You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली दंगल : शर्मा आणि सैफी काकांची मैत्री अशी आली कामी
- Author, फैसल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
रविवारी दुपारी मनोज शर्मा आणि जमालउद्दीन एकत्र बसलेले होते. त्याच वेळी विजय पार्ककडे येणाऱ्या जमावानं दगडफेक सुरू केली. जमावानं दुकानांवर हल्ला केला.
शर्मा आणि सैफी या दोघांकडे तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण, काही वेळानंतर त्यांनी परिसरातल्या लोकांना एकत्र जमवलं आणि परत विजय पार्कमध्ये आले. या सगळ्यांनी मिळून हिंसक जमावाला परतवून लावलं. यादरम्यान पोलिसांच्या गाड्या तिथं पोहोचल्या.
जमावानं केलेल्या हल्ल्याचे निशाण आजही मुख्य रस्त्यावर स्पष्टपणे दिसतात. यामध्ये तुटलेल्या खिडक्या, जळालेल्या मोटारसायकल यांचा समावेश आहे.
आम्ही या भागात पोहोचलो, तेव्हा कर्मचारी स्वच्छता करत होते.
पोलसांनी घोषणाबाजी करणाऱ्या जमावाला भडकवलं, असा आरोप स्थानिक अब्दुल हमीद करतात.
इथं गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यात बिहारमधील मुबारक नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला, असाही स्थानिकांचा दावा आहे.
या हल्ल्यात सुरेंद्र रावत नावाची व्यक्ती गंभीरपणे जखमी झाली असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोरांनी तोडलं सैफी यांचं घर
"त्यादिवशी हिंसक जमाव आमच्या भागाच्या आत शिरू शकला नाही, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा आत घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र आम्ही तयारीनिशी होतो. गल्लीतील मुख्य रस्ता बंद केला होता आणि समुदायातील लोक घराबाहेर एकत्र बसलेले होते," जमालउद्दीन सांगतात.
हल्लेखोरांनी सैफी यांच्या घराची तोडफोड केली.
विजय पार्क दिल्लीतल्या मौजपूर भागात आहे, या भागात हिंसाचारामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
या परिसरातील मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्टेशनजवळील इतर चार स्टेशन्सला सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलं होतं. असं असलं तरी इतर भागांत मेट्रो सुविधा सुरळीतपणे चालू होती.
ईशान्येकडील या सगळ्या मेट्रो स्टेशन्सला बुधवारी पुन्हा सुरू करण्यात आलं. विजय पार्कमध्ये हिंदू आणि मुस्लीम यांची घरं शेजारीशेजारी आहेत.
इथं मंदिर आणि मशीद शेजारी शेजारीच आहेत. त्यामुळे इथं दंगल उसळली असती, तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते.
पवन कुमार शर्मा मंदिर समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. ते सांगतात की, "हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत एक समिती तयार केली आहे. या समितीत 20 लोक आहेत, ज्यांनी घरोघरी जाऊन सांगितलं की, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका आणि मुलांना घराबाहेर निघू देऊ नका."
सोमवारी हल्लेखोरांनी या भागात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी इथं शांती मार्च काढण्यात आला. यात सगळ्या समुदायाच्या लोकांनी सहभाग नोंदवला होता.
रात्रभर पहारा
जुल्फिकार अहमद शांती समितीचे सदस्य आहेत. ते सांगतात, "आमच्या भागातील लोक रात्रभर घराबाहेर बसून पहारा देत होते. जिथं हिंदूंची संख्या अधिक आहे, तिथं हिंदूंना पहारा देण्यासाठी सांगण्यात आलं आणि जिथं मुस्लीम जास्त आहेत, तिथं मुस्लिमांना पहारा देण्यासाठी सांगितलं."
तर निवृत्त सरकारी कर्मचारी धरमपाल सांगतात, "आता इथं पोलीस आले नाही, तरी काहीच होणार नाही."
हिंसाचाराला काही दिवस उलटल्यानंतर विजय नगरमधील भागातील परिस्थिती सामान्य दिसून येते.
या भागातील एक भाजी विक्रेता दोन दिवसांनी परत आला आहे, जिथं तो राहायचा त्या भागात हिंसाचार झाला होता.
या भागातील बिर्याणीचं दुकानही आज उघडलेलं आहे. दुकानातून आलेला सुगंध तुमचं ध्यान आकर्षित करतो.
असं असलं तरी, कुठूनतरी आलेल्या गोळीमुळे जीव गमावलेला मुबारक आणि गंभीररित्या जखमी झालेल्या सुरेंद्र रावत यांच्या विषयी बोलताना लोक भावूक होतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)