You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या', #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या - देवेंद्र फडणवीस
"सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसंही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या," असं आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपला दिल होतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
ते नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात बोलत होते.
याप्रसंगी ते म्हणाले, "सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही, ते तसेच पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. तुम्ही तिघे एकत्र आहात ना? तुम्हाला कळून जाईल जनता आजही कुणाच्या बाजूने आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, त्यांच्या वंशजांचा अपमान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान होत आहे. पण शिवसेना गप्प आहे. आपल्याला धर्मासाठी लढायचं आहे. जे अधर्माच्या सोबत आहेत, ते जुने मित्र असले तरी त्यांच्याविरोधात सुद्धा लढावे लागेल. "
2. काहीतरी झाकायचंय म्हणूनच कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास 'NIA'कडे - शरद पवार
कोरेगाव-भीमा हे प्रकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घडलेलं होतं. महाविकास आघाडी सरकारकडून त्याची चौकशी सुरु झाल्यानं केंद्र सरकार घाबरलं आहे. यात केंद्र सरकारला काहीतरी झाकायचं असावं, म्हणूनच त्याचा तपास काही तासांत राज्य सरकारकडून काढून घेत 'एनआयए'कडे सापवण्यात आला आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.
जळगावातील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
पुढे ते म्हणाले, "केंद्राला त्याचा अधिकार असला तरी राज्य सरकारची परवानगी घेतली नाही. राज्यात मध्यवधी निवडणुकीची चर्चा देखील निरर्थक असून भाजपच्या नेत्यांचे ज्योतिष आणखी 4 वर्षं खरे ठरणार नाही."
3. 'इंदुरीकर महाराजांचं काय चुकलं?'
PCPNDT कायदा आणि इंदुरीकर महाराज जे बोलले, त्याचा काय संबंध लावला या लोकांनी? मला राज्य सरकारची किव करावीशी वाटते, अशी भूमिका भाजपचे आमदार सुरेश धस यांनी इंदुरीकर महाराजांबाबतच्या वादात घेतली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
ते म्हणाले, "PCPNDTकायदा आणि महाराज जे बोलले, त्याचा काय संबंध लावला या लोकांनी? मला राज्य सरकारची कीव करावीशी वाटते. या सरकारनं इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. वारकरी संप्रदायाच्या पताका हाती घेऊन संपूर्ण राज्यभर त्यांचं कीर्तन ऐकलं जातं. ते जे बोलले आहेत, ते गुरुचरित्र, भगवद्गीतेमध्ये सप्रमाण सांगितलं आहे."
दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी बोलताना महिलांचा सन्मान राखावा, असं मत राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.
त्या म्हणाल्या, "सध्या सर्वसामान्यांमध्ये इंदुरीकर महाराजांची मोठी क्रेझ आहे. आपण सर्वजण त्यांचे कीर्तन-प्रवचन ऐकत असतो. प्रसिद्ध व्यक्ती असताना बोलताना तारतम्य बाळगायला हवं. आपले मत सामाजिक किंवा सार्वजनिक व्यासपीठावर मांडत असताना निश्चितपणाने महिलांचा, समाजातील व्यक्तींचा सन्मान राखणं महत्वाचं आहे. व्यासपीठावर आपण एकटे म्हणून मत मांडत नसतो. आपल्याकडे लाखो नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे या गोष्टींची दक्षता एक सुजाण व्यक्ती म्हणून बाळगायला हवी."
4. केंद्रानं पैसे थकविल्यानं राज्यापुढे आर्थिक पेच - सुप्रिया सुळे
"गेल्या 5 वर्षांत अव्वल स्थानावर असलेले राज्य खूप मागे गेले आहे. त्यात केंद्र सरकारकडे वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) 15 हजार कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे राज्य सरकारपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून अर्थसंकल्प तयार करणे अवघड झाले आहे. विविध विकास योजनांवर त्याचा परिणाम होत आहे," असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.
"माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी हे सरकार अल्पमुदतीचं ठरुन मध्यावधी निवडणुका होतील, असं भाकित केलं असलं, तरी त्यात तथ्य नाही. हे सरकार आणखी किमान 15 वर्षं टिकेल," असा दावा त्यांनी केला.
5. सुशिक्षित, संपन्न कुटुंबांत घटस्फोटाचे प्रमाण अधिक- मोहन भागवत
शिक्षण व संपन्नता यासोबतच अहंकारही येतो. त्यामुळे हल्लीच्या काळात घटस्फोटाची प्रकरणे 'सुशिक्षित व संपन्न' कुटुंबांमध्ये अधिक आढळतात आणि त्याचा परिणाम कुटुंबे दुरावण्यात होतो, असं प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. भारतातील हिंदू समाजाला पर्याय नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "आजकाल घटस्फोटाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. लोक किरकोळ कारणांवरुन भांडतात. सुशिक्षित व संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात, कारण शिक्षण व संपन्नतेसोबत अहंकार येतो. परिणामी कुटुंबे विभाजित होतात. यामुळे समाजही विभाजित होतो, कारण समाज हेही एक कुटुंब आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)