जयंत पाटील: भाजपने ट्रोलिंगवरून रडीचा डाव खेळू नये #5मोठ्याबातम्या

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1) ट्रोलिंगवरून भाजपनं रडीचा डाव खेळू नये - जयंत पाटील

एकीकडे महाराष्ट्र कोरोनाशी लढत असतानाच, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावरील ट्रोलिंगवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत.

ट्रोलिंगवरून भाजपनं रडीचा डाव खेळू नये, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहेत. झी न्यूजनं ही बातमी दिलीय.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरून अश्लील शब्दात टीका करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. भाजपचे शिष्टमंडळच आयुक्तांच्या भेटीला गेले होते.

मात्र, भाजपच्या या तक्रारीवर जयंत पाटील यांनी टीका केलीय. ते म्हणाले, "गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर अत्यंत अश्लील टीका होत होती. त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहीय. भाजपाने रडीचा डाव खेळू नये."

तसंच, "आज संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असताना, भाजप नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का?" असा सवालही जयंत पाटलांनी भाजप नेत्यांना उद्देशून विचारलाय.

2) राज्याच्या राजकारणात रस, मला विधान परिषदेवर संधी द्या - खडसे

"महाराष्ट्राच्या राजकारणात मला रस आहे. त्यामुळे मला विधान परिषदेवर संधी द्यावी," अशी इच्छा माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे केलीय. पुणे मिररनं ही बातमी दिलीय.

"नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. पण मी त्या निवडणुकीसाठी इच्छुक नव्हतो. महाराष्ट्राच्या राजकारणात मला रस आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मी इच्छुक आहे. त्याबद्दल पक्ष योग्य निर्णय घेईल," असं एकनाथ खडसे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वावरून पेच निर्माण झाल्यानंतर या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. त्यानुसार आता विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे.

भाजपकडून विधान परिषदेसाठीचे उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. त्यामुळं एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

3) मजुरांकडून रेल्वेनं तिकीट शुल्क आकरू नये, उद्धव ठाकरेंची केंद्राकडे मागणी

"लॉकडाऊनमुळं अनेक मजुरांची आर्थिक स्थिती खालवलीय. त्यामुळं मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि रेल्वेनं आपापल्या गावी परतणाऱ्या मजुरांकडून तिकीट शुल्क आकारू नये," अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केलीय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

"मजूर हातावर पोट असणारे आहेत. आधीच गरिबी, त्यात कोरोनामुळे हतबल झाले आहेत, अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसेही नसतील. त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले तर या काळात त्यांना आधार मिळेल," असेही मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्यास सुरुवात झालीय. महाराष्ट्रातील नाशिक, भिवंडी इत्यादी अनेक ठिकाणांहून विशेष रेल्वे सोडण्यात आल्या.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्यानं महाराष्ट्रात आहेत. जवळपास पाच लाख मजुरांची महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत जेवण आणि निवाऱ्याची व्यवस्था केली होती. आता त्यांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी केंद्रानं रेल्वेची व्यवस्था केलीय.

4) लॉकडाऊन लांबल्यास कधी जनउद्रेक होईल- सुशीलकुमार शिंदे

"लॉकडाऊनचा कालावधी आणखी लांबला, तर लोक खाणार काय, हा प्रश्न निर्माण होईल आणि त्यातून कधी उद्रेक होईल, हे सांगता येणार नाही," अशी भीती माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंद म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

लोकसत्ता वृत्तपत्रातर्फे 'साठीचा गझल... महाराष्ट्राचा' वेबसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात सुशील कुमार शिंदे सहभागी झाले होते.

"कोरोना व्हायरसच्या रुपानं अभूतपूर्व संकट कोसळलं आहे. त्याविरोधात संकट सरकार हिंमतीनं लढत आहे. नागरिक सरकारला सहकार्यही करत आहे," असंही शिंदेंनी नमूद केलं.

यावेळी सुशीलकुमार शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली. ते म्हणाले, "टाळ्या वाजवून, भांडी वाजवून, पुष्पवृष्टी करुन, हा प्रश्न सुटणार नाही. एका व्यक्तीचे महत्त्व वाढवण्याचा हा प्रयत्न असून, देशाची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू आहे की काय, अशी शंका येते."

5) अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आणखी एक FIR दाखल

मुस्लीम समाजाविरोधात द्वेष पसरवल्याचा आरोप करत रझा एज्युकेशन वेलफेअर सोसायटीचे सचिव इरफान अबुबकर शेख यांनी वरिष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पोलिसात धाव घेतलीय. पायधुनी पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आलीय. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.

अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक चॅनेलचे संपादक आणि मालक आहेत.

लॉकडाऊन असतानाही 14 एप्रिलला मुंबईतील वांद्रे इथं जमलेल्या गर्दीच्या विषयावर चर्चेदरम्यान मुस्लीम समाजाविरोधात द्वेष पसरवल्याचा आरोप शेख यांनी त्यांच्या तक्रारीत केलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)