भाऊंचा फोटो.. आणि साडी चॅलेंज : कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात जुन्या फोटोंवर कवितांचा पाऊस

बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम…अशी अवस्था कोरोनामुळे घरातच लॉक-डाऊन होऊन अडकलेल्या अनेकांची झाली आहे.

काही जणांना 'वर्क फ्रॉम होम' असल्यामुळे त्यांचा वेळ तसा बऱ्यापैकी जातोय. पण बाकीच्यांचं काय?

इंटरनेटवर किती पिक्चर पाहणार? टिकटॉवर किती व्हीडिओ करणार? अजून काहीतरी टाईमपास हवा ना… त्यातूनच फेसबुकवर एक ट्रेंड सुरू झालाय... आपल्या मित्रमैत्रिणींचे जुने फोटो काढून त्यावर कमेंट करण्याचा…!

बरं या कमेंटही आता स्माईल 🤪 थम्स-अप 👍🏻 सुंदर 👌🏻,अशा नाहीयेत... तर कल्पनाशक्ती लढवून अगदी काव्यात्मक शैलीतल्या आहेत. विचार करायला वेळच वेळ आहे ना आता…

तुमच्याही जुन्या फोटोवर अशा काही ओळी आल्या आहेत का? नसतील तर फेसबुकवर सुरू झालेल्या या ट्रेंडमधली ही साहित्याची काही लेणी नक्की वाचा -

  • पोरांना आस गुलाबाच्या कळीची...भाऊंची नजर कायम च निळू फुलेची
  • टीव्हीचा volume केला म्यूट....भाऊचा फोटो पाहून पोरी म्हणतात माझा पिल्लू किती क्यूट...
  • भाऊंनी फोटो टाकला जुना...तरीपण पोरी म्हणतात हीच माझी गायछाप, हाच माझा चुना ...
  • भाऊंचा फोटो पाहून पोरी आल्या धाऊन....म्हणू सरकारने केलं21 दिवस लॉकडाऊन
  • ✨शर्ट घालून भाऊंनी उघड्या ठेवल्या दोन गुंड्या…सगळ्या मुली म्हणतात हाच माझा हार्दिक पंड्या.
  • चिवडा आणला कांदा आणला बनवली मस्त भेळ...पोरगी घायाळ फक्त भाऊच्या एका नजरेचा खेळ
  • कोरोनापुढे झुकली इटली... अन् पोरी म्हणतात...मीच लावणार भाऊच्या नावाची टिकली.
  • चीनमध्ये नवीन व्हायरस आला हंताभाऊला सगळ्या पोरी I love u म्हंता...
  • राजाला इंग्रजी मध्ये म्हणतात किंग...आणि आपल्या भावाला सगळ्या पोरी म्हणतात हाच माझा रणवीर सिंग
  • वुहानमध्ये आला कोरोना झाले सगळे Quarantine,भाऊंचा फोटो पाहून पोरी म्हणतात "Will u be my Valentine"

ट्रेंडच्या या लाटेवर मार्क झुकेरबर्गही?

ज्या फेसबुकवर ही मैफल सजली आहे, तिथे आता मैफलीचा आयोजक बसला असेल तर तोही फसणारच.

भावांच्या या शायरीमधून अगदी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग हेही सुटले नाही. लोकांनी अगदी मार्क यांच्याही जुन्या फोटोवर मराठीतून आपल्या काव्यात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यातूनच आमच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर हाही मेसेज आला -

“माझ्या जुन्या फोटोवर एका विशिष्ट भारतीय भाषेमध्ये काही कमेंट येत आहेत. त्यातल्या बऱ्याचशा कमेंट या मुंबईमधून येत आहेत. बहुधा हा एखादा ट्रेंड असावा,” अशी मार्क झुकरबर्गची पोस्ट आणि त्याखाली त्यानं त्याच्या जुन्या फोटोवर मराठीतून केलेली कविताही टाकली आहे.

हे वाचून अनेकांना आपल्या ट्रेंडची दखल कशी थेट झुकेरबर्गनं घेतली, असं वाटत असेल तर त्यांनी विचारांना थोडासा ब्रेक लावलेला चांगलं. कारण अर्थातच, आपल्या मराठी ‘भावां’च्या या कल्पनाशक्तीची दखल अजून तरी झुकेरबर्गनं घेतलेली नाहीये. हे हे अकाउंट अर्थातच फेक आहे.

साडी चॅलेंज

फेसबुकवर सध्या फक्त हाच एक ट्रेंड सुरू आहे, असं नाही. मुलींनीही साडी नेसलेला आपला ‘सोलो’ फोटो टाकून आपापल्या मैत्रिणींना टॅग करायला सुरुवात केलीये.

त्यावरूनही वेगळे मीम्स तयार झाले आहेत.

हे सगळे रिकामेउद्योग असं नाकही काहीजण या ट्रेंड्सना मुरडतील.

पण आजूबाजूला सारख्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या सुरू असताना आपल्या आयुष्यातले आनंदी, हसरे क्षण आठवून कोरोनाला विसरायला यामुळे नक्कीच मदत होतीये.

तुम्हाला काय वाटतं?

हेही नक्कीच वाचा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)