You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमृता फडणवीस यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत का?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
विधानसभेतले विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. देवेंद्र हे मुख्यमंत्री असतांनाही गाण्यापासून ते रॅम्पवॉकपर्यंत अनेकदा त्या चर्चेत आल्या. पण ते विषय हे अराजकीय होते.
गेल्या काही काळात, विशेषत: भाजपा विरोधी बाकांवर गेल्यानंतर त्यांच्या राजकारणाविषयी वक्तव्यांमुळे त्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
ट्विटरवर सक्रिय असणा-या अमृता या शिवसेनेबाबत, ठाकरे कुटुंबाबाबत आक्रमक झालेल्या पहायला मिळताहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून यापूर्वी न पाहिलं गेलेलं व्यक्तिमत्त्व ठरलेल्या अमृता यांना राजकीय महत्वाकांक्षाही आहेत का अशी चर्चाही आता होऊ लागली आहे.
आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'बांगड्या घातल्या नाहीत' या वक्तव्यावर टीका करतांना त्यांनी माफी मागावी असं म्हटलं. पण देवेंद्र यांच्या बाजूनं अमृता यांनी ट्वीट केलं. त्यावर अमृता फडणवीस यांनी आदित्य यांचं हेच ट्वीट रिट्वीट करत म्हटलंय, "कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातलं गमक कधीच कळणार नाही."
आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेश्माच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे."
अनेकांना अमृता यांच्या या आक्रमक अंदाजाचं आश्चर्य वाटलं. याअगोदरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ठाकरे आडनावावरनं टीका केली होती. "ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं," असं त्या म्हणाल्या होत्या.
अमृता या ट्विटरवर आणि इतर समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. त्यांच्यावर टीका करणा-यांनाही त्या उत्तर देतात. पण आता राजकीय असणा-या मतप्रदर्शनावर आणि एकेकाळी मित्र असणा-या शिवसेनेवर टीका केल्यानंतर अमृता आता राजकीय भूमिका घेताहेत का यावर चर्चा सुरू झाली. सध्या शिवसेनेत गेलेल्या किशोर तिवारींनी थेट रा. स्व. संघाच्या भैय्याजी जोशी यांनाच पत्र लिहिल्यानंतर तर अधिकच कयास लावले गेले.
देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य नागपूरमध्ये पहिल्यापासून जवळून पाहणा-या 'एबीपी माझा'च्या वरिष्ठ पत्रकार सरिता कौशिक यांच्या मते जी वक्तव्य अमृता यांच्याकडून येत आहेत ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रतीकं आहेत, महत्त्वाकांक्षा दाखवणारी नाहीत.
"जरी त्या राजकीय भाष्य करत असल्या तरी त्यांना स्वत:ला काही राजकीय महत्वाकांक्षा असेल वाटत नाही. हे साहजिक आहे की त्या नागपूरहून मुंबईला गेल्यावर जो राजकीय संबंध खूप मोठा आला. त्या एक अनुभवी प्रोफेशनल आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय गोष्टींची समजही सहज आली. सोबतच मीडियाचा प्रकाशझोत आला. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाला," कौशिक म्हणतात.
"पण सध्या काही राजकीय बदल महाराष्ट्रात झाला तो पचवणं भाजपासाठी कठीण आहे आणि फडणवीस कुटुंबासाठी अधिकच कठीण आहे. आपल्या अनेक वर्षांच्या राजकीय मित्रावर देवेंद्र यांनी टीका केली तर आपल्याला काही वाटत नाही, पण अमृता यांनी केली तर चर्चा होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पहिल्यापासून जे व्यक्तिस्वातंत्र्य दिलं त्याच्या दृष्टिकोनातून पहायलाही हवं. समाजात अनेक जण विविध विषयांवर आपली मतं व्यक्तं करतात पण तसं त्याही करतात," कौशिक सांगतात.
"अमृता यांच्या मतावर जास्त करडी नजर असते. महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत अशा प्रकारे मतं व्यक्त करणं यापूर्वी कधी झालेलं नसल्यानं असे तर्कवितर्क लढवले जातात," सरिता कौशिक पुढे म्हणतात. अमृता यांना राजकीय जबाबदारी देण्याविषयी भाजपा वा रा. स्व. संघ यांच्यामध्ये कधीही चर्चा ऐकली नसल्याचंही त्या नमूद करतात.
अमृता फडणवीस यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नाहीत असं ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनाही वाटतं.
"अमृता फडणवीस यांना काही राजकीय महत्त्वाकांक्षा आहे असं म्हणणं फार गडबडीचं होईल. मला आता तरी असं वाटत नाही. पण एक नक्की की त्यांनी केलेल्या विधानांचं राजकारण आता होत राहणार. मुळात अगोदर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात फडणवीसांनी स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्ये असलेल्या किशोर तिवारींनी, जे आता शिवसेनेत गेले आहेत, भैय्याजी जोशी यांना पत्र लिहिणं आणि ते माध्यमांमध्ये येणं यातंच काही गौडबंगाल आहे. त्यामुळे याचं राजकारण होत राहणार," ज्येष्ठ राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात.
पण मग आता राजकीय विषयांवर त्या करत असलेल्या आक्रमक भाष्यांकडे कसं पहायचं? "मला वाटतं की एवढी वर्षं राजकीय युती असतांना ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये व्यक्तिगत संबंधही तयार होतात. त्यामुळे या आक्रमकतेचा संबंध व्यक्तिगत पातळीवर वाटत असलेल्या विश्वासघाताशी असावा," नानिवडेकर म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)