचं सावट आहे.

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आज याबाबत माहिती दिली.

"श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेत पुढील पंधरा दिवसातील कोरोना स्थिती पाहून पुन्हा वारकरी सांप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून, विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेण्यात येईल," अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे, याबाबत आळंदी आणि देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार लॉकडाऊनचे स्वरूप पाहता श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पायी वारी, पालखी सोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.

तसंच, सोलापूर, सातारा, पंढरपूर येथील मान्यवरांची आषाढी वारी पालखी सोहळयाबाबतची मते विचारात घेतली जाणार आहेत.

यंदा आषाढी एकादशी 1 जुलैला आहे. त्यासाठी परंपरेनुसार सुमारे तीन आठवडे आधी म्हणजे 12 जून रोजी देहू येथून संत तुकराम यांच्या तर 13 जून रोजी आळंदीतून संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचं प्रस्थान नियोजित आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथील झाले असले, तरी राज्यातली कोव्हिड रुग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरचे निर्बंध आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं नेहमीसारखा सोहळा झाला नाही, तरी परंपरांमध्ये खंड पडू नये अशी अपेक्षा वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी करत आहेत.

पालखी सोहळ्याच्या प्रतिनिधींचं म्हणणं काय आहे?

काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीनं पालखी सोहळ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती.

आळंदीहून पंढरपूरपर्यंत यात्रा करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार सांगतात, "श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील सर्व महत्वपूर्ण घटकांची बैठक व्हीडियो कॉन्फरन्समध्ये पार पडली. त्यात पालखी सोहळ्याविषयी सर्व पर्यायांची चर्चा झाली आणि असं ठरलं की प्रथा परंपरांचं पालन होत आषाढी वारी ही निश्चितपणे होईल. फक्त त्याचे स्वरूप कसे असेल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे ठरवण्यात येईल."

कोरोना
लाईन

निदान संतांच्या पादुका पंढरपुरात नेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी देहूवरून निघणाऱ्या संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विशाल मोरे यांनी केली आहे.

ते म्हणतात, "आमचा पालखी सोहळा 335 वर्ष अखंडित होतो आहे. शासन ज्या पद्धतीनं सांगेल, त्या पद्धतीनं नियमांच्या चौकटीत राहून आपल्याला महाराजांच्या पादुका परंपरेनुसार पंढरपुरला पायी घेऊन जाव्या लागतील. यात कुठलं आडमुठेपणाचं धोरण बाळगता येणार नाही, कारण हा वारकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळं कुठला धोका आम्हीही स्वीकारणार नाही. पण संतांची परंपरा शासन खंडीत होऊ देणार नाही असा मला विश्वास वाटतो."

वारी

ज्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचा प्रवास होतो, त्या दोन्ही शहरांत कोरोना व्हायरसचा उद्रेक झालेला दिसतो आहे. तसंच शासनानं सशर्त परवानगी दिली तरी पालखीला कुठल्या गावातून जाता येणार नाही, कारण तिथे लोक गर्दी करण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा विचार करून सरकारनं लवकर निर्णय घ्यावा, असं ते सांगतात.

"बाहेरगावातून दिंडी येते, त्या दिंडीप्रमुखांना तयारी करायला एक महिना तरी लागतो. वारीविषयीचा निर्णय शासनानं लवकर घेतला तर त्यांना नेमकं काय करायचे हे समजेल, आम्हीही त्यांना सांगू शकू की, यंदा असा सोहळा होणार आहे, तेव्हा सर्वांनी सहकार्य करा.'

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासनाची भूमिका

राज्यातील इतर धर्मस्थळांप्रमाणेच पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिरही भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. सरकारी आदेशाचं पालन करत मंदिरातले केवळ दैनंदिन पूजा, नित्योपचार सुरू आहेत. मग वारीसाठी मंदिरात काही तयारी सुरू आहे का?

मंदिराचे सरकारनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी सांगतात की, वारीचं आयोजन होईल की नाही, याविषयीचा निर्णय येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे.

"दिंड्यांचा प्रस्थान सोहळा हा त्या त्या संस्थानांच्या अखत्यारीत असल्यानं त्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला हस्तक्षेप करता येत नाही. दिंड्या पंढरपुरात पोहोचल्या की तिथली जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि मंदिर समितीकडे येते," असं ते नमूद करतात.

वारी

पालख्या पंढरपुरात येणार असतील तर काय करायचं, याविषयीची सविस्तर बैठक मंदिर समिती 17 मेनंतर लवकरच घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "प्रशासकीय स्तरावर आम्ही किती पालख्या आणि दिंड्या येतात, त्यांचे कुठे कुठे मुक्काम असतात, प्रत्येक मुक्कामाला किती लोक असतात हे सगळं वरिष्ठांना कळवलं आहे. विभागीय स्तरावर याची सविस्तर बैठक होईल आणि त्यात निर्णय होईल."

सध्यातरी राज्यात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या देहू-आळंदीवरून पालखी सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात दर्शनासाठी जाऊ शकेल का, हे आत्ताच सांगता येणार नाही.

वारी कधी रद्द झाली होती का?

वारी रद्द करावी लागली, किंवा तिचं स्वरूप बदललं तरी असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नसेल. याआधी शंभर, सव्वाशे वर्षांपूर्वी प्लेग, कॉलरा, फ्लू अशा आजारांच्या साथी आल्या, तेव्हा पंढरपूर ओस पडलं होतं. त्यावेळी स्वरूप बदलून वारीचं आयोजन करण्यात आल्याचं तिथले ज्येष्ठ रहिवासी सांगतात..

यंदा चैत्रातली वारीही लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली होती. दर महिन्याला वारी करणारे वारकरीही गेल्या दोन महिन्यांत इथे आलेले नाहीत. पण भाविकांची संख्या लक्षात घेतलीस तर आषाढीचा सोहळा मासिक वारी किंवा चैत्रवारीपेक्षा कैक पटींनी मोठा मोठा असतो. पंढरपुरात त्या दिवशी पालखीसोबत वारी चालून आलेले आणि इतर असे दहा-बारा लाख लोक जमा होतात.

वारी

एरवीही मोठ्या संख्येनं भाविक या मंदिराला भेट देत असतात. मग अशात सोशल डिस्टन्सिंग पाळणं कसं शक्य होईल? हे नियम कसे राबवता येऊ शकतात? त्यावरही मंदिर समितीला विचार करावा लागेल.

पालखीसोबतची गर्दी टाळली तरी पालखी जिथे मुक्काम करेल तिथे लोकांची गर्दी येण्याची शक्यता असते. त्यामुळं असाही पर्याय समोर येतो आहेस की, परंपरेनुसार ठरलेल्या तिथीला पालखीचं प्रस्थान करावं, पालखी गावातच ठेवावी, थेट वाहनानं पाच मानकऱ्यांनी दशमीच्या संध्याकाळपर्यंत पंढरपूर गाठावां आणि एकादशीला दर्शन घ्यावं.

'आत्मा हा विठ्ठल'

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर वारकऱ्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवतात. "आषाढीला मंदिरात जाऊनच दर्शन घेतलं पाहिजे हा वारकऱ्यांचा आग्रह आहे. आताही लोकांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि ओढ लागली आहे. पण सध्या साथीचं संकट मोठं आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन परिस्थितीचा अभ्यास करावा त्याचा अहवाल शासनाला आणि वारकरी संप्रदायाला द्यावा आणि वारी कशी पार पडेल याचा विचार करावा."

शासनाचा निर्णय वारकऱ्यांनीही मान्य करायला हवा, असं ते आवर्जून सांगतात.

"दर्शनाचेही वेगळे अंग सांगितले आहेत. पायावर डोकं ठेवता आलं नाही, तर लोक मुखदर्शन घेतात, तेही झालं नाही तर नामदेवाची पायरी, नाहीतर कळसाचं दर्शन घेतात. आणि तेही शक्य झालं नाही तरी 'पाया पडती जन एकमेका. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग' असं वारकरी मानतात आणि एकमेकांच्या पाया पडतात."

व्हर्चुअल वारीचा पर्याय

गेली जवळपास आठशे ते साडेआठशे वर्ष पंढरपूरच्या वारीची प्रथा वारकरी समाजानं जपली आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातूनही लोक नेमानं वारीत सहभागी होण्यासाठी येतात. पण लॉकडाऊनमुळे अनेकांना पायवारी करणं शक्य होणार नाही. अशावेळी व्हर्च्युअल वारीचा पर्याय आहे.

वारी

'फेसबुक दिंडी'चे स्वप्नील मोरे त्यासाठी नवीन उपक्रम आखत आहेत. "आमच्याकडे नऊ वर्षांचं फुटेज आहे. त्यातून आम्ही वारीतले क्षण पुन्हा निर्माण करण्याचं ठरवलं आहे आणि घरबसल्या लोकांना वारीचा अनुभव देणार आहोत. 'आठवणीतली वारी' मध्ये आम्ही लोकांना त्यांचे वारीतले अनुभव कथन करायला सांगणार आहोत. लहान मुलं घरातल्या घरात संतांची वेशभूष करू शकतात, ते क्षण आमच्यासोबच शेअर करू शकतात."

इतर यात्रांचं काय?

राज्यभरातल्या इतर सर्व यात्रा सरकारनं आधीच रद्द केल्या आहेत. पण पंढरपूर वारीसोबतच देशातल्या दोन आणखी महत्त्वाच्या यात्रांवर प्रश्नचिन्ह कायम आहे.

कोव्हिड-19च्या साथीच्या पार्श्वभूमीवर 23 जूनला सुरू होणारी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष आणि उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साथीच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी कॅम्प किंवा वैद्यकीय सेवा पुरवणं शक्य होणार नसल्याची चर्चा झाली. पण मग ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय सरकारनं मागे घेतल्याचं वृत्त आहे.

तर पुरीमध्ये जगन्नाथाच्या रथयात्रेवरही ओडिसा सरकारनं अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. दरम्यान जगन्नाथ मंदिर प्रबंधन समितीनं रथाच्या निर्मतीला सुरूवात केली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)