You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Corona Virus: चीनने 10 दिवसांत तयार केलं 1000 खाटांचं हॉस्पिटल
चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. या विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या वुहान शहरात अवघ्या 10 दिवसात हजार खाटांचं रुग्णालय बांधण्यात आलं. रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे.
हुशेशन हॉस्पिटल नावाच्या या रुग्णालयात कोरोना विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार असून कोरोना विषाणूशी लढण्यासाठी वाहिलेलं हे दुसरं रुग्णालय आहे.
मात्र आपले प्रयत्न कमी पडत असल्याची कबुली चिनी सरकारने दिला आहे.
सध्या या विषाणूमुळे 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 17,000 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनच्या बाहेर फिलिपिन्समध्येही एका जणाचा मृत्यू झाला आहे.
चीनच्या बाहेर या रोगामुळे मृत्यू झालेला हा पहिलाच व्यक्ती आहे. हा रुग्ण 44 वर्षीय असून तो वुहानचा रहिवासी आहे. फिलिपिन्सला येण्याआधी त्याला कोरोना विषाणूची लागण झाली होती.
चीनशिवाय जगाच्या इतर भागात आतापर्यंत 150 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे.
चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ज्या लोकांना लागण झाली आहे त्याशिवाय 21,558 लोकांना या विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे, 152,700 लोकांवर लक्ष ठेवलं जात असून 475 जणांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे.
नव्या रुग्णालयात काय आहे?
चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णालयाचं काम पूर्ण झालं असून सोमवारी या रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे.
1,400 चीनच्या लष्करी वैद्यकीय सेवेचे अधिकारी, काही रुग्ण सध्या या रुग्णालयात दिसत आहेत. लिश्नेशन भागातील दुसरं रुग्णालय बुधवारी बांधून पूर्ण होईल.
नॅशनल हेल्थ कमिशनचे प्रवक्ते जिओ याहुई यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की आता शहरात एकूण 10000 खाटांचं रुग्णालय उपलब्ध असेल. त्यामुळे सध्याच्या संकटाशी सामना करण्यासाठी ही रुग्णालयं पुरेशी आहेत.
आकडेवारी वाढू शकते का?
हाँगकाँग विद्यापीठाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अधिकृत आकडेवारीपेक्षा रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते वुहान शहरातच 75000 लोकांना या विषाणूची लागण झाल्याची शक्यता आहे.
वुहान शहरात सध्या सर्व व्यवहार बंद असून काही अपवाद वगळता इतर शहरातीलसुद्धा व्यवहार बंद आहेत.
कोरोना विषाणूमुळे अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या नागरिकांवर बंदी घातली आहे.
कोरोना संसर्गाची लक्षणं
कोरोना व्हारसच्या संसर्गाची लक्षणं अगदी सामान्य आहेत. श्वास घेण्यात अडथळा, खोकला किंवा वाहतं नाक, ही मुख्य लक्षणं आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या काही प्रजाती अतिशय धोकादायक आहे. सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) आणि MARS (Middle East Respiratory System) अशी या दोन प्रजातींची नावं आहेत.
सध्या ज्या व्हायरसची साथ पसरली आहे त्या व्हायरसला nCoV असं नाव दिलं आहे. कोरोना व्हायरसचा हा नवीन प्रकार आहे. आतापर्यंत तो मनुष्यप्राण्यात आढळला नव्हता.
कोरोना संसर्गाची जी प्रकरणं सध्या समोर आली आहेत त्यावरून असं लक्षात येतं की या आजाराची सुरुवात तापापासून होते.त्यानंतर त्याचं रुपांतर कोरड्या खोकल्यात होतं. आठवडाभरात अशीच स्थिती राहिली तर श्वासाचा त्रास सुरू होतो.
मात्र गंभीर प्रकरणात या संसर्गाचं रुपांतर न्युमोनिया किंवा सार्समध्ये होतं. किडनी निकामी होण्याची स्थिती निर्माण होते. इतकंच काय तर रुग्णाचा मृत्यूही ओढवू शकतो. कोरोनाचे बहुतांश रुग्ण वृद्ध आहेत. ज्यांना पार्किन्सन किंवा डायबिटीज आहे त्यांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे संचालक प्रा. पीटर पायोट सांगतात, "कोरोना व्हायरस सार्सपेक्षा कमी धोकादायक आहे ही त्यातल्या त्यात सुखद बाब आहे. गेल्या काही काळाच्या तुलनेत माहितीचं आदान प्रदान योग्य प्रकारे होत आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण अशा संकटांशी एकट्याने लढू शकत नाही."
या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काही विशेष उपाययोजना नाहीत. सध्या रोगांच्या लक्षणांनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत.
बचावासाठी काय खबरदारी घ्यावी?
कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अगदी साध्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ करणं, मास्क घालणे, आणि योग्य आहार या उपाययोजनांचा समावेश आहे.
ज्या लोकांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्या जवळपास जाण्यापासून लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांना विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्यांची भेट घेतल्यावर तातडीने हात धुणे, पाळीव किंवा रानटी प्राण्यापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. कच्चं किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस शिंक आली तर समोरच्या व्यक्तीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदा. नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल धरणं, निरोगी व्यक्तींपासून दूर राहणं, नियमित स्वच्छता अशा उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे.
जवळच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. कारण कुटुंबातल्या एका व्यक्तीला लागण झाली की दुसरी व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सुरुवात करतो. मात्र बाह्यजगाशी संपर्क आल्यावर किती प्रमाणात लागण होते याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.
जर एखाद्या व्यक्तीला लागण झाली तर...
मागे सार्सच्या प्रादुर्भावासारखाच हा प्रादुर्भाव आहे, असं चीन सरकारचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा, की ज्या व्यक्तीला लागण झाल्याचं समजेल त्याला वेगळं ठेवलं जाईल.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणि डॉक्टरांसाठीही जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. लागण झालेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करायला हवी, त्यानंतर या रुग्णाला लघु, मध्यम आणि गंभीर अशी वर्गवारी करायचे आदेश दिले आहेत,
आरोग्य कर्मचाऱ्यांना या रोगाची लागण होऊ नये यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात. मास्क घालावे, तसंच लागण झालेल्या रुग्णांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचाही सल्ला दिला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)