दिल्ली हिंसाचार: जमावाकडून मारहाण झालेल्या मोहम्मद झुबैर यांची कहाणी

    • Author, देबलिन रॉय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पांढऱ्या शुभ्र कुर्त्यावर पडलेले रक्ताचे डाग. जमिनीवर पडलेला एक तरुण आपल्या दोन्ही हातांनी डोकं वाचवायचा प्रयत्न करत होता. डोक्यातून येणाऱ्या रक्तामुळे त्याचे दोन्ही हात लालबुंद झाले होते. चारही बाजूंनी त्याला दंगेखोरांनी वेढलं होतं. त्यांच्या हातात काठ्या आणि लोखंडी रॉड होते.

37 वर्षांच्या मोहम्मद झुबैर यांचा हा फोटो दिल्ली हिंसाचाराची भीषण स्थिती दाखवून देतो. या चेहऱ्यावरील जखमा अनंत काळासाठी कायम राहतील. त्या कदाचित कधीच भरल्या जाणार नाही.

ईशान्य दिल्लीतील झुबैर सोमवारी जेव्हा घराशेजारील मशिदीजवळून जात होते, तेव्हा पुढच्या काही क्षणांत आपलं आयुष्य बदलेल, असा विचारही त्यांच्या मनात आला नसेल.

ते सांगतात, "सोमवारी प्रार्थनेसाठी मी दर्ग्यात गेलो होतो. प्रार्थना संपल्यानंतर मी माझ्या भावंडांसाठी खाऊ घेतला. मी दरवर्षी इज्तमानंतर भावंडांसाठी पराठा, दहीवडे आणि नान खटाई खरेदी केली. त्यादिवशीसुद्धा मी हे खरेदी केलं. नान खटाई मिळाली नाही म्हणून संत्र्यांची खरेदी केली. सुरुवातीला मी विचार केला की, बहिणीकडे किंवा एखाद्या नातेवाईकाकडे जावं. पण, नंतर मनात विचार आला की, आधी घरी जावं, कारण भावंडं वाट बघत असतील."

त्यादिवशी गडबडीत फोन न घेताच झुबैर घराबाहेर पडले होते.

"मी दर्ग्याकडे निघालो. खजुरी खास या भागाजवळ मी पोहोचलो तेव्हा मला कळलं की, तिथं हाणामारी सुरू आहे. हिंदू-मुस्लीम भांडण सुरू आहे. त्यामुळे मी विचार केला की, भजनपुरा भुयारी मार्गानं जाऊन चांदबागला पोहोचावं. मी भजनपुरा मार्केटला पोहोचलो तर ते बंद होतं. तिथं लोक एकत्र येत होते. मी कुर्ता-पायजमा आणि टोपी घातलेली होती. मुस्लीम पद्धतीचे कपडे घातलेले होते. मी तिथून निघालो तेव्हा कुणी मला काहीच म्हटलं नाही. मी भुयारी मार्गातून बाहेर पडलो, तेव्हा तिथं उभे असलेले एक व्यक्ती माझ्याकडे पाहत होते. तुम्ही खाली जाऊ नका, धोकादायक स्थिती आहे, त्यापेक्षा पुढच्या मार्गानं जा, असं त्यांनी मला सांगितलं."

'एखादी शिकार समजून मारहाण'

त्या व्यक्तीचं ऐकत झुबैर यांनी सबवेवरून न जाता सरळ जायचं ठरवलं. पुढे गेले तोच त्यांनी पाहिलं की दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू होती.

"एका बाजूला हजारो लोक होते, दुसऱ्या बाजूला किती लोक होते, ते मला दिसलं नाही. पण, दगडफेक दोन्ही बाजूंनी सुरू होती. मला भीती वाटली आणि मी मागे सरकलो. त्याच वेळी जमावातील काही जणांनी मला बघितलं आणि त्यांच्यातील एक जण माझ्याकडे आला. मी तुझं काय बिघडवलंय, असं मी त्याला विचारलं. मग आमच्या दोघांमध्ये वादावादी झाली. त्यांनंतर जमावातील अनेक जण आले आणि अक्षरश: माझ्यावर तुटून पडले," झुबैर सांगतात.

"माझ्या डोक्यात रॉडने मारा करण्यात आला. एकदा, दोनदा, तीनदा...रॉडचा मारा सुरूच होता. माझ्या डोक्यावर इतक्यांदा रॉड मारण्यात आला की, मी खाली कोसळलो. तितक्यात कुणीतरी माझ्या डोक्यावर तलवारीनं वार केले. अल्लाची कृपा आहे की, ती तलवार पूर्णपणे माझ्या डोक्यावर पडली नाही. ती जर डोक्यावर पडली असली तर मी आज जिवंत नसतो."

हल्लेखोर झुबैर यांच्यावर तुटून पडले होते. आता जीव वाचणार नाही, असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला.

'अल्लाह...मला तुझ्याकडे यायचंय'

"त्यानंतर मी अल्लाहची आठवण करायला सुरुवात केली. अल्लाह... मला तुझ्याकडे यायचं आहे, असं मी मनातल्या मनात म्हटलं. काहीच आशा उरली नव्हती. ते जवळपास 20 ते 25 जण होते. जोपर्यंत त्यांच्या अंगात ताकद होती, तोवर ते मला मारत होते. लाठ्या, रॉड एकानंतर एक मार पडत होता" जुबैर पुढे सांगतात.

हल्लेखोर मारहाण करताना जय श्रीराम आणि मारो मुल्ला को अशा घोषणा देत होते, असं जुबैर सांगतात.

त्यानंतर काही जण मला तिथून घेऊन गेले, इतकं लक्षात असल्याचं झुबैर सांगतात. याला लवकर पलीकडे घेऊन चला, असं ते म्हणत होते.

त्यानंतर झुबैर अॅम्बुलन्समध्ये असताना शुद्धीवर आले. दवाखान्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याजवळ घरचं कुणीही नव्हतं. त्यांनी आसपासच्या लोकांना घरातल्यांचा नंबर देऊन दवाखान्यात बोलावून घ्यायची सूचना केली.

ते सांगतात, "त्यावेळी कदाचित डॉक्टरांचं माझ्याकडे जास्त लक्ष नव्हतं. माझं डोकं प्रचंड दुखत होतं, डोक्यातून रक्त वाहत होतं. माझ्यासमोर एक व्यक्ती होती, त्यांचे दोन्ही हाताला जखम झाली होती. तुमचे दोन्ही हात कापायला लागतील, असं डॉक्टरांनी त्यांना म्हटलं. हे सगळं ऐकून मी गप्प बसलो. माझ्यापेक्षाही अधिक त्रास सहन करणारं इथं दुसरं कुणीतरी आहे, हे मला समजलं."

वृद्ध आई फक्त रडते...

झुबैर यांना टाके कधी लावण्यात आले, ते आठवत नाही. त्यांच्या डोक्यात 25 ते 30 टाके पडले आहेत. आजपर्यंत सरकाकडून कोणतीही मदत न मिळाल्याचं, तसंच कुणी विचारपूस न केल्याचं दु:ख त्यांना आहे.

पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल करण्याच्या स्थितीतही ते सध्या नाहीत. त्यांना दवाखान्यातून अजून एमएलसी मिळालेली नाही, जी एफआयआर दाखल करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

झुबैर यांची मुलं आणि नातेवाईक हल्ला झाल्यानंतर 4 दिवसांना त्यांना भेटू शकले. मीडियातील त्यांचा फोटो पाहून झुबैर वाचणार नाहीत, असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटलं होतं.

झुबैर यांच्या आई फक्त रडत असतात. त्या मीडियाशी बोलतसुद्धा नाही. त्या शांत बसून राहतात.

"मला कुणाकडून काहीच नकोय, सरकारकडून काहीच नकोय. अल्लाहची कृपा आहे, माझा मुलगा वाचला. आता आम्हाला एकटं सोडून द्या," त्या म्हणतात.

'मारहाणीदरम्यान पोलीस तिथं होते'

सरकारला तुम्हाला काय सांगायचं आहे का, असं विचारल्यावर ते सांगतात, आम्ही सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, जे सरकार दंगल रोखू शकलं नाही, त्यांच्याकडून कशाची अपेक्षा करावी?

पोलिसांच्या भूमिकेविषयी ते म्हणतात, "मला मारहाण सुरू होती, तेव्हा पोलीस कर्मचारी तिथं फिरत होते. असं असतानाही दंगेखोर निर्धास्त होते. जसं काही एखादी जत्रा आहे आणि त्यांना काहीही करण्याची सूट आहे. मला मारहाण सुरू होती, तेव्हा पोलीस फक्त तिथं चकरा मारत होते. जसं काही त्यांचा या प्रकरणाचा काही संबंध नव्हता."

यापूर्वी माझं कधीच कुणाशी भांडण झालं नाही.

झुबैर यांच्या शरीरावर सगळीकडे मारहाणीमुळे झालेल्या जखमा दिसून येतात. त्यांचं सगळं शरीर निळसर झालं आहे. असं असतानाही स्थानिक डॉक्टरकडून ते उपचार घेत आहेत.

मोठ्या डॉक्टरकडे काही दिवसांनंतर जाणार, असं ते सांगतात. कारण अजूनही वातावरण चिघळण्याची भीती त्यांना वाटते.

'त्यांना हिंदू नाही म्हणू शकत'

घटनेविषयी अधिक विचारल्यावर झुबैर सांगतात, "काही वाईट माणसं जास्तीत जास्त तुमचा जीव घेऊ शकतात. त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. मला तेव्हाही भीती वाटत नव्हती, आजही वाटत नाहीये आणि कधीच वाटणार नाही. अन्यायाची भीती वाटणं सगळ्यात मोठी चूक आहे. भीती तेव्हा वाटते जेव्हा तुम्ही एखादं वाईट काम करत असता. मी तर असं काहीच केलं नव्हतं, त्यामुळे भीती वाटायचं कारणच नाही. भीती तर त्यांना वाटायला पाहिजे होती, जे एकामागोमाग एक माझ्यावर तुटून पडले होते."

देशाच्या राजधानीत दिल्लीत असा प्रसंग अनुभवायला मिळेल, याचा कधीच विचार केला नव्हता, असं झुबैर सांगतात.

ते पुढे म्हणतात, "मी एक संदेश देऊ इच्छितो. हिंदू,मुस्लीम, ख्रिश्चन ...कोणताच धर्म चुकीची शिकवण देत नाही. ज्यांनी माझ्यासोबत असं वर्तन केलं त्यांना माणुसकीचे शत्रूच म्हणता येईल. त्यांना एखाद्या धर्माशी जोडणं मला योग्य वाटत नाही. हिंदूंनी माझ्यासोबत असं केलं, हे मी म्हणू शकत नाही. असं करणारा ना हिंदू असतो, ना मुसलमान. प्रत्येक धर्म प्रेम आणि शांतीचा संदेश देतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)