'मनसे महामोर्चा' : 'यापुढं दगडाला दगडानं, तलवारीला तलवारीनं उत्तर', राज ठाकरेंच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

'यापुढे दगडाला दगडाने उत्तर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ. एकोप्याने रहा.' असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना हाकला या मागणीसाठी मनसेने महामोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. संबोधित केलं.

CAA-NRC च्या समर्थनासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चांना राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक शब्दात आव्हान दिलं.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) मुंबईत महामोर्चा काढला. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधातल्या या मोर्चाला हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.

News image

हिंदू जिमखान्यापासून आझाद मैदान असा महामोर्चा पूर्ण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन केलं.

कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांनी काढलेल्या महामोर्चाचं कौतुक केलं.

राज ठाकरे यांच्या भाषणातील 9 महत्त्वाचे मुद्दे

1) सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो.

राज ठाकरे

फोटो स्रोत, ANI

2) माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

3) 2012 च्या मोर्चात मी एका बांगलादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता. यांची मजल बघा. यांना हुसकावलंच पाहिजे.

4) आज आम्ही मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका.

5) या राज्य सरकारला सांगून उपयोग नाही,केंद्राला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या पोलिसांना हात सोडून 48 तास द्या, महाराष्ट्रातला क्राईम रेट शून्य टक्क्यांवर आणू शकतात, पण हात बांधलेले आहेत, कारवाई करायला गेल्यानंतर सरकार पोलिसांवर केस टाकणार

राज ठाकरे

फोटो स्रोत, ANI

6) बांगलादेशातून 2 कोटी आले आहेत, पाकिस्तानातून किती आले कल्पना नाही. आम्ही हिंदू बेसावध. आम्ही दंगल झाली की हिंदू होतो.

7) पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झालाय. अमेरिकेतल्या ट्विन्स टॉवर हल्ल्यातील ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. आपल्या देशात अनेक बॉम्बस्फोट झाले, त्याच्या मागे कोण होतं? मुंबईत बॉम्बस्फोट झाले, दाऊदने केले, त्याला सांभाळलं कोणी?

8) भारतानं प्रत्येकवेळी माणुसकीचा ठेका घेतला नाहीय, जगातला प्रत्येक देश आपापल्या नागरिकांसाठी कठोर पावलं उचलतात.

9) अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी