कोरोना व्हायरस या आरोग्य संकटाच्या भीतीने आपण अमानुष होतोय का? - दृष्टिकोन

फोटो स्रोत, ANI
- Author, प्रा. बद्री नारायण
- Role, समाजशास्त्रज्ञ, बीबीसी हिंदीसाठी
कोरोना विषाणूमुळे आलेल्या आरोग्य आणीबाणीमुळे जगभरातील वेगवेगळ्या समाजांमध्ये आजार आणि मृत्यूबरोबरच भीतीही शिरकाव करते आहे. ही भीती अनेकदा रोग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही भयंकर असते, आणि हीच भीती माणसाच्या हातून चुका घडवून आणते.
कोरोनाच्या या संकटकाळात भीती मानवता आणि माणुसकी यांचा पराभव करताना दिसतेय. आपण आपल्याच माणसांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसत नाही, यामागेही भीती हेच कारण आहे.
आज आपण इतरांसाठी हजर आहोत तर ते केवळ SMSद्वारे, सहवेदना व्यक्त करणारे इमोजीद्वारे आणि सोशल मीडियावरून देण्यात येणाऱ्या अमाप उपायांच्या स्वरूपात - स्मार्टफोन्स, व्हीडिओ किंवा ऑडियो संदेश हीच आजच्या संवादाची, सहवेदनेची भाषा झाली आहे.
या भीतीने मानवाला अदृश्य केलं आहे आणि याच भीतीने व्हर्च्युअल रिअलिटी आणि व्हर्च्युअल जगाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. याच भीतीने आपल्याला त्या जागी नेऊन सोडलं आहे जिथे आपल्याला परस्परांची भीती वाटू लागली आहे. आपण एकमेकांना 'बायोलॉजिकल बाँब'च्या स्वरूपात बघू लागलोय. याच भीतीने आपल्या मानवीय देहाचं बायोलॉजिकल देहामध्ये अवमूल्यन केलंय, किंवा आपण म्हणू रूपांतर केलंय.
काही दिवसांपूर्वीच दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, ठप्प झालेला कामधंदा आणि कामाच्या गावी रहायला घर नसणे, या अडचणी आणि असुरक्षिततेच्या भीतीमुळे अनेकांनी आपापल्या गावांची वाट धरली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
मात्र मार्गात काही ठिकाणी त्यांच्यावर केमिकलची फवारणी करण्यात आली. हे रासायनिक स्प्रे बस, लोखंडी हँडल, फरशी, फ्रेम यासारख्या निर्जीव वस्तू निर्जंतूक करण्यासाठी वापरतात. या रासायनिक फवारणीत सोडियम हाइपोक्लोराईट हे रसायन टाकण्यात आल्याचं सांगितलं जातं, जे मानवी त्वचेसाठी घातक असतं. उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये ही घटना घडली.
अशीच एक घटना केरळमधल्या वायनाड जिल्ह्यातही घडली. तिथे चौकातून जात असलेल्या लोकांवर रासायनिक फवारणी करण्यात आली. मात्र कालांतराने अग्निशमन दलाने स्पष्ट केलं की त्या 'रासायनिक' फवारणीत केवळ साबणाचं पाणी होतं, घातक रसायन नव्हतं.
आपल्याच बांधवांमुळे आपल्याला आजार होईल या भीतीपोठी आपण काहीही करायला तयार आहोत, हेच या दोन घटनांवरून स्पष्ट होतं. यावरूनच भीती माणसाला किती अमानुष बनवते, हे स्पष्ट होतं. कोरोना आपल्याला स्क्रिझोफेनियासारख्या एका भयावह संसारात ढकलतोय, ज्यात आपण कुणालाही बघितलं की भीती वाटते.
अशाप्रकारच्या भीतीच्या छायेत आपण एकमेकांना आजार आणि स्वतःच्या अंताचं कारण मानू लागतो. ही भीती मानवी समूहामध्ये दीर्घ काळ उपस्थित राहिली तर 'सोशल स्क्रिझोफ्रेनिया' निर्माण करू शकते.

- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?
- वाचा - कोरोनाचा माझ्या जीवाला किती धोका आहे?
- वाचा -आधी कोव्हिड-19ची किट बनवली, मग बाळाला जन्म दिला
- वाचा-कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा- कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?

प्रसिद्ध विचारवंत जॉर्जियो अगम्बेन यांनी कोरोनाविषयी बोलताना एक महत्त्वाचं वाक्य म्हटलंय - "असं वाटतं जणूकाही आपण एक असा समाज आहोत ज्याच्याकडे स्वतःला जिवंत ठेवण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंच मूल्य नाही. वाटतं जणू आपण bare life (केवळ जगणं) यातच विश्वास ठेवू लागलो आहोत, इतर कशातच नाही."
ते पुढे म्हणतात, "आपण या भीतीमुळे आपल्या सामान्य जीवनातील सर्व मूल्यं, उदा. मैत्री, सामाजिक संबंध, काम, स्नेह, धार्मिक आणि राजकीय कल सर्व विसरतो आहोत."
भीतीच्या या छायेत आपण इतर सर्वांनाच कोरोना पसरवणारं संभाव्य शरीर म्हणून बघू लागलोय. आपल्याला केवळ एकच चिंता उरली आहे. ती म्हणजे - मी तर आजारी पडणार नाही ना...!
भीती आणि सतर्कता यात अंतर आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपण सर्वांनी सतर्क, सजग आणि सावधगिरीने राहायला हवं. मात्र, भीतीचं रुपांतर त्या उंदरात व्हायला नको जो तुमच्या शरीरात जाऊन तुमच्यातली माणुसकी कुरतडून टाकेल.
भीतीचा विस्तार वाढवण्यापासून रोखण्यासाठी आपल्या मनातली संवेदना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. हीच संवेदना आपल्या भीतीला आपलाच शत्रू होण्यापासून रोखू शकेल.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि भीतीमुळे दिल्लीहून निघून बिहारच्या सिवानला गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या एका गटाला एका छोट्याशा जागेत लोखंडी गेटच्या आत बंद करण्यात आलं. ती माणसं रात्रभर रडत-ओरडत होती. या 'तुरुंगासारख्या जागेतून' आम्हाला बाहेर काढा, अशा विनवण्या करत होते.
प्रसार माध्यमांमध्ये ही बातमी पसरताच त्या लोकांना ट्रकमध्ये कोंबून ग्रामपंचायतींनी उभारलेल्या आयसोलेशन सेंटर्सवर (अलगीकरण केंद्रात) नेण्यात आलं. आम्हाला स्वतःला आजारी व्हायचं नाही. मात्र, त्यांना एकत्रित छोट्या जागेत डांबून ठेवणं आणि त्यानंतर ट्रकमध्ये कोंबून संसर्गाच्या फैलावासाठी 'बायोलॉजिकल नेटवर्क' सहज उपलब्ध करून देणं कितपत योग्य आहे?
इतर कुणाला संसर्ग झाला तर चालेल, पण आम्हाला होता कामा नये, ही भावना कितपत योग्य आहे?
भारतीय परंपरेत देहाला कधीच इतकं महत्त्व देण्यात आलेलं नाही. संत परंपरा आणि आपल्या ज्ञान परंपरेत देहाला आत्म्याच्या मुक्कामाचं अस्थायी ठिकाण मानलं गेलं आहे. देह नश्वर, अशाश्वत, अनित्य मानला गेला आहे. त्याची तुलना मुठीतून झरझर निघून जाणाऱ्या वाळूशी, झाडाच्या पानावरच्या दवबिंदूशी करण्यात आली आहे. मात्र, आधुनिकतेने देहालाच सगळं महत्त्व बहाल केलं आहे. आत्म आणि आत्मा यांना काही अर्थच उरलेला नाही.
परिणामी इतका स्वार्थ आणि जगण्याचा मोह निर्माण झाला की त्यामुळे जगण्यासाठी इतरांशी अमानुषपणे वागायलाही लोक मागे-पुढे बघत नाही, असं चित्र आहे. उपभोगाच्या वाढत्या इच्छेने आपल्या आत आपल्या देहाप्रति कधी नव्हे इतकी ओढ, लालसा निर्माण झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पाश्चिमात्य देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना मूठमाती द्यायला जाण्यासाठी कुणी तयार नाही, अशी परिस्थिती या कोरोनाच्या भीतीमुळे निर्माण झाली आहे. राजकीय सत्तेनेही 'ह्युमन-मूव्हमेंट' (मानवी कृती) नियंत्रित केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे एकमेकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवणं, जिवंत रहाण, हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता बनली आहे.
ही कोरोनामय परिस्थिती दीर्घकाळ राहिली तर कोरोना गेल्यानंतरही जगात अनेक ठिकाणी हीच भीती आपल्या समाजाची 'कॉमन मूव्हमेंट' (सामान्य कृती) तोडताना दिसेल. ही भीती आपल्या सवयीचा भाग होऊ नये, हीदेखील चिंतेची बाब आहे. तसं झाल्यास आपल्या संस्थांच्या 'नॉर्मल लाईफ'वर त्याचे गंभीर परिणाम होतील.
तशा परिस्थितीत कोरोना नंतरचा काळ पुनर्जागरणाचा असेल. देहाप्रतीच्या तीव्र ओढीमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या नाशासाठी मोहीम उघडणं भारतीय समाज आणि परंपरेतील मूल्य शिवाय संवेदना, आपुलकी, सहकार, सामुदायिक संवाद, परहित यासारख्या कोरोनाच्या भीतीने कोमेजलेल्या भावनांचा नवअभ्युदय करणं, त्यांना नवचेतना प्रदान करणं आपली मोठी सामाजिक जबाबदारी असणार आहे. म्हणूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंग करत असतानाच इमोशनल क्लोजनेस करा, म्हणून म्हटलं आहे.
यातूनच आपण मानवता आणि या विश्वाला तारू शकू आणि ते जगण्यायोग्य बनवू शकू. आपण भीतीने भयभीत न होण्याचं एक गीत गाऊ...
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








