राज ठाकरे यांनी दंडावर बांधलेलं ‘धर्मबंध’ आहे तरी काय?

फोटो स्रोत, ANI
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने मुंबईत 'महामोर्चा' काढला. यावेळी राज ठाकरे यांनी दंडावर पट्टा (Arm Band) बांधला होता. या पट्ट्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. काय आहे या प्रतीकाचा अर्थ?
या महामोर्चात काहीवेळ राज ठाकरे पायी चालले आणि नंतर व्हॅनिटीत बसून आझाद मैदानात पोहोचले. तिथं राज यांनी भाषण केलं.
मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "या पट्ट्याला 'धर्मबंध' असे आम्ही संबोधणार आहोत."
मनसेच्या यापुढील सर्व कार्यक्रमांमध्ये हे 'धर्मबंध' बांधले जाणार असल्याची माहितीही अनिल शिदोरे यांनी दिली.

फोटो स्रोत, Twitter/Anil Shidore
स्वत: राज ठाकरे यांनीच अनिल शिदोरे यांना 'धर्मबंध' बांधलं. तसा फोटो शिदोरेंनी ट्वीट केलाय. राज ठाकरे यांनीही मोर्चात सहभागी होताना 'धर्मबंध' बांधलंय.
हे 'धर्मबंध' म्हणजे शिवसेनेच्या 'शिवबंधन'सारखीच पद्धत असल्यानं आम्ही अनिल शिदोरे यांना यासंदर्भात विचारलं असता, ते मिश्किलपणे हसत म्हणाले, "तुम्हाला जसा अर्थ काढायचा तसा काढा. मात्र, हे आम्ही पुढील सर्व कार्यक्रमात परिधान करु."
शिवसेनेनंही काही वर्षांपूर्वी मनगटावर 'शिवबंधन' बांधण्याची पद्धत सुरु केली होती. आता कुणी शिवसेनेत प्रवेश करत असल्यास त्याच्या मनगटावर 'शिवबंधन' बांधलं जातं.
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला आव्हान देण्यास राज ठाकरेंनी सुरुवात केली असतानाच, आता शिवसेनेसारखी प्रतीकंही आपलीशी करताना दिसत आहेत.
यासंदर्भात राजकीय विश्लेषकांशी बीबीसी मराठीनं बातचीत केली आणि या प्रतिकांच्या राजकारणाचा नेमका अर्थ जाणून घेतला.
राज ठाकरेंचं प्रतिकांचं राजकारण मनसेला किती लाभदायक ठरेल?
वरिष्ठ पत्रकार संजय जोग म्हणतात, "हे प्रतिकांचं राजकारण आताच्या पिढीला किती आपलसं करेल, हा प्रश्न आहे. कारण आता देशात स्थिती कठीण आहे. 45 वर्षांमधील सर्वात वाईट बेरोजगारी आहे, जगभरातील आर्थिक संकटाला भारतही अपवाद नाही."
"आर्थिक क्षेत्रातली हतबलता, राजकीयदृष्ट्या सुरु असलेलं ध्रुवीकरण आणि इतर राक्षसासारखे प्रश्न आ वासून उभे आहेत, अशा किचकट स्थितीत धर्मबंधसारखं प्रतिकात्मक राजकारण यशस्वी होईल असं वाटत नाही," असंही संजय जोग म्हणतात.
धर्मबंधऐवजी त्यांनी विकासाचा रोडमॅप ठेवला, तर नक्कीच कुणालातरी मदत होईल, असं जोग सुचवतात.

फोटो स्रोत, ANI
वरिष्ठ पत्रकार योगेश पवार म्हणतात, "लोक जेव्हा बेरोजगार असतात, शिक्षणाचा अभाव असतो, तेव्हा प्रतिकांच्या वादात समाविष्ट करणं अधिक सहज होऊन जातं. हा प्रकार आपल्याकडे अगदी जुनं आहे. मुसोलिनी-हिटलरपासून प्रतिकांचं राजकारण केलं गेलंय."
मात्र, त्याचवेळी योगेश पवार असंही सांगतात की, "लोकांमध्ये जागृती वाढतेय. त्यामुळं लोकांना हेही कळू लागलंय की, आपल्या कूकरमध्ये 'धर्मबंध', 'शिवबंधन' शिजत नाही. डाळ आणि भातच शिजतात."
'धर्मबंध'मधून राज ठाकरेंना काय साधायचंय?
शिवसेनेच्या 'शिवबंधन'सारखं 'धर्मबंध' आणून राज ठाकरेंना काय साधायचंय, हा साहजिक प्रश्न उपस्थित होतो.
याबाबत योगेश पवार म्हणतात, "भाजपला जवळ करण्याचा राज ठाकरे प्रयत्न करतायत. धर्मबंध वगैरेसारख्या प्रतिकात्मक राजकारणामुळं ते भाजपसारखे दिसतील, अशी त्यांना आशा आहे."
संजय जोग म्हणतात, "दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात आपण पाहिलं की, स्थानिक मुद्द्यांना बाजूला सारुन देशाचं ध्रुवीकरण करणारे मुद्दे प्रचारात आणले गेले. तसं प्रतिकात्मक राजकारण 'धर्मबंध'मधून राज ठाकरे करु पाहतायत."

फोटो स्रोत, ANI
पण मग यात राज ठाकरेंना यश मिळेल का? ते भाजपच्या जवळ जाऊ शकतील का, शिवसेनेला आव्हान देऊ शकतील का, मतं मिळवू शकतील का, हे नाना प्रश्न समोर येतात.
त्याबाब बोलताना योगेश पवार म्हणतात, "डिमिनिशिंग रिटर्न (घटत चाललेलं उत्पन्न) नावाची एक अर्थव्यवस्थेत संकल्पना आहे. मनसेला ती संकल्पना लागू होते. मनसे हा पक्ष इतक्या खाली गेलाय की, ते आता धोकादायक स्थितीत गेलेत. त्यामुळं भाजपलाही मनसेत आकर्षण वाटण्यासारखं काही नाही. मात्र, शिवसेनेला आव्हान देण्यासाठी उपयोग होऊ शकतो का, हे भाजप आवर्जून पाहील."
दरम्यान, 'धर्मबंध'चा आगामी राजकारणात मनसे कसा वापर करते, हेही पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









