कोरोना लॉकडाऊन : BSFमुळे मासेमारीसाठी समुद्र खुला असा झाला

    • Author, रॉक्सी गाडगेकर
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

कोरोना संकटाच्या काळात गुजरातच्या कच्छमधल्या लाखपत आणि नारायण सरोवर भागातील मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे.

स्थानिक प्रशासन आणि सीमा सुरक्षा दलानं या मच्छिमारांसाठी पुरेशा प्रमाणात कोरोनाच्या स्क्रीनिंग केल्या आणि त्यांना सुरक्षा साधनं पुरवली. तसंच उपजीविकेसाठी आवश्यक असलेली मच्छिमारीही त्यांना करू दिली जात आहे.

लाखपत इथं भारतीय भूमीवरील शेवटची मानवी वस्ती आहे. इथून पाकिस्तानची सीमा फक्त 40 किमी अंतरावर आहे. इथल्या बहुसंख्य माणसांचा उदरनिर्वाह मच्छिमारीवर अवलंबून आहे.

सहा ते सात मच्छिमारांच्या बोटीला तीन ते पाच दिवसांच्या समुद्र सफरीनंतर काहीतरी हाती लागतं. एकदा का ते परत आले तर मच्छिमार्केटमध्ये त्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये मिळतात.

"इथे पकडलेले मासे वेरावळमधल्या मार्केटला पाठवले जातात आणि चांगल्या प्रतीचे मासे निर्यात केले जातात. तर इतर मासे स्थानिक मार्केटमध्ये विकले जातात," असं अखिल भारतीय मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष वेल्जीभाई मसानी यांनी बीबीसीला सांगितलं.

लाखपत इथल्या मच्छिमारांना 22 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत मासे पडण्यासाठी जाता आलं नाही. तेव्हा सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनानं त्यांच्या बोटी परत आणण्यासाठी मदत केली.

लाखपत हे 350 लोकसंख्येचं गाव आहे. सुरक्षा सीमा दलानं पोहोचवण्याआधी गावात अन्नधान्य आणि पाण्याची कमतरता होती.

24 मार्चला गृह मंत्रालयानं मच्छिमारीला लॉकडाऊनमधून वगळलं.

"भारत आणि विदेशातही मासे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. त्यामुळे त्याचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला. लॉकडाऊनमधून मच्छिमारी वगळण्याचं हे मोठं कारण होत," असं मसानी सांगतात.

असं असलं तरी लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतरही मच्छिमारांना स्थानिक प्रशासन आणि सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) मदतीशिवाय समुद्रात जाणं शक्य नव्हतं.

BSF आणि स्थानिक प्रशासनाची मदत

BSFनं स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं मेडिकल स्क्रीनिंग, टेस्ट्सचं आयोजन केलं, तसंच मच्छिमारांना सुरक्षेची साधनंही पुरवली.

BSFचे गांधीनगरचे उप महानिरीक्षक M. L. गर्ग यांनी सांगितलं, "सगळ्यात मोठी जबाबदारी काय होती तर मच्छिमारांसाठी मेडिकल स्क्रीनिंगचं आयोजन करणं आणि आम्ही ते स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं केलं."

लाखपत हे सीमेवरील गाव असल्यामुळे तिथं सुरक्षा असणं ही आमची जबाबदारी आहे,असंही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटाच्या काळात आमची बटालियन राजस्थानमधील बारमेर आणि गुजरातमधील झकाऊ भागातील शक्य तितक्या लोकांना मदत करत आहेत.

"लाखपतमधल्या मच्छिमारांना समुद्रात सोडण्यापूर्वी आम्ही त्यांना ग्लोव्ह्ज आणि सॅनिटायझर दिले. तसंच सोशल डिस्टन्सिंगचे वर्कशॉप घेतले," गर्ग यांनी सांगितलं.

आमचं बटालियन हे कार्य असंच पुढे चालू ठेवणार आहे, असंही ते म्हणाले.

बीबीसीशी बोलताना स्थानिक तहसीलदार A.L. सोळंकी यांनी सांगितलं, "लाखपतमधील 18 आणि कोटेश्वरमधील 94 मच्छिमारांना 13 एप्रिलला समुद्रात सोडण्यात आलं आणि गुरुवारी ते परतले आहेत. प्रत्येत बोटीवर फक्त 4 माणसं असावीत असं बंधन घालण्यात आलं, सामान्यपणे 6 जण एका बोटीत असतात. ग्लोव्ह्जचे जवळपास 500 जोडे, 500 मास्क आणि सॅनिटायझर्स त्यांना पुरवण्यात आलेत."

हा भाग कच्छमधील दयापार पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो.

पोलीस उपनिरीक्षक J.P.सोधा यांनी बीबीसीला सांगितलं, "समुद्रात जाण्यापूर्वी मच्छिमारांना बर्फ, डिझेल आणि अन्नाची गरज असते. आम्ही हे सगळं मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. ते मच्छिमारीहून परत आल्यानंतर त्यांचा माल निर्धारित वेळेत मार्केटमध्ये पोहोचेल आणि लगेच विकला जाईल, याचीही पोलिसांनी काळजी घेतली."

कोटेश्वर आणि लाखपतमध्ये एकूण 50 बोटी आहेत.

'समुद्रात जाणं शक्य नव्हतं, कारण...'

"केंद्र सरकारनं मच्छिमाराचा समावेश अत्यावश्यक सेवांमध्ये केल्यानंतर आम्ही मासेमारीसाठी समुद्रात जायचा प्रयत्न करत होतो," असं मच्छिमार अब्दुल अली यांनी बीबीसीला सांगितलं.

"पण, कोरोनाच्या भीतीमुळे आणि डिझेल व बर्फाच्या तुटवड्यामुळे आम्ही आमच्या बोटी परत आणू शकत नव्हतो," ते पुढे म्हणाले.

प्रत्येक बोटीला समुद्रात जाण्यापूर्वी जवळपास 10 हजार रुपयांचा खर्च येतो.

मच्छिमार हसम भदाला हे मात्र सरकारनं खोल समुद्रात जाण्याची परवानगी न दिल्यानं नाराज आहेत.

"मच्छिमारांना खोल समुद्रात जाऊ द्या, अशी मागणी मच्छिमार संघटनेनं केली आहे, पण अद्याप आम्ही सरकारच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत," भदाला सांगतात.

सर क्रीक या खाडीजवळ पडाळा, पाबेवाडी, ओगन, डेवरीवाडी आणि कोरी या खाडी आहेत. कोरी खाडी क्रॉस करण्याची मच्छिमारांना परवानगी नाही.

"आम्हाला पडाळा खाडीपर्यंत जाऊ दिलं, तर चांगल्या प्रमाणात मासे मिळतील," भदाला सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हालाफेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)