नसीरूद्दीन शाह : माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का? #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, STR/getty images
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा
1. 'माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, म्हणजे मी भारतीय नाही का?'
"माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, मी आता तो तयारही करू शकत नाही, तर मग मी भारतीय नाही का? 70 वर्षे या देशात केलेले वास्तव्य हा माझ्या भारतीय असण्याचा पुरावा नाही का?" असा प्रश्न ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी उपस्थित केला आहे. ही बातमी ईटीव्ही भारत महाराष्ट्रने दिली आहे.
"नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचार करत असताना, एक मुस्लीम म्हणून नाही तर देशाचा नागरिक म्हणून मला काळजी वाटते. माझ्या पाच पिढ्या या देशाच्या मातीत दफन आहेत. मी या देशाच्या सामाजिक जडणघडणीमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये काही योगदान दिले आहे. मग मी या देशाचा नागरिक नाही का? अस मत त्यांनी व्यक्त केलं."
यावेळी नसरूद्दीन शाह यांनी अभिनेते अनुपम खेर यांच्यावरही निशाणा साधला. खेर हे एक 'जोकर' असल्याचं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images/twitter
अनुपम खेर यांनी बुधवारी सायंकाळी एक व्हीडिओ ट्विट करून या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. "शाह यांच्या टीकेला आपण गांभीर्याने घेत नाही. ते ज्या पदार्थांचे सेवन करतात त्यामुळे त्यांना चूक आणि बरोबर यातील अंतर कळत नाही," असं खेर यांनी म्हटलं.
2. थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार
राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणखी एका निर्णयाला ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नगराध्यक्षानंतर आता थेट जनतेतून सरपंच निवडही रद्द होणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

फोटो स्रोत, facebook
"राज्यात मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंचाची निवड झाली होती. पण यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने ठरवलं आहे की सरपंचाची निवड सदस्यांमधून व्हावी, थेट निवड होणार नाही यासाठी आम्ही लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर अध्यादेश आणणार आहोत. कारण एकाच विचारधारेचा सरपंच निवडून येतो आणि सदस्यांची विचारधारा वेगळी असते. त्यामुळे विकासकामांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात," असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
3. 'स्वतःच्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्यांना सावरकर काय कळणार?'
"ज्या व्यक्तीला आपल्या आजीचा इतिहास माहीत नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर काय समजणार," अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

फोटो स्रोत, Sharad ponkshe/facebook/akshay paranjape
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आहे. त्यामुळे आता तरी सावरकरांना 'भारतरत्न' मिळेल, अशी अपेक्षा शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. धर्म गर्जना संस्थेतर्फे आयोजित 'राष्ट्रभक्त सावरकर' या विषयावर शरद पोंक्षे बोलत होते.
4. कर्जमाफीच्या व्हीडिओतला हलगर्जीपणा अधिकाऱ्याला भोवला
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रशिक्षण व्हिडीओमधील छेडछाडीबाबतची हलगर्जी, दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणाबद्दल राज्य शासनाने राज्याचे प्रभारी सहकार आयुक्त व वादग्रस्त सहकारी संस्था निबंधक सतीश सोनी यांना बुधवारी (22 जानेवारी) निलंबित केलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
कर्जमुक्तीच्या प्रशिक्षण व्हिडीओचे यूआरएल उघडल्यावर चक्क कँडीक्रश हा खेळ सुरू होत होता. त्यामुळेच सोनी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सहकार विभागाने त्यांच्यावरील कारवाईचे आदेश काढले आहेत. सोनी यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाचाही कार्यभार होता.
5. 'खेलो इंडिया'मध्ये सलग दुसऱ्या वर्षीही महाराष्ट्र अव्वल
'खेलो इंडिया' युथ गेम्सच्या तिसऱ्या पर्वात वर्चस्व राखत महाराष्ट्राने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावले आहे. मागील वर्षी पुण्यात झालेल्या 'खेलो इंडिया' स्पर्धेत 227 पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते. यंदा मात्र त्यापेक्षाही अधिक पदकांची कमाई करण्यात महाराष्ट्राला यश आले. यावर्षी महाराष्ट्राने 256 पदक पटकावली आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
महाराष्ट्रापाठोपाठ हरयाणा 200 पदकांसह द्वितीय तर दिल्ली 122 पदकांसह तृतीय क्रमांकावर आहे. गुवाहाटी येथील नबीन चंद्र बार्डोली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामेश्वर तेली, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, अर्थमंत्री हेमंत विश्वकुमार यांच्या हस्ते महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. ही बातमी लोकमतने दिली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)










