Arvind Kejriwal: राज ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडून काय शिकायला हवं?

राज ठाकरे आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते एकाच वयाचे आहेत. दोघांचेही वय 51 वर्षे आहे.

मात्र, राज ठाकरे यांचा राजकीय अनुभव अरविंद केजरीवालांपेक्षा जवळपास तिप्पट आहे. मात्र राजकीय स्तरावर अरविंद केजरीवाल यांच्या पदरात अधिक यश दिसून येतं.

त्यामुळं आणि विशेषत: दिल्लीच्या निवडणुकीनंतर या दोन्ही नेत्यांची तुलना होणं सहाजिक आहे. ही तुलना करत असताना, राज ठाकरे आणि त्यांचे मनसे या पक्षानं कोणत्या गोष्टी केजरीवालांकडून आत्मसात करणं आवश्यक आहे, याचा कानोसा बीबीसी मराठीनं घेतलाय.

तत्पूर्वी दोन्ही नेत्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

राज ठाकरे आणि अरविंद केजरीवालांचा राजकीय प्रवास

राज ठाकरे यांनी 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली. त्याआधी ते शिवसेनेत सक्रिय होते. अखिल भारतीय विद्यार्थी सेनेची राज्यव्यापी धुरा त्यांच्या खांद्यांवर होते. काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आलेला राजकीय वारसा त्यांच्याकडे होता.

मात्र शिवसेनेचे धुरा बाळासाहेबांनी पुत्र उद्धव ठाकरेंकडे सोपवली आणि राज पक्षातून बाहेर पडले.

मनसेच्या स्थापनेनंतर मराठी भाषा आणि मराठी तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा घेत आंदोलनं केली. कधी ती आंदोलनं हिंसक झाली, तर कधी निवदेनावर थांबली. परिणामी 2009च्या विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आले.

मात्र, नंतर पक्षाला गळती लागली. अनेक आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर 2014च्या निवडणुकीत एकच आमदार विजयी झाला.

पुढे राज ठाकरे यांनी अनेकदा भूमिका बदलल्या. आधी मोदींना समर्थन दिलं, नंतर त्यांच्या विरोधात प्रचार केला, नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पत्रकार परिषदेतही दिसले. 2019च्या निवडणुकीत विरोधक होण्यासाठी मत मागत असताना एकच आमदार निवडून आला.

दरम्यान, नाशिकसारखी महापालिका पूर्णपणे त्यांच्या हाती आली होती. मात्र, नंतर झालेल्या निवडणुकीत ती महापालिकाही मनसेच्या हातून निसटली.

दुसरीकडे, अरविंद केजरीवालांकडे पाहिल्यास लक्षात येतं की, त्यांना कुठलाही राजकीय वारसा नव्हता.

अण्णा हजारेंनी सुरू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या सावलीतून ते पुढे आले. 2012 साली आपची स्थापना केली आणि दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2013 साली ते दिल्लीत सत्तेतही आली.

नंतर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागली आणि पुन्हा निवडणुका झाल्या. त्यात केजरीवालांच्या आम आदमी पार्टीनं 70 पैकी 67 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली. आता म्हणजे 2020 साली पुन्हा 70 पैकी 62 जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली.

अरविंद केजरीवाल आणि राज ठाकरे हे समवयीन आहेत. त्यामुळं त्यांची तुलना राजकारणात होणं सहाजिक आहे. मात्र केजरीवाल हे सध्यातरी सत्तेच्या सारीपाटावर यशस्वी राजकारणी दिसून येतात. त्याचवेळी राज ठाकरे यांना अद्याप तरी राज्याच्या सत्तेत वाटा मिळवता आलेला नाही.

मग त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याकडून काय शिकायला हवं? याचा कानोसा आम्ही दिल्लीतल्या वरिष्ठ पत्रकारांकडून घेतला.

भूमकेतील सातत्य

"मनसेचा प्रॉब्लेम असा आहे की, त्यांच्यावर पगडा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचा आहे. कार्यपद्धतीही शिवसेनेची आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं ट्रेनिंग त्यांना आहे. मात्र आता वेगळा झेंडा घेऊन ते बाहेर पडलेत. त्यातून त्यांचा गोंधळ दिसून येतो," असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी म्हणतात.

वरिष्ठ पत्रकार सुनील चावके हे राज ठाकरेंच्या 'धरसोड वृत्ती'वर बोट ठेवतात. ते म्हणतात, "केजरीवालांची स्पष्ट विचारधारा नाही. मात्र मधली स्पेस त्यांनी आपल्याकडे खेचून घेतली आणि त्यावर ठाम राहिलेत. हिंदू मतांचा आधार त्यांनी कामांच्या जोरावर बळकट केला. तसं राज ठाकरेंना करता आलं नाहीय."

"राज ठाकरे कधी शरद पवारांकडे, कधी सोनिया गांधींकडे तर कधी नरेंद्र मोदींकडे जातात. ही धरसोड वृती राज ठाकरेंना राजकारणात नेता म्हणून मारक आहे. भूमिकेबाबत सातत्याबाबत राज ठाकरेंची कामगिरी निराशाजनक आहे. केजरीवालांइतकं सातत्य ते दाखवलं नाहीच," असं सुनील चावके म्हणतात.

वरिष्ठ पत्रकार महेश सरलष्कर हे राज ठाकरे यांच्या धोरणातील फरक सांगतात. "लोकसभेत राज ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केली, नंतर विधानसभेतही तशीच टीका केली. मात्र ते आता भाजपच्या जवळ गेलेले आहे. हा धोरणातील फरक," असं महेश सरलष्कर सांगतात.

स्थानिक लोकांचे मुद्दे

राज ठाकरे यांनी ज्यावेळी मनसेची स्थापना केली, त्यावेळी मराठी भाषा, मराठी तरुण-तरुणींच्या नोकरीचा प्रश्न, टोलनाके असे मुद्दे हाती घेतले. हे सर्व मुद्दे स्थानिक होते. मात्र आता ते हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर सरकलेत.

राज ठाकरेंच्या या प्रवासाला धरूनच महेश सरलष्कर सांगतात, "आम आदमी पक्षानं विकासाचं धोरणं शेवटपर्यंत राबवलं, त्यावर ठाम राहिले. अमित शाहांनी उकसवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहिले. दिल्ली सरकारनं शिक्षण, आरोग्य क्षेत्रात केलेलं काम सांगत राहिले. लोकांपर्यंत दारोदारी जाऊन विनम्रपणे विनंती केली. काम आवडलं, योग्य वाटलं तर मतदान करण्याचं आवाहन केलं."

"आम आदमी पक्षासारखं सर्वसामान्य लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी बोलायला हवं. टोल किंवा इतर मुद्द्यांच्या निमित्तानं पूर्वी ते बोलत होते," असंही सरलष्कर सांगतात.

तसंच, "आता राज ठाकरेंना ठरवावं लागेल की, लोकाभिमुख कामं करायची की हिंदू-गैरहिंदू करत बसायचं. धार्मिक ध्रुवीकरण करायचं की, मराठी कार्ड खेळायचं की स्थानिक मुद्दे घ्यायचे, यातलं त्यांनी ठरवलं पाहिजे," असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी म्हणतात.

संघटना बांधणी

वरिष्ठ पत्रकार महेश सरलष्कर सांगतात, "दिल्ली हे राज्य म्हणून छोटं आहे, तर महाराष्ट्र हा उत्तर प्रदेशनंतर भारतातील सर्वात मोठं राज्य आहे. त्यामुळं संघटना बांधणीत राज ठाकरेंचं काम अधिक अवघड आहे. त्यासाठी कष्टाची जोड द्यावी लागेल.

"त्या तुलनेत आम आदमी पक्षाचा परीघ छोटा आहे. त्यामुळं पक्ष बांधणीच्या पातळीवर वेगवेगळा विचार करावा लागेल."

मात्र, त्याचवेळी सरलष्कर राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवतात आणि संघटना बांधणीच्या दृष्टीनं पावलं टाकण्याआधी कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्याचा मुद्दा सरलष्कर मांडतात.

ते म्हणतात, "राज ठाकरेंकडे सत्ता नसली तरी मनसेनं पक्ष वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्यासाठी किती काम केलं पाहिजे, हे एव्हाना लक्षात आलंच आहे. आता तर ते हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळलेत, या भूमिकेला ते महत्त्व देतायत."

विश्वासू सहकारी

राज ठाकरे यांच्यासोबत आता दिसणारे सहकारी नवीन दिसतात. पूर्वी शिरीष पारकर, प्रवीण दरेकर, वसंत गीते अशी फळी होती. त्यातील बाळा नांदगावकर वगळता जुन्यातलं कुणी फारसं दिसत नाही.

दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पहिल्या दिवसापासूनचे सहकारी आजही सोबत दिसतात. मनिष सिसोदिया, गोपाल राय ही त्यातील प्रामुख्यानं पुढं येणारी नावं. काही मोठी नावं जसं की प्रशांत भूषण, योगेंद्र यादव आणि कुमार विश्वास त्यांच्यापासून दूर गेले.

याबाबतच सुनील चावके म्हणतात, "केजरीवालांसोबत जशी टीम आहे, तशी टीम राज ठाकरे राखू शकले नाहीत. योगेंद्र यादव, कुमार विश्वास, शाजिया इल्मी यांसारखी माणसं सोडून गेल्यानंतर केजरीवालांनी गोपाल राय, मनिष सिसोदिया, राघव चढ्ढा, दिलीप पांडे, आतिशी यांसारखी सहकार्यांची टीम बांधली. अशी टीम राज ठाकरेंकडे नाही. सहकारी नेत्यांची पोकळी भरून काढणं राज ठाकरेंना शक्य झालं नाही."

या सहकाऱ्यांमुळं समाजात विश्वास निर्माण करण्यात हातभार लागतो, असंही चावके सांगतात.

संधीचं सोनं

राज ठाकरे यांना राज्याच्या सत्तेत अद्याप वाटेकरू होता आलं नसलं, तरी नाशिक महापालिकेची सत्ता त्यांच्याकडे होती. मात्र तिथंही चमकदार कामगिरी करून दाखवली नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

सुनील चावके हे हाच मुद्दा अरविंद केजरीवालांशी जोडतात. ते म्हणतात, "राज ठाकरे यांचं टॅलेंट केजरीवालांपेक्षा चांगलं आहे. मात्र, केजरीवालांनी ते टॅलेंट कृतीतून आणण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंना तशी संधी मिळाली नाही आणि नाशिक महापालिकेच्या रूपानं जी संधी मिळाली होती, ती घालवली."

तर महेश सरलष्कर म्हणतात, "सत्ताधारी पक्ष म्हणून जे करायचं, ते केजरीवाल करतात. मनसेकडे सत्ता नाही, त्यामुळं ही तुलना होऊ शकत नाही."

शेवटी सुनील चावके हे अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय भानाबद्दलही मत नोंदवतात.

"2013 पासून मधला वर्षभराचा कालावधी वगळल्यास अरविंद केजरीवाल सातत्यानं सरकारमध्ये आहेत. आपण राजकीयदृष्ट्या कसं वागायला पाहिजे, याचं भान त्यांना आलंय. त्यानुसार ते विचार आणि कृतीमध्ये परीक्षण करत पुढं चालले आहेत," असं सुनील चावके म्हणतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)