सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाखाली खेळणार पॉन्टिंग, लारा आणि अक्रम

क्रिकेट जगताचा मेरुमणी असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मार्गदर्शनाखाली रिकी पॉन्टिंग, वासिम अक्रम आणि ब्रायन लारा हे दिग्गज खेळताना दिसणार आहेत. या महारथींविरोधात अॅडम गिलख्रिस्ट, कोर्टनी वॉल्श, शेन वॉटसन आणि युवराज सिंह उभे ठाकणार आहेत. निमित्त आहे ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये लागलेल्या भीषण आगीचं. वणवा पीडितांच्या मदतीसाठी आयोजित मैत्रीपूर्ण सामन्यासाठी हे सगळे माजी खेळाडू एकत्र येणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण वणवे लागले होते. या वणव्यामुळे ऑस्ट्रेलियातील जंगलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे ग्रामीण तसंच शहरी भागात गंभीर पडसाद दिसून आले.

वणवाग्रस्तांसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. वणवाग्रस्तांच्या नुकसानीचा दाह कमी करण्याच्या दृष्टीकोनातून क्रिकेट ऑस्ट्रेलियानेसुद्धा एक पाऊल उचललं आहे.

वणव्याचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक सामना आयोजित केला आहे. या सामन्याच्या माध्यमातून कमावलेली रक्कम ही वणवापीडितांच्या मदतीकरिता वापरली जाईल.

दिग्गजांचा समावेश

वणवा पीडितांच्या मदतीकरिता बुशफायर बॅश या नावाने हा सामना खेळवण्यात येईल. रिकी पाँटिंग इलेव्हन आणि अॅडम गिलख्रिस्ट इलेव्हन या दोन खेळाडूंच्या संघांमध्ये हा सामना होईल.

दोन्ही संघांमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या देशांतील दिग्गज खेळाडूंचा समावेश असेल.

कसे असतील संघ?

कधी होणार सामना?

वार - रविवार

दिनांक - 9 फेब्रुवारी 2020

वेळ - सकाळी 9 वाजून 45 मिनिटे (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

सचिन तेंडुलकरच्या हातात पुन्हा बॅट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बुशफायर बॅशमध्ये रिकी पाँटिंग इलेव्हन संघाचा प्रशिक्षक म्हणून सहभागी होणार आहे. तो प्रशिक्षक असला तरी मोकळ्या वेळेत सचिन फलंदाजी करताना दिसू शकतो.

ऑस्ट्रेलियाची खेळाडू एलिस पेरी हिने सचिनला एक ओव्हर खेळून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान सचिनने स्वीकारलं आहे.

त्यामुळे सचिनच्या निवृत्तीनंतर सुमारे सात वर्षांनी त्याच्या हातात पुन्हा बॅट पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळेल, हे निश्चित.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)