Shaheen Bagh Firing: जामियानंतर आता शाहीन बागमध्ये कुणी केला गोळीबार?

दिल्लीमधील शाहीन बाग परिसराजवळ एका व्यक्तीने गोळी झाडण्याची घटना घडली आहे. मात्र त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त आलेले नाही

ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दक्षिण-पूर्व दिल्लीचे DCP चिन्मय बिस्वाल यांनी गोळीबार झाल्याचे सांगून एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचं आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

सोशल मीडियावर याचा एक व्हीडिओ फिरत असून, पोलिसांच्या ताब्यात असणारी व्यक्ती "आमच्या देशात फक्त हिंदूचंच चालेल, बाकी कुणाचंही चालणार नाही," असं म्हणत आहे.

दुसऱ्या एका व्हीडिओत युवक 'जय श्रीराम'च्या घोषणा देत आहे आणि आपली ओळख सांगत आहे. व्हीडिओमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीचं नाव कपिल गुर्जर असून तो दिल्लीच्या दल्लूपुरा गावचा रहिवासी आहे.

तो व्हीडिओत म्हणतो, हे हिंदू राष्ट्र आहे, त्यामुळे इथं हे खपवून घेणार नाही.

शाहीनबाग ऑफिशिअल नावाच्या ट्विटर हँडलवर या घटनेची माहिती देण्यात आलेली आहे.

गोळीबारानंतर आता स्थिती पूर्ववत आहे, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. "48 तासांच्या आत दुसऱ्यांदा गोळीबार झाला, आधी जामियाजवळ आणि आता शाहिन बाग."

जामियातील गोळीबार

गुरुवारी जामिया परिसरात एका व्यक्तीने गोळीबार केला होता.

या विभागाचे DCP चिन्मय बिस्वाल यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितलं, एका व्यक्तीने पिस्तूल काढत गोळीबार केला आणि त्यात एक तरुण जखमी झाला आहे.

बिस्वाल म्हणाले, "ही व्यक्ती गर्दीमध्येच होती आणि त्याने विद्यार्थ्यांच्या दिशेन पिस्तूल रोखलं. एक विद्यार्थी जखमी झाला आहे. तो आता सुरक्षित आहे. हा जखमी विद्यार्थी जामिया विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. हा विद्यार्थी गोळ लागून जखमी झाला की नाही हे समजण्यासाठी वैद्यकीय अहवाल येण्याची वाट पाहावी लागेल."

"दिल्लीतल्या घटनेबद्दल मी दिल्ली पोलीस आयुक्तांशी बोललोय. अशी कोणतीही घटना मोदी सरकार खपवून घेणार नाही, दोषी व्यक्तीला सोडणार नाही", असं ट्वीट अमित शाह यांनी केलं होतं

त्याआधी काँग्रेसने या घटनेचा निषेध करून अमित शाह यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)