निर्भया केस : फाशी झालेले 4 जण कोण आहेत?

निर्भया बलात्कार प्रकरणातील 4 आरोपींना पहाटे 5.30 वाजता फासावर लटकावण्यात आलं.तिहार तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.

2012 साली डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यात आली.

अखेर सात वर्ष तीन महिने आणि 4 दिवसांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आहे.

यानंतर निर्भयाची आई आशादेवी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "आमची मुलगी आता आमच्यात नाही आणि ती कधीच परतणार नाही. आमच्या मुलींसाठी आम्ही ही लढाई सुरू केली होती, ती अशीच सुरू राहील. मी माझ्या मुलीच्या फोटोला मिठी मारली आणि तुला न्याय मिळाला, असं म्हटलं.

16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत एका तरुणीवर झालेल्या निर्घृण बलात्काराने सारा देश हादरला होता. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण म्हणून या प्रकरणाला ओळखलं जातं. त्यानंतर देशात जेव्हा जेव्हा बलात्कार झाला त्याची तुलना निर्भया प्रकरणाशी होऊ लागली.

दिल्लीतील या निर्भया सामूहिक बलात्काराच्या क्रूरतेविषयी ज्याने कुणी ऐकलं, वाचलं किंवा पाहिलं त्याला हे कृत्य माणसांनीच केलं यावर विश्वास बसला नव्हता. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली होती आणि त्या सर्वांना सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगार ठरवलं होतं.

यातील एकाने तुरुंगात शिक्षा भोगत असताना आत्महत्या केली होती. तर एक अल्पवयीन होता. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. उर्वरित चारही जणांची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली.

राम सिंह

राम सिंह या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. मार्च 2013 मध्ये तिहार जेलमध्ये राम सिंहचा मृतदेह आढळला होता.

राम सिंहने गळफास घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. मात्र, त्याची हत्या करण्यात आल्याचं बचाव पक्षाचे वकील आणि राम सिंहच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं.

बस ड्रायव्हर असलेल्या राम सिंहचं घर दक्षिण दिल्लीतील रविदास झोपडपट्टीत होतं. राम सिंह त्याच बसचा ड्रायव्हर होता ज्या बसमध्ये निर्भयावर अमानुष बलात्कार करण्यात आला आणि यात तिच्या गुप्तांगात झालेल्या गंभीर जखमांमुळे काही दिवसात तिचा मृत्यू झाला होता.

दारू पिणं आणि भांडणं, हे तर राम सिंहसाठी नित्याचंच होतं, असं त्याचे शेजारी सांगतात.

राम सिंहचं कुटुंब जवळपास 20 वर्षांपूर्वी राजस्थानहून दिल्लीला स्थायिक झालं होतं. राम सिंह पाच भावंडांपैकी तिसरा होता. त्याला शाळेत घातलं होतं. मात्र, त्याने प्राथमिक शाळेतच शिक्षण सोडलं.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वांत पहिली अटक राम सिंहलाच झाली होती.

मुकेश सिंह

मुकेश सिंह आणि राम सिंह सख्खे भाऊ होते. मुकेश रामपेक्षा लहान आहे. तो राम सिंहसोबतच असायचा. कधी बस ड्रायव्हर तर कधी क्लिनर म्हणून काम करायचा.

मुकेशने निर्भया आणि तिच्या मित्राला रॉडने मारहाण केल्याचं कोर्टात सिद्ध झालं. मात्र, मुकेशने कायमच याचा इन्कार केला आहे.

घटनेच्या वेळी आपण बस चालवत होतो आणि इतर चौघांनी निर्भयावर बलात्कार करून तिच्या मित्राला मारहाण केल्याचं मुकेशने सुनावणीवेळी सांगितलं होतं.

मात्र, न्यायालयाने मुकेश सिंहलाही दोषी ठरवत त्यालाही फाशी सुनावली.

विनय शर्मा

26 वर्षांचा विनय शर्मा एका जिममध्ये असिस्टंट म्हणून काम करायचा. राम सिंहप्रमाणेच विनय शर्माही दिल्लीतील रविदास झोपडपट्टीत राहायचा.

दोषींपैकी केवळ विनयनेच शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्याला थोडंफार इंग्रजीही यायचं.

2013 साली महाविद्यालयच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देण्यासाठी विनयने जामीन अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता.

घटनेच्यावेळी आपण बसमध्येच नव्हतो, असा दावा विनयने केला होता. पवन गुप्ता नावाच्या आरोपीबरोबर आपण एका संगीत समारंभात गेल्याचं त्याचं म्हणणं होतं.

अक्षय ठाकूर

34 वर्षांचा बस क्लिनर अक्षय ठाकूर बिहारचा आहे. घटनेच्या पाच दिवसांनंतर अक्षयला बिहारमधून अटक करण्यात आली होती.

अक्षयवर बलात्कार, हत्या आणि अपहरणासोबतच पुरावे नष्ट करण्याचाही आरोप होता.

अक्षय त्याच वर्षी बिहारहून दिल्लीला गेला होता.

विनयप्रमाणेच अक्षयनेही घटनेच्यावेळी आपण बसमध्ये नव्हतो, असा दावा केला होता.

पवन गुप्ता

फळ विक्रेता असणाऱ्या 25 वर्षांच्या पवन गुप्तानेही आपल्या इतर साथीदारांप्रमाणेच घटन घडली त्यावेळी आपण बसमध्ये नव्हतो आणि विनय शर्मासोबत संगीताच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, असा दावा केला होता.

न्यायालयात साक्षीदार म्हणून हजर झालेले पवन गुप्ता याचे वडील हिरालाल यांनीही आपला मुलगा निर्दोष आहे आणि त्याला गोवलं जात असल्याचं म्हटलं होतं.

त्यादिवशी आपला मुलगा दुपारीच दुकान बंद करून घरी गेला. दारू पिल्यानंतर संध्याकाळी जवळच्याच एका पार्कमध्ये सुरू असलेला संगीत कार्यक्रम बघण्यासाठी तिथे गेला, असं हिरालाल यांनी न्यायालयात सांगितलं होतं.

आपण स्वतः त्याला पार्कमधून घरी घेऊन आल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

अल्पवयीन गुन्हेगार

या घटनेतील सहावा दोषी घटनेच्यावेळी 17 वर्षांचा असल्याने त्याच्यावर अल्पवयीन म्हणून खटला चालवण्यात आला.

या अल्पवयीन आरोपीवर 31 ऑगस्ट 2013 रोजी आरोप सिद्ध झाले आणि त्याला तीन वर्षांसाठी सुधारगृहात पाठवण्यात आलं. भारतीय कायद्यानुसार एखाद्या अल्पवयीन गुन्हेगाराला दिली जाणारी ही सर्वाधिक शिक्षा आहे.

हा अल्पवयीन गुन्हेगार उत्तर प्रदेशातील एका गावाचा रहिवासी आहे. वयाच्या अकराव्या वर्षी तो दिल्लीत गेला होता. कायद्यानुसार अल्पवयीन गुन्हेगाराची ओळख उघड करता येत नाही.

त्याच्या आईने बीबीसीला सांगितलं की तो दिल्लीच्या बसमध्ये बसला त्यावेळी ती शेवटचं आपल्या मुलाशी बोलली होती. डिसेंबर 2012 मध्ये पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन कुटुंबियांना तुमच्या मुलाला बलात्काराच्या आरोपात अटक झाल्याची माहिती दिली. मात्र, तोवर आपला मुलगा आता या जगातच नाही, असंच आपल्याला वाटत होतं, असं त्याच्या आईने सांगितलं.

अल्पवयीन मुलाचं हे कुटुंब गावातील सर्वांत गरीब कुटुंबांपैकी एक आहे आणि त्याच्या वडिलांचं मानसिक संतुलनही ढासळलं आहे.

16 डिसेंबर 2012 च्या रात्री काय घडलं?

16 डिसेंबर 2012चं हे प्रकरण आहे. त्या रात्री 23 वर्षांची फिजियोथेरपी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आणि तिच्या मित्रावर चालत्या बसमध्ये हल्ला झाला. तरुणीवर सहा जणांनी अत्यंत क्रूरपणे बलात्कार केला आणि त्यानंतर दोघांनाही रस्त्यावर फेकून दिलं गेलं.

या प्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हरसह पाच जणांना अटक केली होती. यात अल्पवयीन तरूणाने सर्वाधिक क्रौर्य केल्याचे आरोप होते.

तरुणीला दिल्लीतील ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत गेली. तिला उपचारांसाठी सिंगापूरमधल्या हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं होतं.

मात्र, तिथेही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि 29 डिसेंबर रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.

फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी

निर्भया प्रकरणावरून संपूर्ण देशभरात जोरदार निदर्शनं झाली आणि बलात्कारविरोधी कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात आली.

23 डिसेंबर 2012 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात आलं.

3 जानेवारी 2013 रोजी पोलिसांनी 33 पानी आरोपपत्र दाखल केलं. 21 जानेवारी रोजी कॅमेऱ्याच्या देखरेखीत 6 आरोपींविरोधात कोर्टात सुनावणी सुरू झाली.

अल्पवयीन आरोपीची सुनावणी करणाऱ्या जुवेनाईल जस्टिस बोर्डाने 28 जानेवारी रोजी दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालात आरोपीला अल्पवयीन घोषित केलं. 2 फेब्रुवारी रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने उर्वरित चारही आरोपींवर आरोप निश्चित केले.

सुनावणी सुरू असतानाच 11 मार्च रोजी राम सिंह तिहार कारागृहात त्याच्या सेलमध्ये मृतावस्थेत आढळला.

31 ऑगस्ट 2013 रोजी जुवेनाईल जस्टीस बोर्डाने अल्पवयीन आरोपीला निर्भयावर बलात्कार आणि हत्येसाठी दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली.

3 सप्टेंबर 2013 रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाची सुनावणी पूर्ण झाली. यात 130 हून जास्त बैठका झाल्या आणि शंभराहून अधिक साक्षीदार तपासण्यात आले.

प्रत्यक्षदर्शी म्हणून निर्भयाच्या मित्राला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तो या प्रकरणातला सर्वांत महत्त्वाचा साक्षीदार होता.

आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत बलात्कार, हत्येचा प्रयत्न, अपहरण, अनैसर्गिक गुन्हा, चोरी, चोरीदरम्यान हिंसा, पुरावे नष्ट करणं आणि गुन्हेगारी कट रचण्यासारखी कलमं लावण्यात आली.

प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या तारखा आणि निर्णय

  • 16 डिसेंबर 2012 : 23 वर्षीय फिजियोथेरपीच्या विद्यार्थिनीवर धावत्या बसमध्ये 6 जणांनी अमानुष बलात्कार केला. तिच्या मित्रालाही बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर दोघांनाही रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं.
  • 17 डिसेंबर 2012 : मुख्य आरोपी आणि बस ड्रायव्हर राम सिंह याला अटक झाली. पुढच्या काही दिवसातच त्याचा भाऊ मुकेश सिंह, जिन इन्स्ट्रक्टर विनय शर्मा, फळ विक्रेता पवन गुप्ता, बसचा क्लिनर अक्षय कुमार सिंह आणि 17 वर्षांच्या एका अल्पवयीन आरोपीला अटक झाली.
  • 29 डिसेंबर 2012 : सिंगापूरमधील हॉस्पिटलमध्ये पीडितेचा मृत्यू, पार्थिव भारतात आणण्यात आलं.
  • 11 मार्च 2013 : आरोपी राम सिंह याचा तिहार कारागृहात संशयास्पद मृत्यू. आत्महत्या केल्याचा पोलिसांचा दावा तर हत्या असल्याचा कुटुंबियांचा आरोप.
  • 31 ऑगस्ट 2013 : जुवेनाईल जस्टिस बोर्डाने अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली.
  • 13 सप्टेंबर 2013 : फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.
  • 13 मार्च 2014 : दिल्ली उच्च न्यायालयाने फाशी कायम ठेवली.
  • मार्च-जून 2014 : दोषींनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली. कोर्टाने निकाल येईपर्यंत फाशीला स्थगिती दिली.
  • मे 2017 : सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टाची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
  • जुलै 2018 : सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही दोषींची फेरविचार याचिका फेटाळली.
  • 6 डिसेंबर 2019 : केंद्र सरकारने एका गुन्हेगाराची दयायाचिका राष्ट्रपतींकडे पाठवली आणि ती फेटाळण्याची विनंती केली.
  • 12 डिसेंबर 2019 : तिहार कारागृह प्रशासनाने उत्तर प्रदेश कारागृह प्रशासनाकडे जल्लादची व्यवस्था करण्याची विनंती केली.
  • 13 डिसेंबर 2019 : निर्भयाच्या आईने पटियाला हाउस कोर्टात फाशीची तारीख निश्चित करण्यासाठी याचिका दाखल केली. यात चारही दोषी व्हीडियो कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून न्यायालयात हजर झाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)