You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्यं टाळा - शरद पवार
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कान टोचले
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जर पाच वर्षं टिकवायचं असेल तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
सरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्यं टाळा असं सांगत पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कान टोचले आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे तपास सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचं दिसत आहे.
2. अर्थसंकल्प दिशाहीन- अशिमा गोएल
यंदाचा अर्थसंकल्प हा दिशाहीन आणि निराशाजनक असल्याची टीका पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्या अशिमा गोएल यांनी केली आहे.
1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला होता. बजेटमध्ये दूरदृष्टीचा अभाव असल्याचं सांगत गोयल यांनी केंद्र सरकारला घरचा अहेर दिला आहे. 'लाईव्हमिंट'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
संपूर्ण अर्थसंकल्पात मंदीबाबत अवाक्षरसुद्धा काढण्यात आले नाही. "बजेट म्हणजे महसुली उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधला जातो. मात्र यंदाचं बजेट निराशाजनक आहे," असं गोएल म्हणाल्या.
इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च या संस्थेतील व्याख्यानात बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावर भूमिका मांडली.
देशाचा विकासदर दशकभराच्या नीचांकावर घसरला आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम भारतावर होतो आहे. अशा परिस्थितीत बजेटमध्ये कोणतीच सुस्पष्ट भूमिका घेण्यात आली नव्हती. त्यामुळे अर्थसंकल्प दिशाहीन असल्याचं गोएल यांनी सांगितलं.
3. पुस्तकावर बंदी घालण्याची भाजपची मागणी
'शिवाजीचे उद्दातीकरण, पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अपमान करणारं, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या पुस्तकाचं लेखन विनोद अनाव्रत यांनी केलं आहे तर सुगावा प्रकाशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
पुस्तकातील वादग्रस्त मजकुराप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी अमरावती इथल्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पुस्तकातील प्रत्येक पानावर छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणारा मजकूर छापण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
4. इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातली चूक दुरुस्त करावी-हमीद दाभोलकर
इंदुरीकर महाराजांनी यांनी जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी म्हटलं आहे. 'पुढारी'ने ही बातमी दिली आहे.
इंदुरीकर महाराजांना मोठा अनुयायी वर्ग लाभला आहे. महाराजांची चूक दुरुस्त करावी आणि समाज प्रबोधनाचं काम करावं. स्त्रियांचा अपमान होईल अशी वक्तव्यं करू नयेत, असा सल्ला हमीद यांनी दिला आहे.
इंदुरीकर महाराजांच्या ओझर इथल्या कीर्तनाची क्लिप व्हायरल झाली होती. सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केला तर मुलगी होते, असं इंदुरीकर महाराज म्हणाले होते. इंदुरीकर महाराजांच्या विरोधात आणि त्यांच्या बाजूने गट निर्माण झाले आहेत.
5. मुंबईचं तापमान 38अंशांवर
फेब्रुवारीच्या मध्यातच मुंबईने पाऱ्याने चाळिशीकडे झेप घेतली आहे. सोमवारी मुंबईचं तापमान 38 अंश इतकं होतं. मागच्या दहा वर्षांतलं फेब्रुवारी महिन्यातलं हे तिसरं उच्च तापमान आहे असं तज्ज्ञांनी सांगितलं. ॉ
सांताक्रुझमध्ये 38 तर कुलाब्यात 34.7 इतक्या तापमानाची नोंद झाली. 'नेटवर्क18 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)