कोरोना व्हायरस : मुंबई लॉकडाऊनमुळे भिकारी आणि बेघरांच्या रोजच्या जगण्याचं काय होणार?

पत्रकार मनिष झा बेघरांना अन्न वाटप करताना

फोटो स्रोत, Manish jha

फोटो कॅप्शन, मुंबईतल्या भिकारी आणि बेघरांचा आकडा नेमका किती आहे यावर अनेकदा चर्चा होत असते. पण, नेमकी वस्तुस्थिती आजही पुढे येऊ शकलेली नाही.
    • Author, संकेत सबनीस
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"सर ये बिमारी आई है इसलिए सब बंद है, पर हमको कई बिमारियाँ है उसका क्या? खाने को वैसे रोज मिल रहां है, पर धंदा बंद हो गया है उसका क्या? हम रोज दोसो रुपए कमाते थे, अब वो भी नहीं मिलते."

हे डोकं चक्रावून टाकणारे प्रश्न विचारलेत तरुण रवी सांगा पवार याने. रवी बेघर असून त्याचं 10-15 जणांचं कुटुंबही दक्षिण मुंबईत पंचतारांकीत ताज हॉटेलच्या मागच्या रस्त्यावर राहतं. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे मुंबई सध्या जर्जर झाली आहे. मात्र, आधीच उघड्यावर राहणाऱ्या बेघर आणि भिकाऱ्यांचं जिणं या लॉकडाऊननंतर सगळ्यांच्याच डोळ्यात यावं इतक उघडं झालंय.

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा सध्या वाढत असून काहींचे मृत्यू झाल्याने राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देश लॉकडाऊन होत असल्याच्या घोषणेनंतर गजबजलेली मुंबापुरी ओस पडली आहे. एरव्ही मुंबई शहरांत वावरताना दिसणाऱ्या समस्या, रोज नव्याने उभे राहणारे प्रश्न अक्षरश: गायब झालेत. सध्या प्रश्न एकच तो म्हणजे कोरोनाचा मुकाबला आणि या कोरोनाला घालवायचं असेल तर प्रत्येकाने घरात बसणं हाच उपाय.

कोरोना
लाईन

पण, हा उपाय समस्त मुंबईकरांनी अंमलात आणल्यानंतर शहर रिकामं झालं आणि सगळ्यांच्याच डोळ्यांपुढे दिसू लागले ते बेघर आणि भिकारी नागरिक. एरव्ही मुंबईच्या रहाटगाडग्यात आजूबाजूला उभी असणारी ही मंडळी आता या रिकाम्या शहरांत ठळकपणे दिसू लागलीत.

लॉकडाऊन किती दिवस चालणार?

लॉकडाऊन झालं आता या सगळ्यांचं कसं होणार? या चिंतेने अनेक सजग नागरिकांना ग्रासलं. ते पुढे सरसावले. सामाजिक संस्थांही पुढे आल्या आणि या लोकांना जेवण, उपयोगी वस्तू देत्या झाल्या. कोणी खिचडी दिली तर कोणी पोळी-भाजी दिली. आपण केलेल्या मदतीचे फोटोही अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले.

रवी सांगा पवार आणि त्याचं बेघर कुटुंब

फोटो स्रोत, RAVI SANGA PAWAR

फोटो कॅप्शन, रवी बेघर असून त्याचं 10-15 जणांचं कुटुंबही दक्षिण मुंबईत पंचतारांकीत ताज हॉटेलच्या मागच्या रस्त्यावर राहतं.

त्यामुळे राज्य शासनालाही जाग आली आणि त्यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिकेला या सगळ्यांची सोय करण्याचे आदेश दिले. आता या गरिबांपर्यंत प्रशासन, सामाजिक संस्थांकडून अन्न पोहोचतंय. पण, आपल्या भविष्यातल्या चरितार्थाचा प्रश्न या बेघर मंडळींना सध्या शांत बसू देत नाहीये. हे लॉकडाऊन किती दिवस चालणार? हा प्रश्न त्यांना सतावतोय.

'या बिमारीने धंदा बंद झाला'

रवी पवारही मला तेच सांगत होता. दक्षिण मुंबईतल्या पंचतारांकित ताज हॉटेलच्या सावलीत मागच्या रस्त्याला तो आपल्या मोठ्या कुटुंबासह गेली अनेक वर्षं राहतोय. ताज हॉटेलच्या गर्भश्रीमंत लखलखाटामागे अंधार आहे आणि त्या अंधारात हे पारधी समाजाचं पवार कुटुंब राहतं. रवीकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर व्हॉट्सअपही आहे. पण, घर नाही आणि आता धंदाही बंद आहे. तो म्हणतो की, शेखर भय्याने राशन दिलंय आणि वार्डाची गाडी येते आणि दोन वेळचं जेवण देते. पण, या बिमारीने धंदा बंद झाला. आम्ही गेट वे ऑफ इंडियाच्या इथे फुगे, खेळणी, गजरे सगळे मिळून विकायचो. त्यातून पैसे मिळायचे आणि जेवायचा प्रश्न सुटायचा. पण, आता पैसे मिळत नाहीत. जेवणासाठी गाडीची वाट बघत बसावं लागतं.

लाईन

लाईन

रवीच्या मोठ्या वहिनी विमल पवार यांच्याशीही मी संवाद साधला. विमल सांगतात, "मी गेली 26 वर्षं या कार्लटन हॉटेलच्या फुटपाथवर राहतेय. ताज हॉटेलच्यामागेच आम्ही राहतो. सध्या खाण्याचे वांदे नाहीत. पण, आमची सगळ्यांची कामं थांबली आहेत. त्यामुळे पैसे भेटत नाहीत. पहिले आम्ही जेवण बनवून खायचो. आता जेवणाची वाट बघावी लागते ते नकोसं होतं."

रवी सांगा पवार आणि त्याचं बेघर कुटुंब

फोटो स्रोत, Tarique mohammad qureshi

रवी पवार आणि विमल पवार यांच्या बोलण्यातून त्यांची कमाईची बंद झालेली साधन थांबलेलं दक्षिण मुंबईतलं पर्यटन याबद्दलची चिंता दिसून येत होती. रोज जेवण मिळत होतं. पण, पैसे नसल्याचं दुःख त्या दोघांना झालं होतं. तसंच, कोरोनाबद्दल त्यांना माहिती मिळाली आहे. मात्र, सोशल डिस्टसिंगसारखे नियम पाळणं त्यांना शक्य नसल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं.

बेघरांसाठी 'कोशिश'

पवार कुटुंबापर्यंत लॉकडाऊन झाल्या-झाल्या 'कोशिश'मार्फत डाळ, तांदूळ, शेंगदाणे, तेल, मसाले व कडधान्य, भाज्या यांची पॅकेट्स पोहोचवण्यात आली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेसच्या अंतर्गत भिकारी आणि बेघरांसाठी कोशिश हा सामाजिक उपक्रम राबवला जातोय. या कोशिशचे दक्षिण मुंबईचे समन्वयक शेखर यांनी या सगळ्यांची या काळात जबाबदारी घेतलीये.

ते सांगतात, "या लोकांना आम्ही तयार अन्न देण्यापेक्षा 10 दिवसांचे अन्नपदार्थ देतो. त्यामुळे या लोकांचं काम होतं. तयार अन्न द्यायचं म्हटलं की त्यासाठी या लोकांना वाट पाहावी लागते आणि लॉकडाऊनमुळे आम्हालाही सारखं त्यांना भेटता येणं शक्य होत नाही. त्यामुळे शासनानेही त्यांना अन्न द्यावं. आम्ही त्यांना मास्क, साबण या स्वच्छतेसाठीच्या वस्तूही दिल्या आहेत."

बेघर नागरिक

फोटो स्रोत, Manish jha

फोटो कॅप्शन, पवार कुटुंबापर्यंत लॉकडाऊन झाल्या-झाल्या 'कोशिश'मार्फत डाळ, तांदूळ, शेंगदाणे, तेल, मसाले व कडधान्य, भाज्या यांची पॅकेट्स पोहोचवण्यात आली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेसच्या अंतर्गत भिकारी आणि बेघरांसाठी कोशिश हा सामाजिक उपक्रम राबवला जातोय.

मुंबईतल्या भिकारी आणि बेघरांचा आकडा नेमका किती आहे यावर अनेकदा चर्चा होत असते. पण, नेमकी वस्तुस्थिती आजही पुढे येऊ शकलेली नाही. 2011 च्या जनगणनेनुसार, हा आकडा 57 हजार 416 होता. मात्र, या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थाच्या मते हा आकडा दीड लाखांच्या सहज वर आहे.

बेघरांच्या प्रश्नाबद्दल सातत्याने काम करणाऱ्या कोशिश प्रकल्पाचे संचालक तारिक मोहम्मद कुरेशी सांगतात, "भिकारी आणि बेघर लोकांसाठी सध्या कसोटीचा काळ आहे. मुंबईतली यांची संख्या नक्कीच दीड लाखांच्यावर आहे. त्यांच्या आयुष्यात यापूर्वीही आव्हानं होती आणि आताही आहेत. पण, सध्या त्यांच्या रोजच्या खाण्या-पिण्याचे हाल झालेत. यात कुटुंबच्या कुटुंब असून त्यात लहान मुलंही आहेत. अनेक जण सध्या शिजवलेलं अन्न घेऊन या लोकांना देताना आपण सोशल मीडियावर पाहतोय. पण, यामुळे कोरोनाच्या नियमावलीतल्या सोशल डिस्टंसिंगच्या तत्त्वाला हरताळ फासला जातोय. आज मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. अशावेळी सारखं लोकांनी एकमेकांना भेटणं योग्य नाही. त्यामुळे जमेल तेवढं लोकांना डाळ, तांदूळ किंवा सुखे आणि टिकाऊ अन्नपदार्थ देणं गरजेचं आहे."

'मनोविकलांग, अपंग भिकाऱ्यांची कसोटी'

लॉकडाऊनमुळे भिकाऱ्यांच्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल तारिक सांगतात, 'यापूर्वी आपण पाहायचो की मुंबईत मंदिर, मशीद, चर्चच्याबाहेर भिकाऱ्यांची मोठी संख्या दिसायची. यातले बहुतेक जण मनोविकलांग, अपंग, अंध असायचे. आज, त्यांचे अधिक हाल होत आहेत. कारण, त्यांना एकाच जागी पैसे मिळायची सवय लागली होती. आता, अचनाक सगळं बंद झाल्याने त्यांच्यापुढे अन्नाचा प्रश्न उभा राहिलाय. यातल्या विशेषत: मानिसकदृष्ट्या अपंग असलेल्यांपुढे हे लॉकडाऊनचे दिवस कठीण जाणार आहेत. कारण, त्यांना यापूर्वी जागेवरच अन्न आणि पैसे लोकांकडून मिळायचे. आता त्यांच्यापर्यंत पोहचणाऱ्या या गोष्टी पूर्णतः बंद झाल्या आहेत.'

बेघर भिकारी

फोटो स्रोत, Manish jha

फोटो कॅप्शन, मुंबईत मंदिर, मशीद, चर्चच्याबाहेर भिकाऱ्यांची मोठी संख्या आहे. यातले बहुतेक जण मनोविकालांग, अपंग, अंध असायचे. आज, त्यांचे अधिक हाल होत आहेत.

ते पुढे सांगतात, "सध्या मुंबई महानगरपालिकेने शाळांमध्ये निवारा केंद्र सुरू केली आहेत आणि जागोजागी दिसणाऱ्या अशा लोकांना जेवण देण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे. त्यामुळे सध्या या लोकांना थोडाफार दिलासा मिळतो आहे."

तारिक यांच्या 'कोशिश'मधल्या सहकारी आणि चेंबूर अमर महल परिसरातल्या बेघरांसाठी काम करणाऱ्या पल्लवी ठाकरे सांगतात की, आम्ही बेघर नागरिकांना पालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रांमध्ये जाण्याची विनंती करतोय. जेणेकरुन या दिवसांत त्यांना तिथे थोडाफार आसरा मिळेल. आम्ही पण त्यांना भेटायला जाताना मास्क लावून आणि सोबत सॅनिटायझर्स घेऊन जातोय.

महापालिका शाळांमध्ये निवारा

सामाजिक संस्थांच्या बरोबरीनेच शासन व्यवस्था आणि लोकही बेघरांना, भिकाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना गरीब गरजूंची सोय करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अन्न पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. याचबरोबरीने मुंबई महानगरपालिकेने बेघर आणि भिकाऱ्यांचा शोध सुरू केला असून त्यांना महापालिकेच्या सध्या रिकाम्या असलेल्या शाळांमध्ये नेलं जातंय. इथेच त्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय केली जात आहे.

बेघर नागरिक

फोटो स्रोत, Tarique mohammad qureshi

फोटो कॅप्शन, मुंबईत धारावी झोपडपट्टी, लालबाग यांसारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात कोरोनाने बाधित रुग्ण आढळल्याने बेघरांचा विषय सर्वाधिक चिंतेचा झालाय.

बेघरांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी महापालिकेने ही काळजी घेतली आहे. मात्र, सध्या धारावी झोपडपट्टी, लालबाग यांसारख्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बेघरांचा विषय सर्वाधिक चिंतेचा झालाय. 'कोशिश'मधून मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही काही बेघर नागरिक मुंबईतले मोठे ब्रिज, झोपडपट्ट्यांनजिक राहत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असून आम्हीही अशा बेघर लोकांना निवारा केंद्रात जाण्याची विनंती करत असल्याची माहिती 'कोशिश'च्या पल्लवी ठाकरे यांनी दिली.

सोशल मीडियातून मदत

तर, सोशल मीडियावर चर्चा करुन काहींना स्वतः पैसे काढत या लोकांच्या जेवणाची सोय केली आहे. नवभारत टाइम्सचे पत्रकार मनीष झा यांनी आणि त्यांच्या मित्रांनी बोरिवली परिसरातल्या 300 बेघरांना अन्न पोहचवलं. यासाठी झा यांनी आणि त्यांच्या मित्रांनी सोशल मीडियावरच्या अन्य मित्र-मैत्रिणींना आवाहन करत त्यांच्याकडून पैसे आणि अन्न पदार्थ मिळवले. त्यानंतर, मालवणी इथे महापालिका शाळेत ठेवलेल्या बेघरांना एक वेळचं जेवण दिलं. तसंच, रस्त्यात दिसणाऱ्या बेघरांनाही जेवणाचे डबे दिल्याची माहिती झा यांनी दिली. त्यांच्यासारखे अनेक गट आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे सरसावले असून ते जमेल त्या पद्धतीने मदत करत आहेत.

बेघर मुलगी

फोटो स्रोत, Manish jha

फोटो कॅप्शन, सोशल मीडियावर चर्चा करुन काहींना स्वतः पैसे काढत या लोकांच्या जेवणाची सोय केली आहे.

असे अनेक सामाजिक, शासकीय उपक्रम सध्या सुरू असले तरी, बेघर आणि भिकाऱ्यांचा मोठा टक्का या लॉकडाऊनच्या काळात उपाशी आहे. कारण, अंध-अपंगापर्यंत मदत पोहचणं अवघड आहेच आणि त्यांनी स्वतःहून मदत मिळण्यासाठी कुठे पोहोचणं हे देखील अवघड आहे. या अज्ञातांचा आकडा किती आहे हे सांगणं अवघड आहे. कोरोनाच्या उद्रेकात सगळं शांत असताना ही संख्या कळून आली नाही तर पुन्हा सुरू होणाऱ्या कोलाहलातही ती कधीच कळणार नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)