Corona Virus : कोरोना व्हायरसला रोखण्याचं चीनपुढे आव्हान, बळींची संख्या 100 वर

चीन कोरोना व्हायरस

फोटो स्रोत, Getty Images

कोरोना व्हायरसच्या चीनमधल्या बळींची संख्या आता 100 वर गेलेली आहे. खूबे प्रांतातील प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत (28 जानेवारी) कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले 1300 नवीन रुग्ण समोर आलेले आहेत.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील प्रतिबंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. चीननं आपल्या नागरिकांना परदेश यात्रा न करण्याची सूचना केली आहे.

अमेरिकेनंही आपल्या नागरिकांना चीनमध्ये न जाण्याची सूचना केली आहे.

ज्या हुबेई प्रांतातल्या वुहान शहरामधून या व्हायरसला सुरुवात झाली, तिथे अजूनही सर्व व्यवहार ठप्प असून अनेक शहरांनी दळणवळण बंद ठेवलेलं आहे.

हुबेई प्रांतातल्या बळींची संख्या 56 वरून वाढून 76 झाल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितलं. इतर ठिकाणी 4 मृत्यू झालेले आहे.

चीनमध्ये 2,744 जणांचा याची बाधा झाल्याचं नक्की झालंय. तर 300 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं चिनी सरकारी मीडियाने म्हटलंय.

जगभरात इतरत्र कोरोना व्हायरसच्या केसेस आढळल्या असून यामध्ये थायलंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. पण चीन बाहेर आतापर्यंत या विषाणू बाधेमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

कोरोना व्हायरसमुळे श्वसन यंत्रणेला गंभीर संसर्ग होतो. आणि यावर कोणतंही औषध वा लस उपलब्ध नाही.

News image

मृत्यू झालेल्यांमध्ये ज्येष्ठांचं आणि ज्यांना श्वसन यंत्रणेचे विकार आधीपासूनच होते, अशांचं प्रमाण जास्त आहे.

वुहानमध्ये काय घडतंय?

1.1 कोटी लोकसंख्येच्या या शहराचं दळणवळण पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. प्रवासावर निर्बंध घालण्यात आले असून अत्यावश्यक वाहनांखेरीज इतर कोणत्याही वाहनांना रस्त्यावर उतरण्याची परवानगी नाही.

हुबेई प्रांताच्या सीमेवर लोकांची तपासणी करण्यात येत असून या प्रांतात येण्याची परवानगी देण्याआधी त्यांच्या शरीराचं तापमान तपासलं जात आहे.

आणीबाणीच्या या परिस्थितीमुळे वुहानमधली रुग्णालयं भरलेली आहे. संपूर्ण हुबेई प्रांतामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त वैदयकीय कर्मचारी हा विषाणू रोखण्यासाठी, आटोक्यात आणण्यासाठी आणि उपचारांसाठी प्रयत्न करत आहेत.

हुबेई प्रांताची राजधानी असणाऱ्या वुहानमध्ये दोन नवीन तात्पुरती हॉस्पिटल्स उभारण्यात येत असून कंपन्या मास्क आणि संरक्षण देणाऱ्या कपड्यांची निर्मिती करत आहेत.

चीन

फोटो स्रोत, Gov.cn

कोरोना बाधित लोकांचं प्रमाण वाढत राहण्याची भीती असून शहरातून प्रवास करण्याची बंदी घालण्याआधीच नवीन वर्ष साजरं करण्यासाठी इथे आलेले साधारण 50 लाख प्रवासी इथून बाहेर पडले असल्याचं शहराचे महापौर झू शिनवँग यांनी सांगितलं.

चीनमधली परिस्थिती

कोरोना व्हायरस परसल्यामुळे चिनी नव-वर्षासाठीचे कार्यक्रम आटोपते घ्यावे लागले. बीजिंग, शांघाय, शियान आणि तियानजिन या चार मोठ्या शहरांमधून दूरवर जाणारी बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

फॉरबिडन सिटी आणि ग्रेट वॉलचा काही भाग हा पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय.

गुआंगडाँग प्रांतामधल्या अनेक शहरांमध्ये सार्वजनिकरित्या वावरताना मास्क घालणं सक्तीचं करण्यात आलं असून हाँगकाँग आणि शांघाय या दोन्ही शहरांमधली डिस्ने पार्क बंद करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचे जंतू एखाद्या व्यक्तीच्या शरीरात शिरल्यापासून त्याची लक्षणं दिसू लागण्यादरम्यानच्या काळातही याचा संसर्ग इतरांना होऊ शकत असल्याचं चिनी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. यामुळेच हा रोग पसरणं आटोक्यात आणणं कठीण जातंय.

जपान

फोटो स्रोत, Getty Images

जंतू संसर्ग झाल्यापासून त्याची लक्षणं दिसेपर्यंत जास्तीत जास्त 14 दिवसांचा कालावधी लागू शकतो. आणि या दरम्यान एखाद्या व्यक्तीला हा संसर्ग झाल्याचं समजू शकत नाही.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि जगभरातील देशांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चीन बाहेरही कोरोना व्हायरसची प्रकरणं आढळलेली आहे.

  • 8- थायलंड
  • 5- अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, तैवान (प्रत्येकी)
  • 4 - मलेशिया, जपान, दक्षिण कोरिया (प्रत्येकी)
  • 3 - फ्रान्स
  • 2 - व्हिएतनाम
  • 1 - नेपाळ, कॅनडा, कंबोडिया, श्रीलंका, जर्मनी, कॅनडा

यापैकी बहुतेकांनी गेल्या काही काळामध्ये वुहानला भेट दिलेली होती. कोरोना हा विषाणू नवीन असून सहसा याचा प्रादूर्भाव प्राण्यांना होतो.

याच विषाणूच्या एका प्रकारामुळे सर्दी होते. तर दुसरा प्रकार असणाऱ्या सार्सचा (SARS) 2003 मध्ये मोठा उद्रेक झाला होता आणि यामुळे शेकडो जणांचा बळी गेला होता.

लक्षणं न दाखवता पसरणारा रोग

बीबीसीचे आरोग्यविषयक प्रतिनिधी जेम्स गॅलाघर याविषयी अधिक माहिती देतात.

चीन

फोटो स्रोत, Kevin frayer

एखादा विषाणू संसर्ग झाल्यापासून त्याची लक्षण दिसण्याच्या काळातही (Incubation) पसरू शकतो, ही बातमीच एक मोठी घडामोड आहे. यामुळे या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी चीनला प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहे.

सार्स (Sars) आणि इबोला (Ebola) या विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं लोकांमध्ये दिसू लागल्यानंतरच त्याचा इतरांना प्रादूर्भाव होण्याची भीती असते. अशा प्रकारच्या विषाणूंचा फैलाव रोखणं तुलनेनं सोपं असतं. आजारी असणारी, ही लक्षणं दिसणारी लोकं शोधून त्यांनी इतरांच्या संपर्कात येऊ नये म्हणून त्यांना वेगळं ठेवता येतं.

आपल्याला एखादा जंतू संसर्ग झालेला आहे हे समजण्याआधीच त्याचा इतरांना प्रादुर्भाव होण्याचं सर्वसाधारण उदाहरण म्हणजे - फ्लू.

पण स्वाईन फ्लू प्रमाणे ही जागतिक संसर्गजन्य आपत्ती आहे, हे इतक्यातच म्हणता येणार नाही.

पण लक्षणं दिसत नसताना प्रादूर्भाव रोखणं चीनी यंत्रणेला कठीण जाणार आहे.

लक्षणं दिसण्यापूर्वीच्या या काळात किती संसर्ग होऊ शकतो किंवा चीन बाहेर आढळलेल्या रुग्णांमार्फत त्यांच्यात या आजाराची लक्षणं दिसण्यापूर्वी किती जणांना हा रोग झालेला आहे? हे शोधणं आता महत्त्वाचं आहे.

बीबीसी

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)