Delhi Election 2020: अरविंद केजरीवाल यांना टक्कर देण्यासाठी भाजप, काँग्रेसकडे पर्याय काय?

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, ANI

    • Author, वात्सल्य राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दिल्लीत विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि यावेळी कोणता चेहरा निवडणुकीचा चेहरामोहरा बदलणार हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

हा प्रश्न रोज ट्विटरवर वाचायला मिळतो आणि पुन्हा एकदा सरकार स्थापनेस इच्छूक असणाऱ्या 'आप' ला हा प्रश्न फार आवडतो.

भाजप आणि काँग्रेसकडे सध्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही चेहरा नाही असं अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाचे लोक छातीठोकपणे सांगत आहेत.

आम आदमी पक्षाचे नेते आणि तिमारपूर जागेवरून पक्षाचे उमेदवार दिलीप पांडेय म्हणतात, "ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी फायदेशीर आहे. भारतीय जनता पक्षाकडे या निवडणुकीत कोणतेही मुद्दे नाहीत आणि त्यांच्याकडे नेतृत्वही नाही," मात्र एखादा चेहरा संपूर्ण निवडणूक बदलू शकते का?

तिन्ही पक्षांनी समोर केले होते काही चेहरे

दिल्लीच्या राजकारणाचा अभ्यास करणारे विश्लेषक या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही आकडेवारी मांडतात. 2000 पासून आतापर्यंत झालेल्या निवडणुकांवर एक नजर टाकली असता तर असं लक्षात येतं की त्या त्या वर्षीच्या निवडणुकीचा चेहरा म्हणवल्या गेलेल्या व्यक्तीला विजयाचं श्रेय दिलं.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, AFP

2003 आणि 2008 मध्ये काँग्रेसने शीला दीक्षितच्या 'विकासपुरुष' या प्रतिमेच्या आधारावर 47 आणि 43 जागा जिंकल्या आणि भाजपच्या मनसुब्यावर पाणी पडलं. या निकालांमुळे शीला दीक्षित यांनी तीन वेळा दिल्लीचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम रचलाच पण त्यामुळे त्यांची उंची वाढली.

News image

2015 मध्ये किरण बेदींचा पराभव करत केजरीवांलांनी मोदींच्या भाजपला दिल्ली विधानसभेत येण्यापासून रोखलं. आप ला 70 पैकी 67 जागांवर विजय मिळाला. 49 दिवसांचं सरकार चालवल्यानंतर त्यांची वाटचाल राजकीय वनवासाकडे होतेय की अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या विजयामुळे त्यांनी राजकीय पटलावर जोरदार पुनरागमन केलं.

2015 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले विजेंदर गुप्ता या आकडेवारीला फारसं महत्त्व देत नाहीत. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणं ही पक्षाच्या रणनीतीचा भाग आहे असं त्यांचं मत आहे.

गुप्ता म्हणतात, "प्रत्येक पक्षाची एक रणनीती आहे. पक्ष सगळा विचार करूनच अशी पावलं उचलत असतो."

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

मात्र ही रणनीती म्हणजे भारतीय जनता पक्षाचं दुर्बल स्थान आहे. दिल्लीच्या राजकारणाचे अभ्यासक प्रमोद जोशी सांगतात की "प्रत्येक चेहऱ्याचं एक महत्त्व असतंच आणि एखादा चेहरा असेल तर तो समोर यायला हवा. त्यावेळी काँग्रेसकडे शीला दीक्षितांचा चेहरा होता. तेव्हा त्यांची प्रतिमा बदल आणि विकास यांच्याशी निगडीत होती."

प्रमोद जोशी यांच्या मते असे निर्णय मतदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकतात.

ते म्हणतात, "दिल्लीचा मतदार कुणाच्याही मागेपुढे फिरत नाही. तो परिस्थितीनुसार निर्णय घेतो."

अमित शाह काय म्हणाले होते?

भारतीय जनता पक्षालाही विशिष्ट चेहऱ्याचं महत्त्व चांगलंच माहिती आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यामुळे भाजपला सार्वत्रिक निवडणुरकीत उत्तम यश मिळालं.

इतकंच नाही तर महाराष्ट्रातही शिवसेनेशी युती तुटल्यानंतर त्यांनी एका चॅनेलला इंटरव्ह्यू दिला होता. "महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या नावावर होता. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मोदींचं कटआऊट शिवसेनेच्या नेत्यांपेक्षा मोठं लावलं आहे. त्यात अगदी आदित्य ठाकरेही मागे नव्हते."

मोदींच्या नावाने दिल्लीतला गडही सर करता येईल अशी अपेक्षा अमित शाहांना आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या एका रॅलीत ते म्हणाले, "मी जिथेही जातो तिथे मला विचारतात की दिल्लीत काय होणार? आज मी तुम्हाला सांगतो की दिल्लीत मोदींच्या नेतृत्वात भाजपाचं सरकार स्थापन होणार?"

2015 मध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या भाजपाने याचं स्पष्टीकरण दिलं. अमित शाह यांनी केजरीवालांचं आवाहन फेटाळलं, "एखाद्या व्यक्तीला एकदाच फसवता येतं. वारंवार नाही. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आपचं आव्हान संपुष्टात आलं. 2019 च्या निवडणुकीत 13750 बूथपैकी 12604 बूथवर भाजपचा झेंडा फडकावण्यात कार्यकर्त्यांना यश आलं. 88 टक्के बूथवर भाजपला विजय मिळाला.

मतदान

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, दिल्लीत यंदा तिहेरी लढत?

शाह यांच्यामते कार्यकर्त्यांची मेहनत आणि मोदींच्या चेहरा या दोन गोष्टींमुळे यावेळी 1998 प्रमाणे दिल्ली विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवता येऊ शकतो.

भाजप दिल्लीच्या विकासाला गती देऊ शकतं असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला आहे असा दावा विजेंदर गुप्ता करतात. मोदी दिल्लीचा विकास करू इच्छितात. केजरीवाल दिल्लीला मागे नेण्याचं काम करत आहेत.

ते पुढे म्हणतात, "दिल्लीत पिण्याचं पाणी स्वच्छ नाही. लोकांचे हाल होताहेत. दिल्लीत प्रदुषणाची पातळी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने या मुद्द्यावर कोणतंही काम केलेलं नाही. आम्ही दिल्लीत स्वच्छ पाण्याचा पुरवठा करू, दिल्लीत स्वच्छ हवेची व्यवस्था करू. युनिफाईड ट्रांसपोर्ट सिस्टिम माईल कनेक्टिव्हिटीची साथ देतील."

"दिल्लीच्या लोकांचा मोदीवर भरवसा आहे. ज्या प्रकारे 1731 कॉलनीचं नियमन ज्या पद्धतीने केलं ती काही साधारण गोष्ट नाही," गुप्ता सांगतात.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या दाव्यावर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद जोशी अनेक प्रश्न उपस्थित करतात.

ते म्हणतात, "महानगरपालिकेच्या निवडणुकीची गोष्ट वेगळी असते. दिल्ली राज्य जिंकायचं असेल तर रणनीती वेगळी हवी. गेल्या काही वर्षांत भाजपने कोणत्याही स्थानिक नेत्याला समोर केलेलं नाही. मनोज तिवारी काही भागात अनेक लोकांना प्रभावित करत असतील मात्र त्यांच्या तुलनेत केजरीवाल पुढे आहेत."

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आल्यामुळे आप ने त्यांच्या रणनीतीत अनेक बदल केले.

केजरीवाल आणि मोदी

दिल्लीत केजरीवाल आणि मोदी यांच्यातील स्पर्धेवर प्रमोद जोशी म्हणतात, "2019 मध्ये निवडणुकीचे निकाल आले तेव्हा राज्यात आप आणि केंद्रात भाजपचं सरकार या आधारावरच पुढच्या निवडणुका घेतल्या जातील."

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या काँग्रेसचे नेते जे. पी. अग्रवाल यांच्या मते विधानसभा निवडणुकीत मोदींच्या आधारे भाजपला आघाडी मिळणार नाही.

ते म्हणतात, "मोदींना पुढे करणं याचा अर्थ राज्यात केंद्र सरकारच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जातील. मोदी दिल्लीचे मुख्यमंत्री होणार नाही. ते दिल्लीच्या तीन चार नेत्यांची नावं घेतात. ते मनोज तिवारी, विजय गोयल, विजेंद्र गुप्ता यापैकी कुणाचीही नावं घेत नाही."

अग्रवाल यांच्या मते केजरीवालांचा इतकाही प्रभाव नाही की अगदी निवडणुकीचं चित्रच बदलेल. ते म्हणतात, "माझ्या मते निवडणुकीचे मुद्दे जास्त महत्त्वाचे असतात. कोणी काय काम केलं आहेतेही लोक पाहतात. 2013 मध्ये आमची सत्ता गेली तेव्हापासून दिल्लीत काहीही बदल झालेला नाही."

मात्र आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी, काँग्रेस आणि भाजपच्या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.

अमित शाह

फोटो स्रोत, Reuters

दिलीप पांडेय म्हणतात, "कामाच्या आधारावर निवडणुका लढवल्या जात आहे असं पहिल्यांदा होत आहे आम्ही काम केलं असं तुम्हाला वाटत असेल तरच आम्हाला मत द्या. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील सगळी कामं आम्ही केलीत. ज्या कामांची घोषणा केली नाही ती सुद्धा केली. 200 युनिट वीज मोफत देणार ही घोषणा जाहीरनाम्यात केली नव्हती. तेसुद्धा केलं. महिलांना मोफत बस प्रवासाची घोषणाही केली नव्हती."

चेहरा आणि काम हे दोन्ही निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. "दिल्लीतले लोक अतिशय समजदार आहेत. त्यांच्यासाठी मेसेज महत्त्वाचा आहेच तर मेसेंजरही महत्त्वाचा आहे. चेहऱ्यात एक प्रकारचा विश्वास असतो. त्या चेहऱ्याने कामं केली आहेत.त्यामुळे विश्वासर्हता आणखीच वाढली आहे."

प्रमोद जोशी यांच्यामते दिल्लीच्या रणधुमाळीत अनेक नवे चेहरे आहेत. तरीही केजरीवाल त्यांची उंची वाढवण्यात यशस्वी ठरले आहेत.

ते म्हणतात, "नेता म्हणून त्यांच्याबद्दल नकारात्मकता पसरली होती. गेल्या सहा महिन्यात शांतपणे काम करून त्यांनी त्यांची परिस्थिती सुधारली आहे."

मात्र भारतातल्या निवडणुकीत अंतिम क्षणी काहीही होऊ शकतं हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)