कोरोना व्हायरस चिनी वस्तूंना हात लावल्याने पसरतो का?

कोरोना वायरस

फोटो स्रोत, Getty Images

चीनसोबतच जगातल्या अनेक देशांत पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सतत वाढत आहे. आतापर्यंत 14,000 पेक्षा जास्त लोकांना या विषाणूची बाधा झालेली आहे. झपाट्याने पसरणारा हा विषाणू एक जागतिक आपत्ती असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जाहीर केलंय.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

News image

सुरुवातीला या विषाणूमुळे चीनमध्ये बळी गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यानंतर रविवारी फिलीपीन्समध्येही यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

या सर्वादरम्यान जगभरातल्या लोकांच्या मनात या व्हायरसविषयी अनेक शंका आहेत.

यापैकी काही प्रश्नांचं उत्तर देण्याचा बीबीसीने प्रयत्न केला.

कोरोना वायरस

फोटो स्रोत, Getty Images

चिनी वस्तूंना स्पर्श केल्याने कोरोना व्हायरस पसरतो का?

चीनमधील वुहान किंवा या विषाणूचा प्रसार झालेल्या दुसऱ्या प्रांतामधून निर्यात करण्यात आलेल्या वस्तूंना स्पर्श केल्याने हा व्हायरस पसरू शकतो का?

वुहान किंवा संसर्ग झालेल्या इतर प्रांतांतून आलेल्या मालाला स्पर्श केल्याने व्हायरस पसू शकतो हे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे अजून आढळलेले नाहीत.

पण 2003मध्ये चीनमध्ये सार्स नावाचा व्हायरस आला होता. त्यावेळी जगभरात 700 जणांचा बळी गेला होता.

त्यावेळी सार्स बाबत असं आढळलं होतं की सार्सचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्या वा खोकण्यामुळे व्हायरस पोहोचलेल्या वस्तू वा जागेला तुम्ही स्पर्श केल्यास तुम्हाला त्या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

पण कोरोना व्हायरसबाबत असं अद्याप आढळलेलं नाही. पण असं करण्याची या व्हायरसची क्षमता असली तरी आंतरराष्ट्रीय शिपींगनंतरही असं घडू शकतं का, हा प्रश्न आहे.

सर्दीचे विषाणू मानवी शरीराच्या बाहेर 24 तास जिवंत राहू शकतात. पण कोरोना व्हायरस अनेक महिन्यांपर्यंत मानवी शरीराबाहेरही जिवंत राहू शकतो.

आतापर्यंत घडलेल्या प्रकरणांमध्ये असं आढळलंय की एखाद्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्यासाठी त्याने संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येणं गरजेचं आहे.

कोरोना वायरस

फोटो स्रोत, Getty Images

चीनमध्येच इतके विषाणू का निर्माण होतात?

चीनमधल्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा प्राण्यांच्या जवळून संपर्कात येतो. हा कोरोना व्हायरसही कोणत्यातरी प्राण्यामार्फतच माणसांत आलेला आहे. हा व्हायरस सापांद्वारे माणसात आल्याचं एक मत आहे. यापूर्वी चीनमध्ये उद्भवलेला सार्स व्हायरस हा वटवाघूळ आणि सिवेट मांजरीद्वारे आला होता.

या कोरोना व्हायरसची सुरुवातीची प्रकरणं चीनच्या दक्षिणेकडील माशांच्या घाऊक बाजाराशी संबंधित आहेत. या बाजारात कोंबड्या, वटवाघुळं आणि सापही विकले जातात.

कोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर तब्येत पूर्वीसारखी होऊ शकते का?

हे शक्य आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या अनेक लोकांमध्ये साधी लक्षणं आढळतात. यात ताप, खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं येतात. बहुतेक लोक या संसर्गातून बाहेर पडल्यानंतर पूर्णपणे बरे होतात.

पण आधीपासून मधुमेह किंवा कॅन्सरशी मुकाबला करणाऱ्या लोकांसाठी हा विषाणू धोकादायक आहे.

यासोबतच कमी रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांसाठीही हा विषाणू धोकादायक आहे.

कोरोना वायरस

फोटो स्रोत, Getty Images

इनक्युबेशन पिरीएड म्हणजे काय? या विषाणूचा इनक्युबेशन कालावधी किती आहे?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, ज्या काळात एखाद्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग होतो त्याला इनक्युबेशन पिरीएड म्हणतात. पण या काळात त्याच्या तब्येतीवर काहीही परिणाम दिसून येत नाही.

सध्यातरी या कोरोना व्हायरसचा इनक्युबेशन पिरीएड 2 ते 10 दिवसांदरम्यान असल्याचं सांगितलं जातंय. पण याविषयीची अधिक माहिती अजून मिळायची आहे.

एखाद्या विषाणूचा संक्रमण कालावधी समजणं अतिशय गरजेचं असतं. या माहितीच्या मदतीने डॉक्टर्स आणि सरकारं या व्हायरसचा प्रसार रोखू शकतात.

म्हणजेच त्यांना जर याविषयीची माहिती असेल तर मग संसर्ग झालेल्या लोकांना इतर लोकांपासून वेगळं करता येऊ शकतं. यामुळे विषाणू संसर्गाची शक्यता कमी होते.

या विषाणूवर लस उपलब्ध आहे का?

सध्यातरी या व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नाही. पण यावरचं व्हॅक्सिन तयार करण्यासाठी संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.

पण हा असा एक विषाणू आहे जो माणसांमध्ये पूर्वी कधी आढळलेला नाही.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)