राज ठाकरे : मनसेच्या बॅनरवर झळकणारा 'महाराष्ट्र धर्म' नेमका आहे तरी काय?

मनसे

फोटो स्रोत, Twitter/MNS

राज ठाकरे 23 जानेवारीला (बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन) मुंबईत मनसेचं पहिलं महाअधिवेशन घेणार आहेत. मनसेच्या ट्विटर पेजवरच्या महाअधिवेशनासंदर्भातील व्हीडिओमध्ये 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा' असा उल्लेख आहे. मनसेच्या बॅनरवरही हेच शब्द झळकत आहेत.

भगव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली प्रतिमा या व्हीडिओमध्ये वापरली आहे. मनसेच्या बॅनरवरही हेच शब्द झळकत आहेत. त्यामुळे राज ठाकरेंना नेमका कोणता महाराष्ट्र धर्म अभिप्रेत आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

राज ठाकरे ज्या 'महाराष्ट्र धर्मा'चा विचार करू पाहत आहेत, त्या शब्दाचा नेमका उगम कसा झाला आणि त्याची व्याख्या कालानुरूप कशी बदलत गेली या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली असली तरी त्याआधी सध्या जो महाराष्ट्र आपल्याला दिसतो तो कसा होता, कोणती भाषा प्रामुख्याने बोलली जात होती, संस्कृती कशी होती याबद्दलचा इतिहास तसा अनेक ठिकाणी सांगितला आणि लिहिला गेला आहे.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणेपर्यंत महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतरं पाहिली. मराठी ही भाषा महाराष्ट्राच्या अर्थातच केंद्रस्थानी होती. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्या सर्व भाषा, त्यामागची संस्कृती यांचा संगम म्हणजे महाराष्ट्र धर्म असं ढोबळमानानं म्हणता येईल.

'महाराष्ट्र धर्म कर्मकांडांचा नाही'

महाराष्ट्र धर्माची व्याख्या करताना ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे म्हणतात, "महाराष्ट्र धर्म या शब्दावर महाराष्ट्रात जितकी चर्चा झाली तितकी आणखी कोणत्याही शब्दावर झालेली नाही. महाराष्ट्रात राजाराम भागवत आणि न्या, रानडे यांनी ही संकल्पना आणली. मग वि.का.राजवाडे यांनी तो शब्द सुधारला. महाराष्ट्राचा राष्ट्रीय धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्रातील लोकांचा हा धर्म. हा म्हणजे काही नुसता कर्मकांडाचा धर्म नाही. हा शब्द पहिल्यांदा रामदासांनी वापरला असा समज सगळ्यांना होता. महाराष्ट्रात राहणारे ते मराठा, त्यांचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म. प्रत्येकाचा काही ना काही धर्म असतो. महाराष्ट्रातील लोकांचं राष्ट्रीय कर्तव्य अशा अर्थाने तो शब्द वापरतात."

News image

हा शब्द वापरावा लागला कारण शिवाजी महाराज ते पेशव्यांच्या काळापर्यंत मराठा समाजाच्या ज्या हालचाली झाल्या त्याला कोणतंही सूत्र नव्हतं, असा सिद्धांत ग्रॅहम डफने मांडला होता. भारताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने पुढे असलं पाहिजे असाही या शब्दाचा अर्थ होतो.

ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे म्हणतात. "वि.का राजवाडे यांनी एका प्रस्तावनेत याविषयी विवेचन केलं आहे. त्यांच्या मते लढाऊ वृत्तीचा हिंदू धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म अशी त्यांनी व्याख्या केली आहे. मला तसं वाटत नाही. महाराष्ट्र धर्म हा हिंदू धर्म आहे, त्याच्यापलीकडे काहीही नाही. त्याला अनेक पुरावे आहेत, अनेक पत्रं उपलब्ध आहेत. या सगळ्या पत्रातून महाराष्ट्र धर्म हाच हिंदू धर्म आहे असं लक्षात येतं."

शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Getty Images

माधव दातार यांनी 'महाराष्ट्र: एका संकल्पनेचा मागोवा' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यांनीही याबाबत बीबीसी मराठीशी संवाद साधला. ते म्हणतात, "सध्याच्या काळात आपण धर्म या अर्थाने हा शब्द वापरतो, पुरातन काळी हा अर्थ त्यातून अभिप्रेत नव्हता. पूर्वी लोक ज्या अर्थाने धर्म हा शब्द वापरायचे आणि आता ज्या अर्थाने तो वापरतात त्यात फरक आहे. राज ठाकरे किंवा बाळ ठाकरे धर्म हा शब्द वापरतात तेव्हा त्यांना वेगळा अर्थ अभिप्रेत आहे. एका भागात येणारे एकत्र येणारे लोक आणि त्यांची समान उद्दिष्टं या अर्थाने हा शब्द आधीही वापरला गेला होता. राजकारणी लोक त्याचा वापर करतात."

'रामदासांची व्याख्या आजही अबाधित'

ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांच्या मते 'मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा' या रामदासांच्या संदेशातून ही व्याख्या अस्तित्वात आली आहे. ही व्याख्या अजूनही अबाधित असल्याचं मत ते व्यक्त करतात.

त्याचवेळी माधव दातार यांच्यामते ही व्याख्या कालानुरूप बदलत गेली. जेव्हा रामदास त्याविषयी बोलायचे तेव्हा त्यांना या भागात राहणारे हिंदू लोक अभिप्रेत होते. कारण पूर्वी महाराष्ट्र हा शब्द जेव्हा वापरला जायचा तेव्हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हाच भाग होता. आता तो बदलत गेला. त्यात भाषेचा मुद्दाही आला. महाराष्ट्राची जी चळवळ झाली त्यात सगळीकडून मराठी लोक एकत्र यावेत हा एक भाग या व्याख्येत होता.

शिवाजी

फोटो स्रोत, Getty Images

न्या. म.गो.रानडे यांनी या शब्दाची व्याख्या करताना 'शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातला उदय' या अर्थाने त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांची महाराष्ट्र धर्माची कल्पना अधिक आधुनिक होती.

एकूणच संत रामदासांनी या मांडलेल्या संकल्पनेचा विस्तार वि.का.राजवाडे, न्या.म.गो.रानडे यांनी केला. प्रत्येकाने या व्याख्येतून वेगवेगळे अर्थ अभिप्रेत होते.

मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे महाराष्ट्र धर्माचा अर्थ नव्याने लावणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.

स्पोर्ट्सवुमन