डोनाल्ड ट्रंप 24-25 तारखेला भारत दौऱ्यावर येणार #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1.डोनाल्ड ट्रंप 24-25 तारखेला भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप 24 आणि 25 फेब्रवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. द हिंदू ने ही बातमी दिली आहे.

अमेरिकन वेळेनुसार 10 फेब्रुवारीला दुपारी व्हाईट हाऊसने ही घोषणा केली. "राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी नवी दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत. या राज्याने महात्मा गांधी यांच्या आयुष्यात आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे," असं या निवेदनात म्हटलं आहे.

गेल्या आठवड्याच्या शेवटी मोदी आणि ट्रंप यांनी फोनवरून बातचीत केली होती. भारत आणि अमेरिका संबंध सुधारण्याच्या दृष्टीने मोदी आणि ट्रंप यांनी सहमती दर्शवली आहे. .

2.अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर शिक्कामोर्तब

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे. या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याआधी प्राथमिक चौकशी किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता नाही, असं न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केलं.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ज्या प्रकरणात गुन्हा घडल्याचं सकृतदर्शनी घडल्याचं आढळत नाही, अशाच प्रकरणात न्यायालय अटकपूर्व जामीन देऊ शकतं असंही न्यायालयाने स्पष्ट केले.

मात्र अटकपूर्व जामिनाचा सर्रास गैरवापर केल्यास या कायद्याबाबत संसदेचा मूळ हेतूच पराभूत होईल. प्रत्येक नागरिकाने आपल्या देशबांधवांना समानतेने वागवावे आणि बंधुत्वाची भावना जोपासावी, असं मत खंडपीठातील न्या. रवींद्र भट यांनी व्यक्त केलं.

3. कोरोना व्हायरस: राज्यातील 37 प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या 37 लोकांपैकी 34 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

या सर्वांचा कोरोना विषाणूसाठी अहवाल निगेटिव्ह असल्याचं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

37 प्रवाशांपैकी नवी मुंबईत भरती असलेल्या एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर सध्या भरती असलेल्या तिघांपैकी दोघे पुणे येथील नायडू रुग्णालयात आणि एक जिल्हा रुग्णालय सांगलीला आहे. कोरोना बाधित भागातून राज्यात सध्या 166 प्रवासी आले असून मुंबई विमानतळावर एकूण 23 हजार 350 प्रवाशांची तपासणी करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

4. 1993 स्फोटातील एका आरोपीला अटक

1993 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या बाँबस्फोटातल्या एका आरोपीला गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. ड्रग्सच्या तस्करीसंदर्भातील एका प्रकरणात अटक करण्यात आल्याचं ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

मुनाफ हलारीला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली तेव्हा तो पाकिस्तानच्या पासपोर्टवर दुबईला पळून जाण्याच्या बेतात होता. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती.

1993च्या साखळी बाँबस्फोटात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. तो टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी होता. त्याने तीन नवीन स्कुटर विकत घेऊन त्यात बाँब पेरले होते.

5.उद्धव ठाकरेंनी अनेक कॉपीबहाद्दरांना केली होती मदत

दादरच्या बालमोहन शाळेचे माजी विद्यार्थी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल त्यांच्या शालेय आठवणीत रमले. बालमोहन अभिमान सोहळ्यात ठाकरे आणि अर्थमंत्री जयंत पाटील एकाच व्यासपीठावर होते.

शाळेचेच माजी विद्यार्थी आणि अभिनेते अजित भुरे यांनी या दोघांची मुलाखत घेतली. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळेच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच्या आठवणी सांगितल्या. पहिल्या दिवशी ते आईबरोबर आले होते. त्या दिवशी ते दिवसभर रडले आणि मग त्यांना थेट एक वर्षांनंतर शाळेत पाठवण्यात आलं. त्यामुळे शाळेत एक वर्षं उशिरा पाठवण्यात आलं, असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)