You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रश्मी ठाकरे: अमृता फडणवीस यांनी दिल्या सामनाच्या 'नव्या संपादकां'ना शुभेच्छा
दैनिक सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबद्दल अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरे यांचं अभिनंदन केलं.
दैनिक सामनाच्या संपादकपदी तुमची निवड झाल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. प्रत्येक क्षेत्रात सर्वोच्च नेतृत्त्वपदी महिला असणं ही आपल्या देशाची गरज आहे. तरच आपल्या समाजात असलेल्या इतर महिलांना योग्य प्रतिनिधित्व आणि संधी मिळेल. तसेच महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळेल," अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं मुखपत्र दै. सामनाची सूत्रं आली आहेत. सामनाचं संपादकपद हे लाभाचं पद असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपादकपदाचा राजीनामा दिला. संजय राऊत हे सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. त्यांनी काही काळ सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी पाहिली. आता हे पद ठाकरे कुटुंबातील व्यक्तीकडेच आलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस काही दिवसांपूर्वीच चर्चेत आल्या होत्या. जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीस यांनी कोपरखळी मारली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी थेट राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला पत्र लिहिलं होतं आणि अमृता यांची तक्रार भैय्याजी जोशी यांच्याकडे केली होती.
याआधी काय झालं होतं?
आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'बांगड्या घातल्या नाहीत' या वक्तव्यावर टीका करतांना त्यांनी माफी मागावी असं म्हटलं. पण देवेंद्र यांच्या बाजूनं अमृता यांनी ट्वीट केलं. त्यावर अमृता फडणवीस यांनी आदित्य यांचं हेच ट्वीट रिट्वीट करत म्हटलंय, "कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातलं गमक कधीच कळणार नाही."
आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे."
अनेकांना अमृता यांच्या या आक्रमक अंदाजाचं आश्चर्य वाटलं. याअगोदरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे आडनावावरनं टीका केली होती. "ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं," असं त्या म्हणाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी रश्मी ठाकरे यांना दिलेल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)