नरेंद्र मोदी: शाहीन बाग, जामिया आंदोलनातून देशातील एकोपा उद्ध्वस्त करण्याचा कट #5मोठ्याबातम्या

वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1) नरेंद्र मोदी: शाहीन बाग, जामिया आंदोलन कट आहेत

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAA) विरोधात शाहीन बाग, जामिया मिलिया किंवा इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमधून देशातील एकोपा उद्ध्वस्त करण्याचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. आऊटलूक इंडियानं ही बातमी दिलीय.

दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली.

अराजकवाद रोखण्यासाठी दिल्लीत भाजपला पाठिंबा द्या, असं आवाहनही यावेळी नरेंद्र मोदींनी केलं.

मोदी म्हणाले, "जामिया असो किंवा शाहीन बाग, गेल्या काही दिवसांपासून इथं CAA विरोधात आंदोलनं झाली. मात्र ही आंदोलनं योगायोग आहेत का? नाही. भारतातला एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करणारा हा एक राजकीय प्रयोग आहे."

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही दिल्ली निवडणुकांच्या प्रचारात अरविंद केजरीवालांवर निशाणा साधलाय. अराजकवादी आणि दहशतवादी यात फरक नाही, असं जावडेकर म्हणाले. तसंच, केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असंही ते म्हणाले. एशियन एजनं ही बातमी दिलीय.

काही दिवसांपूर्वीच दिल्ली भाजपचे नेते पर्वेश वर्मा यांनी केजरीवालांना 'दहशतवादी' संबोधल्यानं निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

2) केरळ सरकारकडून कोरोना व्हायरस 'राज्यावरील संकट' जाहीर

केरळ सरकारनं कोरोना व्हायरसला 'राज्यावरील संकट' म्हणून घोषित केलंय. इकोनॉमिक टाइम्सनं ही बातमी दिलीय.

केरळमधील कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, संख्या तीनवर पोहोचलीय.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्य सरकार आवश्यकत ती सर्व पावलं उचलेल, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री केके शैलजा म्हणाल्या. केरळमधील सर्व राज्य कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

चीनमधील वुहान शहरात सर्वप्रथम कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळला आणि तिथं या व्हायरसमुळं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 400च्या वर गेलीय. चीननंतर जगातील 25 इतर देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला.

3) शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्यांवर मुंबईत देशद्रोहाचा गुन्हा दाखल

JNUचा विद्यार्थी नेता शर्जील इमामच्या समर्थनार्थ 'मुंबई प्राईड सॉलिडॅरिटी गॅदरिंग 2020'मध्ये घोषणा देणाऱ्या 50 हून अधिक जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्या आलाय. आझाद मैदाना पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय.

इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.

शर्जील इमामच्या समर्थनासाठीच 'मुंबई प्राईड सॉलिडॅरिटी गॅदरिंग 2020'चं आयोजन करण्यात आलं होतं. उर्वशी चुडावाला या करत होत्या. त्या TISS मधून माध्यम आणि संस्कृती या विषयात MA कर आहेत.

शर्जील इमामवर अलिगढ मुस्लीम विद्यापीठात CAA विरोधी आंदोलनादरम्यान देशविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप आहे. आसामा, युपीमध्ये त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करून तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय.

4) अनंतकुमार हेगडेंना भाजपची नोटीस

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांना पक्षानं कारणे दाखवा नोटीस बजावलीय. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली.

अनंतकुमार हेगडे हे माजी केंद्रीय मंत्री असून, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत.

बंगळुरूत बोलताना अनंतकुमार हेगडे म्हणाले होते, "संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिशांच्या मदतीने चालवण्यात आली होती. या चळवळीतील नेते म्हणवणाऱ्यांना एकदाही पोलिसांची लाठी खावी लागली नाही. त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य चळवळ हे एक मोठं नाटकं होतं. ब्रिटिशांची परवानगी घेऊन उभारलेलं हे एक ढोंग होतं. ही तडजोडीची स्वातंत्र्य चळवळ होती."

"महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह हे सुद्धा ढोंग होती, देशात लोक काँग्रेसला पाठिंबा देताना सांगतात की, त्यांच्या आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, हे खरं नाही. ब्रिटिशांनी सत्याग्रहामुळे देश सोडलेला नाही," असंही अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं.

5) नवी मुंबईत भाजपला विरुद्ध महाविकास आघाडी?

महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर आता महापालिका निवडणुकीतही असा प्रयोग दिसण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलंय. वाशीत हा मेळावा पार पडणार आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

नवी मुंबई महापालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईक यांचं वर्चस्व आहे. मात्र राज्यात सत्ता गेल्यानंतर भाजपच्या हातून अनेक जिल्हा परिषदा आणि महापालिका गेल्या. त्यात महाविकास आघाडी राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेसाठीही एकत्र येताना दिसतेय.

महाविकास आघाडीच्या वाशीत होणाऱ्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे असा प्रमुख नेते उपस्थि राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)