ICC Women's T20 World Cup: भारत की ऑस्ट्रेलिया कोण जिंकणार अंतिम सामना?

    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महिला विश्वचषक टी-20 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियात होत आहे. यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा सामना रंगला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 4 वेळा विश्वचषक जिंकला आहे तर भारत पहिल्यांदाच अंतिम सामना खेळत आहे. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर आणि शफाली वर्मा हे खेळाडू फॉर्ममध्ये असल्यामुळे हा सामना कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या लेखात आपण टी-20चा इतिहास तर पाहणारच आहोत पण त्याबरोबरच आपण भारतीय खेळाडूंची ओळखही करून घेऊत.

ऑस्ट्रेलिया 4 वेळचा विजेता

टीम इंडियाच्या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांगलादेश आणि श्रीलंका यांचा समावेश होता. तर दुसऱ्या गटात इंग्लंड, पाकिस्तान, थायलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांचा समावेश होता.

आयसीसी वूमन्स ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा दर दोन वर्षांनी होतो. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या नावावर सर्वाधिक चार जेतेपदं आहेत. याच टीमशी भारत आज टक्कर देणार आहे.

टीम इंडिया प्रत्येकवेळी या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. मात्र जेतेपदापासून ती दूर राहिली आहे. टीम इंडियाने 2009, 2010 आणि 2018 मध्ये सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती. 2016 मध्ये भारताने या स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं.

मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांनी ट्वेन्टी-20 प्रकारातून निवृत्ती स्वीकारल्यामुळे टीम इंडियाच्या ताज्या दमाच्या खेळाडूंना जेतेपदावर नाव कोरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.

आयसीसी वूमन्स ट्वेन्टी-20 वर्ल्ड कपचा इतिहास

वर्ष आणि विजेते

2009- इंग्लंड

2010- ऑस्ट्रेलिया

2012- ऑस्ट्रेलिया

2014-ऑस्ट्रेलिया

2016-वेस्ट इंडिज

2018-ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आयसीसी वूमन्स ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अशी आहे टीम इंडिया...

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मन्धाना, पूजा वस्त्राकर, राधा यादव, रिचा घोष, तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, अरूंधती रेड्डी, पूनम यादव, दीप्ती शर्मा, हरलीन कौर, शिखा पांडे, वेदा कृष्णमूर्ती, शफाली वर्मा, राजेश्वरी गायकवाड.

प्रशिक्षक- डब्ल्यू. व्ही. रमण, स्पिन सल्लागार- नरेंद्र हिरवाणी.

भारतीय महिला खेळाडूंबाबत जाणून घेण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी...

हरमनप्रीत कौर

टीम इंडियाची सगळ्यांत अनुभवी खेळाडू. महिला ट्वेन्टी-२० प्रकारात भारतासाठी पहिलंवहिलं शतक झळकावण्याचा मान हरमनप्रीतच्या नावावर आहे.

शंभरहून अधिक ट्वेन्टी-20 खेळण्याचा विक्रमही हरमनप्रीतच्या नावावर आहे. गेली अनेक वर्षं टीम इंडियासाठी धावांची टांकसाळ उघडत विजयात निर्णायक भूमिका बजावण्यात हरनप्रीत आघाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिला बिग बॅश स्पर्धेत खेळण्याचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरू शकतो. सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित.

स्मृती मन्धाना

आक्रमक फटकेबाजी आणि कलात्मकता यांचा सुरेख मिलाफ स्मृती मन्धानाच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळतो.

2018 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट तसंच सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू पुरस्काराने स्मृतीला गौरवण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी दमदार प्रदर्शनाच्या बळावर स्मृतीने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली होती.

फोर्ब्स मासिकातर्फे तयार करण्यात येणाऱ्या ३० वर्षांखालील प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्मृतीचा समावेश होता.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० लीग स्पर्धेत खेळण्याचा अनुभव संघाला उपयुक्त ठरू शकतो. स्मृतीला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

जेमिमा रॉड्रिग्ज

टीम इंडियाच्या लोकप्रिय खेळाडूंपैकी एक. मुंबईकर जेमिमा उत्तम हॉकी प्लेयर आहे. मात्र बॅट का हॉकी स्टिक असा निर्णय घ्यायचा वेळ आली तेव्हा तिने बॅटची निवड केली.

बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर जेमिमाने ठसा उमटवला आहे. जेमिमा उत्तम गाते आणि सुरेख गिटारही वाजवते. सोशल मीडियावरही जेमिमाची इनिंग्ज जोरदार सुरू असते.

शफाली वर्मा

तडाखेबंद बॅटिंग करणाऱ्या शफाली वर्माने काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरबरोबरचा फोटो शेअर केला होता.

"तुमच्यामुळे क्रिकेट खेळू लागले, माझं अख्खं कुटुंब तुमचं चाहता आहे. आज तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. माझं स्वप्न साकार झालं" ,असं शफालीने लिहिलं होतं.

15व्या वर्षी पदार्पण करत टीम इंडियाची सगळ्यांत यंग प्लेयर ठरण्याचा मान शफालीने मिळवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यांत कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम करत शफालीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

रोहतकच्या शफालीची दे दणादण बॅटिंग टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे.

रिचा घोष

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड जाहीर झाली तेव्हा रिचा घोष हे नाव अनेकांना चकित करणारं होतं. पश्चिम बंगालमधल्या सिलीगुडीची 16 वर्षीय रिचा ऑलराऊंड पॅकेज आहे.

बॅटिंग, कीपिंग आणि बॉलिंग अशा तिन्ही आघाड्या ती सांभाळू शकते. चॅलेंजर स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने रिचाला वर्ल्ड कपसाठीच्या संघात स्थान मिळालं आहे.

पूजा वस्त्राकार

टीम इंडियाची मीडियम पेस बॉलर. मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या पूजाने सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर टीम इंडियात स्थान पटकावलं.

दुखापतींमुळे पूजाची वाटचाल झाकोळली गेली आहे. मात्र ऑस्ट्रेलियातल्या फास्ट बॉलिंगसाठी अनुकूल खेळपट्यांवर छाप उमटवण्यासाठी पूजा सज्ज झाली आहे. बॉलिंगच्या बरोबरीने पूजा हाणामारीच्या षटकात उपयुक्त बॅटिंगही करू शकते.

दीप्ती शर्मा

टीम इंडियासाठी दीप्तीची स्पिन बॉलिंग अत्यंत महत्त्वाची आहे. ट्वे्न्टी-२० प्रकारात दीप्तीने भल्याभल्या बॅट्समनना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं आहे.

जागतिक क्रमवारीत दीप्ती चौथ्या स्थानी आहे. गेल्या वर्षी सुरत इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दीप्तीने तीन मेडन ओव्हर टाकण्याची किमया केली होती. 4-3-8-3 असा हा जबरदस्त स्पेल होता.

तानिया भाटिया

टीम इंडियाची विकेटकीपर. विकेटकीपर हा निम्म्याहून अधिक कॅप्टन असतो असं म्हटलं जातं. कॅच पकडणं, रनआऊट करणं, बॅट्समनच्या हालचाली टिपून बॉलरला सल्ला देणं अशी अनेकविध जबाबदाऱ्या कीपरकडे असतात.

तानिया हे सगळं चोखपणे करते आहे. याबरोबरीने बॅटिंगमध्येही कमाल दाखवू शकते हे तिने सिद्ध केलं आहे.

शिखा पांडे

टीम इंडियाची अनुभवी फास्ट बॉलर. ऑस्ट्रेलियातील पिचेस तिच्यासाठी अत्यंत पोषक आहेत. बॉलिंग युनिटचं नेतृत्व करताना शिखाचा अनुभव युवा खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे.

2018मध्ये शिखाला टीम इंडियातून वगळण्यात आलं तेव्हा तिचं करिअर संपलं असा अनेकांचा होरा होता मात्र तिने जिद्दीने पुनरागमन केलं. शिखा भारतीय हवाई दलात स्क्वॉड्रन लीडर पदावर कार्यरत आहे. टीम इंडियाच्या भरारीतही शिखाचं स्थान महत्त्वाचं असेल.

वेदा कृष्णमूर्ती

टोलेजंग फटकेबाजी ही वेदाची ओळख आहे. क्रिकेटच्या बरोबरीने वेदा कराटेत ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे.

वेदाची फिल्डिंग टीम इंडियासाठी कळीची ठरू शकते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश स्पर्धेत खेळल्याने ऑस्ट्रेलियातील पिचेस वेदासाठी नवीन नाहीत.

हरलीन कौर

ट्वेन्टी-20 हा वेगवान फॉरमॅट आहे. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्याचं कसब असलेले खेळाडू या फॉरमॅटसाठी साजेसे ठरतात.

हरलीन कौर देओलकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मर्यादित असला तरी तिची आक्रमक बॅटिंग शैली या फॉरमॅटसाठी अचूक आहे. बॅटिंगच्या बरोबरीने स्पिन बॉलिंगही करत असल्याने संघाला संतुलनही मिळवून देऊ शकते.

पूनम यादव

ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळण्याचा भरपूर अनुभव ही पूनमसाठी जमेची बाजू आहे. मूळची आग्र्याची असणाऱ्या पूनमची स्पिन बॉलिंग जगभरातल्या बॅट्समनसाठी डोकेदुखी आहे.

विकेट्स पटकावणं आणि रन्स रोखणं अशा दोन्ही जबाबदाऱ्या पूनम समर्थपणे पेलते. सातत्यपूर्ण प्रदर्शनाकरता पूनमला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. बीसीसीआयनेदेखील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने तिला गेल्या वर्षी सन्मानित केलं.

राधा यादव

परिस्थितीशी संघर्ष करत राधाने मेहनतीने नाव कमावलं आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील जौनपूरची असणारी राधा मुंबईत कांदिवली भागात राहते.

छोटं घर, मोठं कुटुंब असूनही राधाने क्रिकेटची आवड जोपासली. राधाच्या वडिलांचं भाजीविक्रीचं छोटंसं दुकान आहे.

महिला क्रिकेट खेळलं जातं हे काही वर्षांपूर्वी राधाला ठाऊकही नव्हतं. प्रशिक्षक प्रफुल्ल नाईक यांनी राधातली गुणवत्ता हेरली.

मुंबईत वयोगट स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानंतर राधाने बडोद्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. राधाची ट्वेन्टी-२० प्रकारात सातत्याने चांगली बॉलिंग केली आहे.

अरूंधती रेड्डी

राहुल द्रविडची चाहती असणाऱ्या अरूंधतीची बॉलिंग टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. सुरुवातीला हैदराबादसाठी खेळणाऱ्या अरूंधतीने नंतर रेल्वेकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

राजेश्वरी गायकवाड

राजेश्वरीचे भाऊबहीण खेळांमध्येच आहेत. राजेश्वरीची एक बहीण क्रिकेट खेळते तर दुसरी हॉकीपटू आहे. राजेश्वरीचा एक भाऊ बॅडमिंटनपटू आहे तर दुसरा व्हॉलीबॉल खेळतो.

आपल्या मुलीने खेळाडू म्हणून कारकीर्द घडवावी असं राजेश्वरीच्या वडिलांना वाटत होतं. राजेश्वरीने त्यांचं स्वप्न पूर्ण केलं.

मात्र काही वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. या आघाताने खचून न जाता राजेश्वरीने वाटचाल केली आहे. राजेश्वरीचा अनुभव आणि उत्तम फॉर्म टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)