कोरोना व्हायरस : शाहीन बाग आंदोलन दिल्ली पोलिसांनी उठवलं

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी शाहीन बागमध्ये सुरू असलेलं आंदोलन उठवलं आहे.

पोलिसांनी संपूर्ण परिसर खाली केला आहे. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही कारावाई केल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या दक्षिण-पूर्व जिल्ह्याच्या डीसीपींनी एएनआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे.

ते म्हणाले, "लॉक डाऊन पाहाता शाहीन बागेतील निदर्शकांना तिथून जाण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी जागा मोकळी करायला नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी लागली. आंदोलन स्थळ पूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. मात्र, या कारवाईत आम्हाला काही निदर्शकांना ताब्यातही घ्यावं लागलं."

नेमक्या किती लोकांना ताब्यात घेण्यात आलं, याविषयीची माहिती मिळू शकलेली नाही.

शाहीन बाग परिसरातच राहणाऱ्या एका व्यक्तीने नाव उघड न करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की संपूर्ण शाहीन बागेत सुरक्षा दल तैनात आहे. तसंच आंदोलन स्थळावरही मोठ्या संख्येने सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे.

पोलिसांनी आंदोलन स्थळी उभारण्यात आलेले तंबू, पोस्टर, बॅनर काढल्याचंही या व्यक्तीने सांगितलं. यापूर्वी सोमवारी रात्रीदेखील पोलीस तिथे आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

शाहीन बागेत गेल्या वर्षी 15 डिसेंबरपासूनच सुधारित नागरिकत्त्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर रविवारी 22 मार्च रोजी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला.

रविवारी शाहीन बागेत पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले होते. मात्र, यात कुणीही जखमी झालं नाही. त्या दिवशी जनता कर्फ्यू असल्याने आंदोलक सांकेतिक आंदोलन म्हणून आपल्या चपला आंदोलनस्थळी ठेवून घरी निघून गेले होते. काही वयोवृद्ध महिलाच आंदोलनस्थळी होत्या.

त्याआधीच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

मात्र, कोरोना विषाणूचा धोका बघता कमीत कमी संख्येने महिला आंदोलनस्थळी उपस्थित असतील याची काळजी घेऊ, असं या महिलांनी सांगितलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)