You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओवेसींच्या व्यासपीठावरून तरुणीनं दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. ओवेसींच्या व्यासपीठावरून तरुणीनं दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा
AIMIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी बोलण्यासाठी उभे असतानाच एका तरुणीनं व्यासपीठावर येऊन 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
यासंदर्भातील व्हीडीओ 'ANI'नं ट्वीट केला आहे. ओवेसी यांच्या बंगळुरूमधील सभेदरम्यान ही घटना घडली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
CAA आणि NRC विरोधात AIMIMचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बंगळुरूमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी ओवेसी यांचं भाषणही झालं. मात्र, ओवेसीं भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर एका तरुणीनं व्यासपीठावर गोंधळ घातला.
अमुल्या नावाच्या तरुणीनं अचानक व्यासपीठावर येऊन माईक हातात घेतला आणि बोलण्यास सुरूवात केली. यावेळी AIMIMच्या कार्यकर्त्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिने तिचं बोलणं सुरूच ठेवलं.
त्यानंतर कार्यकर्त्यांनी तिच्या हातातील माईक हिसकावून घेतला. तसंच तिला बाजूला जाण्यास सांगितलं. मात्र, तरुणीनं व्यासपीठावर समोर येत पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद फरक सांगते, असं सांगत पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. तिने अशा घोषणा देण्यास सुरूवात केल्यानंतर ओवेसींनी तिला धावत जाऊन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र शांत होत नसल्यानं कार्यकर्त्यांनी तिला ओढत व्यासपीठावरून खाली नेलं.
2. वंचित आणि MIM मोदींचे दलाल - प्रणिती शिंदे
आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित आणि MIM मोंदींचे दलाल असल्याचं म्हटलं आहे. सकाळनं ही बातमी दिलीय.
सोलापूर शहरात गुरुवारी प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं 'भाजप हटावो,देश बचाओ' आंदोलन केलं.
त्या म्हणाल्या, "देशात वेगवेगळे कायदे आणून धर्म-जातीच्या आधारे विभागणी केली जात आहे. जात ही देशाला लागलेली कीड आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रथम भारतीय असल्याची भावना येते. कितीही कायदे आणून विभाजन करण्याचा प्रयत्न केले, तरी देशाचं विभाजन होणार नाही."
"देशात CAA, NRC आणि NPR कायदे लागू होत असताना दलितांवरील अन्याय दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना वंचित-एमआयएम गप्प का आहेत. सर्व भाजपचेच बगलबच्चे आहेत. "वाह रे मोदी तेरी चाल, वंचित-एमआयएम तेरे दलाल" असंही त्यांनी म्हटलंय.
3. डॉ. पायल तडवी प्रकरण : 'शिक्षणाचा अधिकार हिरावून शकत नाही'
एखाद्या व्यक्तीवरील गुन्हा कितीही गंभीर असला, तरी त्याचा शिक्षणाचा अधिकार आम्ही हिरावून घेऊ शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींच्या जामिनातील काही अटी शिथिल करण्याबाबत नायर रूग्णालय आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
डॉ. पायल तडवीने 22 मे 2019ला नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी उर्वरीत शिक्षण पूर्ण करण्यासाठी नायर रूग्णालयात प्रवेश करू देण्याच्या मागणीची याचिका केली आहे.
4. पाठ्यपुस्तकातील शिवाजी महाराजांविषयीच्या लिखाणावरून वाद
गोव्याच्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अवमान करणारं लिखाण समोर आल्याचं वृत्त न्यूज 18 लोकमतनं दिलंय.
गोवा सरकारच्या 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकात एक पुरवणी 'गोव्याचा इतिहास' नावाने जोडण्यात आली आहे.
त्यात 'गोव्यातील बार्देश तालुक्यात छत्रपती शिवरायांनी आक्रमण करुन सलग तीन दिवस गावे लुटली, जाळपोळ केली, लहान मुले आणि महिलांना डांबून ठेवले तसंच काहींना ठार मारले,' असं छापण्यात आलं आहे.
याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून गोवा राज्य शिक्षण संचालक वंदना राव यांना निवेदन देण्यात आलं आहे.
महाराजांबद्दल संतापजनक लिखाण करण्यात आलं असून राजांविषयी खोटा इतिहास कोणीही सहन करणार नाही. हे पुस्तक राज्य शासनाने त्वरीत मागे घ्यावं, अन्यथा शिवप्रेमी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी दिला आहे.
5. उद्धव ठाकरे पंतप्रधान आणि सोनिया गांधींना भेटणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी दिल्लीला जात असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. लोकमतनं ही बातमी दिलीय.
मुख्यमंत्री ठाकरे सकाळी 12 वाजता पंतप्रधानांना भेटतील, तर संध्याकाळी 6 वाजता ते सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यात आयोजित पोलीस महासंचालकांच्या परिषदेच्या निमित्तानं या दोघांची पुणे विमानतळावर भेट झाली होती.
उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असेल. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)