हिंदूंना ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षड्यंत्र- नितीन राऊत : #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'हिंदूंना ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षड्यंत्र'

"हिंदुत्ववादाचा पुरस्कार करीत देशात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने या देशातील हिंदूंनाच परदेशी ठरवून त्यांना आसाममध्ये निर्वासितांच्या छावणीत राहाण्याची वेळ आणली आहे," असा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

"जातीय भांडण लावून पुन्हा या देशात वर्णव्यवस्था निर्माण करून बहुसंख्य ब्राह्मणी व्यवस्थेचे गुलाम बनविण्याचे षड्यंत्र सीएएच्या आणि एनआरसीच्या माध्यमातून रचलं जात असल्याचाही" आरोप त्यांनी केला आहे.

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला घटनाच मान्य नाही. कारण त्यांना या देशात वर्णव्यवस्था विर्माण करायची आहे. जे हिंदू, आदिवासी, दलित, भटके विमुक्त आणि इतर आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी दस्तावेज आणि पुरावे देऊ शकणार नाही त्यांना आपली मालमत्ता आणि रोजगाराला मुकावे लागून निर्वासितांच्या छावणीत जगावे लागणार आहे," असंही त्यांनी म्हटलंय. हे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले आहे.

2. 'महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होणार बंडखोरी'

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसला आपले नेते सांभाळता येत नाहीत. याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये बंडखोरी होणार असल्याचं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे हे मराठी भाषक आहेत. मुळचे महाराष्ट्रीय आहेत. त्यांची आजी ही पूर्वी भाजपमध्येच होती. त्यामुळे त्यांनी घरवापसी केली आहे. भाजपने फोडाफोडी केली नाही. काँग्रेसला त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आमच्याकडे यावं. तसं झालं तर मजबूत सरकार अस्तित्वात येईल. लवकरच तिन्ही पक्षांत बंडखोरी होणार असून महाविकास आघाडीचा एक नेता संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. हे वृत्त न्यूज 18 लोकमतने दिले आहे.

3. भाजप आमदारही मध्य प्रदेशाबाहेर

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि 12 आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

भाजपने आपल्या आमदारांना राज्यातून बाहेर हलवलं आहे. तर काँग्रेसचे नेते हरिश रावत आणि मुकुल वासनिक सरकार वाचवण्याच्या प्रयत्नांसाठी दिल्लीहून भोपाळला गेले आहेत.

बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे नेते सज्जान सिंह वर्मा आणि डॉ. गोविंद सिंह बंगळुरूला रवाना झाल्याचंही समजतं. मुख्यमंत्री कमलनाथ बंडखोरांच्या संपर्कात आहेत, असा दावा मध्य प्रदेश काँग्रेसच्या मीडिया विभागाच्या प्रमुख शोभा ओझा यांनी सांगितलं. हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. येस बँक प्रकरणाची म्युच्युअल फंडांना झळ

रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या पुनर्बांधणीच्या प्रस्तावित मसुद्यातल्या रोख्यापोटीच्या 8400 कोटी रुपयांचं दायित्व नाकारलं आहे. रिझर्व्ह बँकेने असं एखाद्या बँकेच्या रोख्यांचं दायित्व नाकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. रोख्यांपोटीचं दायित्व नाकारल्यामुळे त्याचा फटका म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना होणार असल्याचं दिसतं.

दरम्यान येस बँकेवर घालण्यात आलेले आर्थिक निर्बंध शनिवारपर्यंत मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. येस बँकेत स्टेट बँकेने 49 टक्के भागभांडवल घेण्याची तयारी केली असून पुनर्रचित येस बँकेसाठी ठोस आराखडा स्टेट बँक सादर करणार आहे. हे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे.

5. दिल्ली दंगलीवर आज लोकसभेत चर्चा

लोकसभेत आज दिल्लीमध्ये दंगलीवर चर्चा होणार आहे. नियम 193 नुसार ही चर्चा होणार असून त्यावर मतदान होणार नाही. गृहमंत्री अमित शाह या चर्चेला उत्तर देणार आहेत.

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या सात खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. तसंच विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावा लागलं होतं. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी आणि भाजपचे दिल्लीतील खासदार या चर्चेला सुरुवात करतील. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)